मराठ्यांचा इतिहास जगभरात पोहोचविण्यासाठी हिंदी-इंग्रजीतून साहित्यनिर्मिती आवश्यक : रोहित पवार

    15-Mar-2025   
Total Views | 29
 
interview with history research scholar rohit pawar
 
 
प्रसिद्ध बंगाली इतिहासकार सुरेंद्रनाथ सेन यांनी १०३ वर्षांपूर्वी ‘फॉरेन बायोग्राफिज ऑफ शिवाजी’ हा ग्रंथ लिहिला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राशी निगडित परकीय प्रवाशांनी नोंदवून ठेवलेल्या सार्‍या नोंदी संकलित करून, हा स्वतंत्र ग्रंथ प्रकाशित झाला होता. पण, आता इतक्या वर्षांनी पहिल्यांदाच हा ग्रंथ मराठीमध्ये अनुवादित करण्याचे शिवधनुष्य पेलले ते तरुण इतिहास अभ्यासक, संशोधक रोहित नंदकुमार पवार यांनी. आज, दि. १५ मार्च रोजी या पुस्तकाचे प्रकाशन भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर, पुणे येथे पार पडणार आहे. त्यानिमित्ताने रोहित पवार यांच्याशी दै. ‘मुंबई तरुण भारत’ने केलेली ही खास बातचीत...
 
  • ‘फॉरेन बायोग्राफिज ऑफ शिवाजी’ हा सुरेंद्रनाथ सेन यांनी लिहिलेला ग्रंथ, आपण मराठीत अनुवादित केला आणि लवकरच तो वाचकांच्या भेटीला येत आहे. तेव्हा, अनुवादासाठी ग्रंथ निवडण्यामागे नेमके काय कारण होते?
 
मराठ्यांच्या इतिहास संशोधनाला सुरुवात होऊन, आता एक शतकाहून अधिक काळ लोटला आहे. अनेक इतिहास संशोधकांनी यासाठी योगदान दिले. १०० वर्षांपूर्वी बंगालचे इतिहासकार सुरेंद्रनाथ सेन यांनी ‘फॉरेन बायोग्राफिज ऑफ शिवाजी’ हा ग्रंथ संपादित केला, ज्यात परकीय प्रवाशांनी, अधिकार्‍यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या नोंदींचा समावेश आहे. या नोंदींमधून शिवाजी महाराजांविषयी विलक्षण गोष्टी समजतात आणि एक वेगळे चित्रे उभे राहते. यातल्या काही नोंदी शिवचरित्राचा आढावा घेण्यासाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत. सेनांच्या काळात उत्तरेतील इतिहासकारांनी पूर्वग्रह ठेवून मराठ्यांच्या इतिहासावर लिखाण करून काही गैरसमज पसरवले होते. मात्र, सेन हे त्या सर्वांना पुरून उरले. ‘फॉरेन बायोग्राफिज’ हा ग्रंथ १०० वर्षे होऊनही मराठीत उपलब्ध नव्हता. मी त्याचा अनुवाद केल्याने मराठी वाचकांची, अभ्यासकांची सोय होणार आहे, याचे मला समाधान आहे.
 
  • ग्रंथलेखनाप्रमाणेच एखाद्या ग्रंथाच्या अनुवादाची प्रक्रियाही गुंतागुंतीची असते. याबाबतीत आपला काय अनुभव होता?
 
एखादे पुस्तक लिहिताना आपण आपली शैली खुलवू शकतो. पण, अनुवाद करताना मात्र यासाठी काही नियम असतात. त्यात ऐतिहासिक साधन ग्रंथांचा अनुवाद अधिकच जबाबदारीने करावा लागतो. हा अनुवाद करताना सुरेंद्रनाथ सेन यांच्याकडून ऐतिहासिक व्यक्तीचे नाव, ठिकाण यासंबंधी बर्‍याच त्रुटी राहून गेल्या होत्या. मी इतिहास अभ्यासक म्हणून मराठीत याचा अनुवाद करताना त्या दुरुस्त केल्या. ’ङरलेोीरपीें’ म्हणजे ’लखम सावंत’, ’ऊशलरशी’ म्हणजे ’देसाई’ अशा अनेक शब्दांचे मूळ शोधून त्यावर अतिरिक्त टिपाही यात दिल्या आहेत.
 
  • सुरेंद्रनाथ सेन यांच्या लेखनातून आपल्याला कोणता नवा ऐवज गवसला?
 
