संतोष जुवेकरने ट्रोलिंगला दिलं सडेतोड उत्तर; म्हणाला, ''अक्षय सर को नही मिलना मेरेको, असा माझा ॲटिट्यूड..."
15-Mar-2025
Total Views | 10
मुंबई : 'छावा' चित्रपटात रायाजीची भूमिका साकारलेला मराठी अभिनेता संतोष जुवेकरने काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत, "मी अक्षय खन्नाशी बोललो नव्हतो," असं म्हटलं होतं. त्यावरून त्याला ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं. अखेर या विषयावर फोकस इंडियन या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्याने मनोगत व्यक्त केलं आहे.
संतोष म्हणाला, "अक्षय खन्ना मोठा कलाकार आहे. मी केवळ ट्रोलिंग झालं म्हणून सारवासारव करत नाही. कदाचित लोकांनी माझं वक्तव्य अपूर्ण ऐकलं किंवा त्याचा चुकीचा अर्थ घेतला. औरंगजेबाच्या भूमिकेसाठी अक्षय खन्नाने स्वतःला पूर्णपणे त्या पात्रात झोकून दिलं. तो मुलाखती देत नाही, प्रमोशनसाठी हजर राहत नाही, हा त्याचा वैयक्तिक निर्णय आहे. त्याला त्याची गरजही नाही. आम्ही मात्र अजूनही स्ट्रगल करत आहोत." तो पुढे म्हणाला, "माझ्या भूमिकेचं महत्त्व कितीही कमी असो, तरी या ऐतिहासिक चित्रपटाचा भाग होणं माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. छत्रपती संभाजीराजे आणि मराठा इतिहासाविषयी माझ्या मनात गाढ आदर आहे. 'छावा' वाचल्यापासून हा इतिहास माझ्या हृदयात घर करून बसला आहे. त्यामुळेच औरंगजेबाचं पात्र पाहून मला राग येण हे स्वाभाविक आहे. माझा कोणाचाही अपमान करण्याचा हेतू ठेवला नव्हता, पण माझी प्रतिक्रिया खरी होती."
"मी किती बोलतो, माझा सिनेमातील रोल किती..; तरी मी बोलणार! माझी त्या चित्रपटात फक्त डोकावण्याची जरी भुमिका असली असती तरी मी बोललो असतो. छावा चित्रपटाचा भाग असणं ही फार मोठी गोष्ट आहे. फार लोकांना हे भाग्य नाही मिळत. अक्षय खन्नांचा विषय सांगायचा तर, पुरुष नाटकात एका बाईने नाना पाटेकरांना चालू प्रयोगात चप्पल फेकून मारली होती. प्रयोग झाल्यावर नानांनी 'ही चप्पल कोणाची आहे', असं विचारल्यावर ती बाई म्हणाली, 'माझी आहे, मला तुमचा राग आलाय'. नाना म्हणाले, 'धन्यवाद. पण मी चप्पल तुम्हाला देत नाही. कारण हे माझं अॅवॉर्ड आहे'. तो कलाकार इतक्या आत्मियतेने करतोय की त्या बाईला त्याची चिड येते.
तसंच माझी माझ्या महाराजांबद्दल एक आस्था आहे. छावा पुस्तक वाचून जो इतिहास मला कळालाय त्याचा माझ्यावर प्रभाव आहे. त्यामुळे माझ्या मनात त्यांच्याविषयी द्वेष निर्माण होणे साहजिक आहे. मला ट्रोल करणारा कोणीही तिथे असला असता ना, त्यानेही हेच केलं असतं याची मला खात्री आहे. पण याचा अर्थ, अक्षय खन्ना वाईट आहे असं नाही. मी सेटवर गेलो होतो तेव्हा आमचे असिस्टंट 'अक्षय खन्ना सरांना भेटायचंय का?' असं म्हणाले होते. पण अक्षय सर त्या गेटअपमध्ये होते ते बघून मला त्यांना भेटावंसं नाही वाटलं. अक्षय सर को नही मिलना मेरेको, असा माझा अॅटिट्यूड नव्हता. मला ते बघवत नव्हतं, म्हणून त्यांच्याशी बोललो नाही. अक्षय सरांचा मेकअप, त्यांनी वापरलेली बॉडी लँग्वेज ती बघून कोणाला चीड येणार नाही? त्यावेळेला माझी प्रामाणिक रिअॅक्शन मी शेअर केली. मला ट्रोल केलंय या गोष्टीला मी पॉझिटिव्हली घेतो. कारण यामुळे मला एक गोष्ट कळली की, अक्षय खन्नावर प्रेम करणारे अनेक लोक आहेत. अक्षयजी देखो लोग आपसे कितना प्यार करते है." अशा शब्दांमध्ये संतोषने ट्रोलिंगला उत्तर दिलंय.