मराठी चित्रपटसृष्टीला दरवर्षी 'इतक्या' कोटींचा तोटा; "आम्ही टीव्हीत कमावलं आणि सिनेमात गमावलं" श्रीरंग गोडबोले यांची परखड भूमिका!
16-Mar-2025
Total Views | 11
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक, लेखक, निर्माता, गीतकार आणि अभिनेता म्हणून ओळख असलेले श्रीरंग गोडबोले यांनी अलीकडेच मराठी चित्रपट व्यवसायाच्या आर्थिक वास्तवावर परखड मत व्यक्त केले. त्यांच्या मते, दरवर्षी मराठी चित्रपटसृष्टीला सुमारे २०० कोटी रुपयांचा तोटा होत आहे, त्यामुळे अनेक निर्माते चित्रपट निर्मितीपासून दूर जात आहेत.
मराठी चित्रपट व्यवसाय का अडचणीत?
अमोल परचुरे यांच्या यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत गोडबोले यांनी सांगितले की, त्यांनी ‘चिंटू १’, ‘चिंटू २’, ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’, ‘तुह्या धर्म कोणचा’, ‘पितृ’, ‘बाजी’ यांसारख्या चित्रपटांची निर्मिती केली. मात्र, काही यशस्वी झाले तरी बहुतांश चित्रपट आर्थिकदृष्ट्या परतावा देऊ शकले नाहीत. ते म्हणाले, “मराठी चित्रपट हा व्यवसाय म्हणून फायदेशीर नाही. थिएटर आणि ब्रॉडकास्ट या दोन मुख्य स्रोतांमधून चित्रपटाला पुरेसं उत्पन्न मिळत नाही. गेल्या वर्षी केवळ सहा चित्रपटांनी खर्च वसूल केला, तर एकूण १५० चित्रपटांची निर्मिती झाली होती.”
चित्रपट निर्मिती थांबवण्यामागचं कारण
गोडबोले यांनी स्पष्ट केलं की, त्यांच्या ‘इंडियन मॅजिक आय’ या निर्मिती संस्थेने चित्रपट निर्मितीला ब्रेक दिला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे, “आम्ही टीव्हीत कमावलं आणि सिनेमात गमावलं.” त्यांच्या मते, चांगले चित्रपट असले तरी प्रेक्षक थिएटरमध्ये येत नाहीत. “लोक म्हणतात की, सिनेमे चांगले नसतात म्हणून बघत नाही. पण, चांगले चित्रपट काढले तरी लोक येत नाहीत. कौतुक होतं, पुरस्कार मिळतात, पण तिकीट बारीवर प्रतिसाद दिसत नाही. त्यामुळे शेवटी आर्थिक नुकसान टाळण्यासाठी आम्ही चित्रपट निर्मिती थांबवली,” असं त्यांनी सांगितलं.
सरकारकडून अर्थसाहाय्य आणि भविष्यातील वाटचाल
गोडबोले यांनी असंही नमूद केलं की, काही प्रमाणात सरकारी अनुदान चित्रपटसृष्टीला मिळत असलं तरी ते अपुरं आहे. त्यामुळे आता त्यांनी टीव्ही आणि डिजिटल माध्यमांकडे जास्त लक्ष केंद्रित केलं आहे. “चित्रपट निर्मितीपेक्षा सध्या आम्ही कार्यक्रम आणि मालिकांवर भर देत आहोत,” असं ते म्हणाले.
मराठी चित्रपटसृष्टीला नवा मार्ग हवा
श्रीरंग गोडबोले यांचे मत हे संपूर्ण चित्रपटसृष्टीसाठी विचार करण्यासारखे आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मच्या वाढत्या प्रभावामुळे ओटीटी आणि वेबसीरिज हा पर्याय भविष्यात अधिक महत्त्वाचा ठरू शकतो. तसेच, थिएटरमध्ये प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी नव्या रणनीतींची गरज आहे. मराठी चित्रपटसृष्टीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सरकार, निर्माते आणि प्रेक्षक या तिन्ही घटकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे, असं तज्ज्ञांचं मत आहे.