सुरेंद्रनाथ सेनांचे मराठ्यांच्या इतिहासात मोठे योगदान आहे. त्यांनी मराठ्यांच्या प्रशासकीय व्यवस्थेवर संशोधनात्मक काम करून बरीच माहिती लोकांसमोर आणली. ‘फॉरेन बायोग्राफीज’च्या निमित्ताने त्यांनी जगातील सर्वांत पहिले ‘पोर्तुगीज शिवचरित्र’ सर्वसामान्यांसाठी इंग्रजीत अनुवादित करून समोर आणले. ‘फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी’चा अधिकारी मार्टिन याच्या डायरीमुळे शिवाजी महाराजांच्या ‘दक्षिण दिग्विजय मोहीम’ याबद्दल अनेक बारकावे समोर आले. शिवाजी महाराज कसे दिसतात, हे सांगणारा थिवेनो हा फ्रेंच प्रवासी असेल किंवा राज्याभिषेकाला उपस्थित राहून त्या सोहळ्याचे वर्णन करणारा हेन्री ऑक्सिडेन हासुद्धा त्यानिमित्ताने अभ्यासकांना गवसला. शिवाजी महाराज आपल्या गुप्तहेरांवर प्रचंड पैसा खर्च करतात आणि विजयी होतात. सिंधू नदीपासून बंगालच्या उपसागरापर्यंत त्यांना राज्य करायचे आहे, असे लिहून ठेवणारा अ‍ॅबे कॅरे याचेही प्रवासवर्णन या ग्रंथात त्यांनी समाविष्ट केले आहे. याव्यतिरिक्त पुस्तकात अप्रकाशित डच पत्रेही वाचकांना आणि अभ्यासकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
 
  • महाराष्ट्रामध्ये आताच्या काळात इतिहास संशोधकांची आणि संशोधनाची स्थिती काय आहे?
 
आजच्या काळात अनेक तरुण इतिहास अभ्यासक तयार होत आहेत. मोडी लिपी, फारसी भाषा यांचा अभ्यास करून विविध माध्यमातून मराठ्यांचा इतिहास उजेडात आणण्याचे कामदेखील सुरू आहे. परंतु, यासाठी सरकारकडून कोणतीच योजना किंवा पाठबळ मिळत नाही, ही खंत आहे. काळही बदलत चालला आहे. त्यामुळे पुस्तकाचे महत्त्व जरी कायम राहिले, तरी सोशल मीडिया आणि पॉडकास्टसारख्या माध्यमांचा चांगला प्रभावी वापर इतिहास अभ्यासकांनी करायला हवा, असे मला वाटते.
 
  • भारताच्या इतिहासलेखनावर एकेकाळी ‘वसाहतवादी’ विचारसरणीचा पगडा होता. आज तो कमी झाला आहे का? इतिहास अभ्यासक म्हणून आपल्याला काय वाटते?
 
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर उत्तरेतील इतिहासकारांनी जाणूनबुजून शिवाजी महाराज हे केवळ बंडखोर, लुटारू होते, ही प्रतिमा तयार केली होती. पण, आता अनेक अभ्यासकांनी त्यांच्या लिखाणातून ही गोष्ट खोडून काढली आहे. एखाद्या विचारसरणीचा पगडा इतिहासावर लादण्याचे काम या काळात झाले होते. आजही ते होत आहे. हा सगळा प्रकार दुर्दैवी आहे. इतिहास हा केवळ साधनातूनच मांडला जावा, त्यावर कोणत्याही विचारसरणीचा पगडा असू नये.
 
  • छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचे कार्य चित्रपट, वेबसीरिजच्या माध्यमातून जगभरात पोहोचते आहे. इतिहास अभ्यासक म्हणून या प्रक्रियेकडे आपण कसे बघता?
 
चित्रपट, मालिका, वेबसीरिज हा काही इतिहास नाही. त्यात कादंबरीप्रमाणेच स्वातंत्र्य घेऊन वाचकांचे आणि प्रेक्षकांचे मनोरंजन केले जाते. इतिहासात कधीच न घडलेली घटना दाखवणे, अस्तित्वात नसलेली पात्रे रंगवणे यामुळे इतिहासाचा विपर्यास केला जातो. यावर प्रतिवाद करताना अनेकांचा सूर असतो की, यानिमित्ताने इतिहासाबद्दल जागृती होते आहे. पण, जागृती ही तात्पुरत्या काळासाठी असते. चित्रपटाचा प्रभाव काही काळ टिकतो. तो प्रभाव ओसरला की, माणूस सगळं विसरून जातो. पण, इतिहास अभ्यासक म्हणून मला असे वाटते की, खरंच आपल्याला जगभरात मराठ्यांचा इतिहास पोहोचवायचा असेल आणि भक्कम काम करायचे असेल, तर येणार्‍या काळात मराठ्यांच्या इतिहासावर हिंदी आणि इंग्रजीतून लिहायला हवे. हे काम दीर्घकाळ टिकेल. भारतातून मराठ्यांच्या इतिहासाबद्दल प्रचंड कुतूहल आणि मागणी आहे. पण, वाचकांना दर्जेदार पुस्तके उपलब्ध नाहीत. पुण्यातील इतिहास संशोधक डॉ. उदय कुलकर्णी यांनी तो प्रयत्न सुरू केला आहे. मी स्वतःदेखील यावर काम सुरू केले आहे.
 
