तुझी माझी धाव आहे ब्रीफकेसकडून बॅकपॅककडे!

Total Views | 15
 
article reviews the journey from briefcase to backpack
 
 
कालपरत्वे देशविदेशातील वेशभूषाच नव्हे, तर पादत्राणे आणि बॅगांच्या वापराचे ट्रेंड्सही बदलले. म्हणूनच आता बहुतांशी ब्रीफकेसची जागा बॅकपॅकने घेतलेली दिसते. तेव्हा, ब्रीफकेस ते बॅकपॅक या बॅगविश्वाचा प्रवास आणि त्यातील स्थित्यंतरांचा आढावा घेणारा हा लेख...
 
१९८० सालच्या दशकापर्यंत जगभरात कॅनव्हासचे साधे बूट किंवा शूज मिळत नव्हते, असे नव्हे. पण, असा एक अलिखित नियम होता की, कॅनव्हासचे शूज कोणताही खेळ खेळताना, धावण्याचा सराव करताना, कवायत करताना वापरायचे. ते साधारणपणे पांढरे शुभ्र असायचे नि ते तसे ठेवले जातील, राहतील याची काळजी खेळाडू, प्रशिक्षक, शिक्षक, विद्यार्थी, पालक असे सगळेच संबंधित लोक घ्यायचे. शाळेच्या पीटीच्या गणवेश परीक्षणात पायातले शूज पांढरे नसतील, तर रांगेतून बाहेर काढून फटके दिले जात असत. साधारण १९८५-९० सालच्या या काळात या कॅनव्हासच्या शूजचा एकदम भाग्योदय झाला. त्यांना ‘कॅनव्हास शूज’ म्हणणारे लोक एकदम गावंढळ ठरले आणि ‘स्निकर्स’ म्हणणारे लोक एकदम फैनाबाज (पक्षी फॅशनेबल) ठरले. याला कारण ठरल्या, खेळाचे सामान बनवण्यार्‍या दोन अग्रगण्य कंपन्या-‘आदिदास’ आणि ‘नाईकी.’
 
यापैकी ‘नाईकी’ ही जगातली सर्वांत मोठी क्रीडासाहित्य उत्पादन कंपनी आहे. ती अमेरिकन आहे. ‘एन-आय-के-ई’ याचा उच्चार खरे तर ‘नाईक’ असा झाला पाहिजे. पण, तो ‘नाईकी’ असा केला जातो. का तर म्हणे, ‘नाईकी’ ही ग्रीक पुराणकथांमधली विजयाची देवता आहे. ‘आदिदास’ हे नाव आपल्याला संस्कृत वाटू शकेल. पण, तसे काही नाही. अ‍ॅडॉल्फ डेसलर आणि त्याचा भाऊ रुडॉल्फ डेसलर यांनी ‘गेब्रूडर डेसलर शूफॅब्रिक’ या नावाने जर्मनीत क्रीडासाहित्य उत्पादन कंपनी सुरू केली. पुढे रुडॉल्फ वेगळा झाला. अ‍ॅडॉल्फ डेसलरने स्वतःच्याच नावाचे लघुरूप करून ‘आदिदास’ हे नाव घेतले. आज ‘नाईकी’ पाठोपाठ ‘आदिदास’ ही जगातील क्रमांक दोनची क्रीडासाहित्य उत्पादन कंपनी आहे. वेगळा झालेल्या रूडॉल्फ डेसलेरने आपली ‘प्युमा’ ही वेगळी कंपनी काढली. क्रीडा क्षेत्रात ‘प्युमा’ हे ही आज एक मोठे नाव आहे.
 
