वाढत्या तापमानामुळे रस्ता काँक्रिटीकरण कामे रात्री होणार

रत्स्यांची कामे सुरु असताना गुणवत्तेवर लक्ष ठेवण्याचे निर्देश

    15-Mar-2025
Total Views | 8

abhijeet bangar


मुंबई,दि.१५ : प्रतिनिधी 
येत्‍या तीन महिन्‍यांच्‍या कालावधीत रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण कामे अधिक गतीने राबविली जाणार आहेत. त्‍याचवेळी गुणवत्‍तेवरदेखील भर दिला जात आहे. रस्‍ते कामे सुरू असताना अभियंत्यांनी प्रत्यक्ष कार्यस्थळी (ऑन फिल्‍ड) उपस्थित राहणे अनिवार्य आहे, अधिक गतीने कामे करताना गुणवत्तापूर्ण कामांवर लक्ष केंद्रित करावे, असे सक्‍त निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत. दिवसापेक्षा रात्रीचे तापमान कमी असल्‍याने काँक्रिटीकरण कामे रात्री केली जात आहेत. त्‍यामुळे दुय्यम अभियंता, सहायक अभियंत्यांनी रात्रीच्‍या वेळी प्रकल्‍पस्‍थळी उपस्थित राहणे अनिवार्य आहे, असे देखील बांगर यांनी नमूद केले.

मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेली रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण कामे मध्यावस्थेत आहेत. महानगरपालिकेचे वरिष्‍ठ अधिकारी यांच्‍यासमवेत भारतीय तंत्रज्ञान संस्‍थेच्या (आयआयटी, मुंबई) तज्ज्ञांचा चमू, गुणवत्‍ता तपासणी संस्‍थेचे (क्‍यूएमए) प्रतिनिधी आदी प्रत्यक्ष कार्यस्थळास भेट देऊन महत्‍वपूर्ण निरीक्षणे नोंदवत आहेत. या निरीक्षणांवर चर्चा करण्याबरोबर रस्ते कामांची अत्युच्च गुणवत्ता, कामांमध्ये येणारी आव्हाने, अभियंत्यांच्या शंकांचे निरसन या सर्व बाबींच्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या रस्ते व वाहतूक विभागाच्या अभियंत्यांची विचारमंथन कार्यशाळा पवई स्थित भारतीय तंत्रज्ञान संस्‍था (आयआयटी, मुंबई) येथे गुरुवार, दि.१३ मार्च २०२५ पार पडली. त्‍यावेळी बांगर हे संबोधित करत होते.

अभिजीत बांगर यावेळी म्हणाले की, मुंबईकरांना पुरवण्यात येणाऱ्या दर्जेदार नागरी सेवा सुविधांचा एक भाग म्हणून रस्त्यांचे सिमेंट कॉंक्रिटीकरण कामे करण्यात येत आहेत. महानगरपालिका क्षेत्रात सिमेंट कॉंक्रिट रस्ते प्रकल्पाची अंमलबजावणी प्रभावीपणे आणि वेगाने सुरू आहे. कोणत्‍याही प्रकल्पाची अंमलबजावणी करताना त्यामध्ये गुणवत्तेबाबत आणि तांत्रिकदृष्ट्या कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी अभियंत्यांनी प्रचंड दक्ष राहणे गरजेचे असते. त्यासाठी प्रकल्पामध्ये कार्यरत असलेल्या घटकांसोबत चर्चा करून विचारमंथन होणे महत्‍वपूर्ण ठरते, जेणेकरून अडचणी असल्यास त्या योग्यरीत्या सोडवता येतात.


आयआयटी मुंबईचे उपसंचालक प्राध्यापक डॉ. के. व्ही. कृष्णराव यांनी काँक्रिट रस्त्याच्या आराखड्याबाबत तंत्रज्ञानाची माहिती आणि निकष, मुंबईतील तापमान आणि वाहनांची वर्दळ या अनुषंगाने सुयोग्य तंत्रज्ञान, दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण रस्त्यांसाठी आदर्श पद्धती, रस्त्याच्‍या आयुर्मनात होणारी वाढ यासह इतर आवश्यक बाबींचा उहापोह केला. रस्त्याच्या टिकाऊपणासाठी आणि तडे पडण्यास प्रतिबंध करण्यासाठी योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी जॉइंट कटिंग केल्‍यास काँक्रिटमधील तडे (क्रॅक्स) नियंत्रित करता येतात आणि रस्त्याचे आयुष्य वाढते. काँक्रिट सेट झाल्यानंतर ठराविक वेळेत संयंत्राच्‍या सहाय्याने हे जॉइंट्स कट करावेत, असेदेखील प्रा. के. व्ही. कृष्णराव यांनी उदाहरणासह स्‍पष्‍ट केले. सिमेंट काँक्रिट रस्त्याला पडणाऱ्या भेगांची कारणे आणि उपलब्ध उपाययोजना, या विषयावर प्रा. डॉ. सोलोमॉन देबर्ना यांनी मार्गदर्शन केले. रस्त्यावर कोणत्या पद्धतीच्या भेगा आहेत, ते पाहून कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर करावा, त्या उपाययोजनाही त्यांनी सांगितल्या. सध्या सिमेंट कॉंक्रिट रस्त्यावर पडणाऱ्या भेगांसाठी उपलब्ध असणाऱ्या तंत्रज्ञानाची त्यांनी माहिती दिली.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121