  • भोवताली माहितीचा रेटा वाढलेला असताना आज इतिहासाच्या आकलनाची यथायोग्य साधने कोणती आहेत? त्यासोबतच इतिहास लेखन करताना इतिहासकारांनी कुठल्या गोष्टीची खबरदारी घ्यायला हवी?
 
‘नो डॉक्युमेंट, नो हिस्टरी’ अशी इतिहासाची साधी सोपी व्याख्या आहे. मात्र, आज तंत्रज्ञानाच्या युगात अनेक माध्यमे असताना ‘व्हॉट्स अ‍ॅप’सारख्या माध्यमातून इतिहास पोहोचवला जातो आहे. हा इतिहास अनेकदा अतिरंजित आणि चुकीचा असतो. त्याला संदर्भांची जोड नसते. यामुळेच मध्यंतरीच्या काळात संभाजी महाराजांची ६० किलोची तलवार आणि ४० भाकर्‍या अशी चुकीची माहिती देणारा संदेश फिरत होता. मला वाटते, आपण एक सुजाण नागरिक म्हणून अशा कोणत्याही मेसेजला प्रतिप्रश्न करायला हवा. त्या माहितीसाठी पुरावे द्या, असे आवर्जून विचारायला हवे. यातूनच समाज इतिहाससाक्षर होईल. आपल्या जातीच्या माणसाने मराठ्यांच्या इतिहासात मोठे योगदान दिले, असा अट्टहास करून रंजक कहाण्या रचल्या जातात. पण, मराठ्यांचा इतिहास देदीप्यमान आहे. त्याला अशा खोट्या अभिमानाच्या, अस्मितेच्या कहाण्या जोडण्याची मुळीच गरज नाही. अनेक जण कादंबरीला इतिहास मानतात, जे चुकीचे आहे. इतिहासकारांनी लिखाण करताना आपण लिहीत असलेल्या प्रत्येक वाक्याला संदर्भ आहेत ना, याचा विचार करूनच लिहायला हवे.
 
आजवर इतिहास अतिशय क्लिष्ट पद्धतीने मांडला, असे सर्वांचे मत आहे. त्यामुळे लिखाण करताना नव्या पिढीला समजेल अशी सोपी भाषा आणि शैली वापरली तर उत्तमच. कल्हणाने ‘राजतरंगिनी’ या ग्रंथात लिहिले आहे की, “राग, द्वेष, लोभ या भावना दूर करून इतिहासाचे कथन करणारी व्यक्ती सरस्वतीला वंदनीय असेल.” इतिहास अभ्यासकांनी हे सूत्र कायम लक्षात ठेवायला हवे.
 
 
 

मुकुल आव्हाड

मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.
अग्रलेख
जरुर वाचा
मराठी चित्रपटसृष्टिला धर्मा प्रॉडक्शनचं पाठबळ; ये रे ये रे पैसा ३

मराठी चित्रपटसृष्टिला धर्मा प्रॉडक्शनचं पाठबळ; ये रे ये रे पैसा ३ 'या' तारखेला होणार प्रदर्शित!

ब्लॉकबस्टर चित्रपटांनंतर, हिट मराठी कॉमेडी फ्रँचायझी तिसऱ्या भागासह परतली आहे.ये रे ये रे पैसा ३ अखेर येत आहे. यावेळी, निर्माते आणखी गोंधळ आणि मनोरंजनाचे आश्वासन देत आहेत. संजय जाधव हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत, तर त्यांनी आणि अरविंद जगताप यांनी एकत्रितपणे पटकथा लिहिली आहे. तेजस्विनी पंडित, संजय नार्वेकर, आनंद इंगळे, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, वनिता खरात, नागेश भोंसले आणि विशाखा सुभेदार या कलाकारांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट १८ जुलै २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. धर्मा प्रॉडक्शन्स ..