अचानक छातीत दुखल्यामुळे ए. आर. रहमान यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले अन्...
16-Mar-2025
Total Views | 14
मुंबई : प्रसिद्ध संगीतकार आणि ऑस्कर पुरस्कार विजेते ए. आर. रहमान यांना छातीत दुखू लागल्याने रविवारी सकाळी चेन्नईतील ग्रीम्स रोडवरील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय सूत्रांच्या माहितीनुसार, त्यांच्यावर ईसीजी, इकोकार्डियोग्राम तसेच इतर काही आवश्यक चाचण्या करण्यात आल्या आहेत. आज त्यांच्या अँजिओग्राम तपासणीची शक्यता असून, सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.
भारतीय संगीतसृष्टीतील एक अत्यंत यशस्वी संगीतकार म्हणून ए. आर. रहमान यांची ओळख आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार पटकावले आहेत. यामध्ये दोन अकादमी पुरस्कार, दोन ग्रॅमी पुरस्कार, बाफ्टा, गोल्डन ग्लोब तसेच सहा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचा समावेश आहे. तसेच, भारत सरकारने त्यांना देशाच्या तिसऱ्या सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मभूषणने सन्मानित केले आहे.
रहमान यांनी १९९२ मध्ये आपल्या संगीत कारकिर्दीची सुरुवात केली. दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या रोजा या चित्रपटासाठी त्यांनी संगीत दिले आणि ते प्रचंड गाजले. त्यानंतर त्यांनी तमिळ, हिंदी, तेलगू, मल्याळम, इंग्रजी, पर्शियन आणि मँडरिन अशा विविध भाषांमधील अनेक चित्रपटांना संगीत दिले आहे. दरम्यान, गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात ए. आर. रहमान आणि त्यांची पत्नी सायरा बानू यांनी घटस्फोट घेतला. तब्बल २९ वर्षांच्या संसारानंतर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. १९९५ साली विवाहबंधनात अडकलेल्या या दाम्पत्याला दोन मुली आणि एक मुलगा आहे.