चामड्याचे जोडे किंवा बूट हे आवाज करतात. किंबहुना, बायकांच्या बुटांनी ‘टाक-टुक टाक-टुक’ असा नाजुक आवाज, तर पुरुषांच्या बुटांनी ‘खाड्-खाड्’ असा मर्दानी आवाज केलाच पाहिजे. त्या आवाजांंमधूनसुद्धा ऐकणार्‍यांच्या कानांपर्यंत-मनापर्यंत काही संदेश पोहोचत असतो. इथे थोडे विषयांतर करून एक सुंदर आठवण सांगतो. विजयादशमीला सर्वत्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची संचलने निघतात. मुंबईतल्या अशाच एका संचलनानंतरच्या उत्सवात, संघाचे तत्कालीन सरकार्यवाह हो. वै. शेषाद्रिजी हे प्रमुख वक्ता होते. संघ स्वयंसेवकाच्या प्रत्येक हालचालीतूनसुद्धा काहीतरी संदेश जात असतो, हे सांगताना शेषाद्रिजी म्हणाले, “संचलनात चालताना बुटाची टाच जोरात आपटली पाहिजे. त्याचा चांगला जोरात आवाज आला पाहिजे. हासुद्धा एक संस्कार आहे. आम्ही आमच्या म्हणजे, हिंदू समाजाच्या शत्रूंना असेच टाचेखाली चिरडणार आहोत, हा आत्मविश्वास आम्हाला आणि हा धाक शत्रूंना, या आवाजातून जाणवला पाहिजे.”
 
असो. तर चामड्याचे बूट आवाज करतात. पण, कॅनव्हासचे शूज अजिबात आवाज करत नाहीत. कारण, त्यांचे तळवे रबरी असतात. ‘टु स्नीक’ म्हणजे आवाज न करता हालचाली करणे, अशा अर्थाने या कॅनव्हास शूजना ‘स्निकर्स’ असा शब्द अमेरिकन बोलीभाषेत-स्लँगमध्ये प्रचलित होताच. अमेरिकन ‘नाईकी’ कंपनीने १९८५-९० सालच्या सुमारास नव्या पद्धतीचे कॅनव्हास शूज बाजारात आणले आणि त्यांना नाव दिले ‘स्निकर्स.’ यांच्या बांधणीत नवीन काय होते? तर वाजवीपेक्षा मोठा रबरी तळवा आणि वाजवीपेक्षा फारच मोठा बाह्य आकार; आतला पावलाचा आकार मात्र यथायोग्य. कोकणात अनेक ठिकाणी वेताळ, वेतोबा, मूळपुरुष, राखण्या अशा ग्रामदेवांची मंदिरे आहेत. या देवांना दरवर्षी ठराविक दिवशी भल्यामोठ्या चामड्याच्या चपला दिल्या जातात. या चपला पायात घालून देव रात्री गावात फिरतो आणि गावाचे रक्षण करतो, अशी समजूत आहे. वर्षभरात चपला झिजलेल्या आढळतात.
 
असो. तर माझा एक खेळाडू मित्र एकदा हे वाजवीपेक्षा भलेमोठे दिसणारे स्निकर्स घालून आमच्या घरी आला. तेव्हा माझी आजी हसत हसत त्याला म्हणाली, “हे तुझे बूट की वेताळाचे?” पण, लोकांना ही फॅशन आवडली. मग काय, बघता-बघता ‘नाईकी’सह ‘आदिदास’, ‘प्युमा’ आणि सगळ्याच गावगन्ना शूज उत्पादकांनी स्निकर्सच्या विविध प्रकारांनी बाजार गजबजून टाकला. खेळताना किंवा ‘कॅज्युअल वेअर’ म्हणूनच कॅनव्हास शूज वापरायचे आणि ऑफिसमध्ये जाताना मात्र कटाक्षाने चामडी बूटच घालायचे, असा जो अलिखित संकेत पूर्वी होता, तो आता पूर्णपणे बदलला आहे. मोठेमोठे बिझनेस एक्झिक्युटिव्ह किंवा सरकारी अंमलदारसुद्धा बेधडक स्निकर्स वापरतात.
 
अगदी हाच प्रकार ब्रीफकेसच्या बाबतीत झाला आहे. पूर्वी विद्यार्थी शाळेच्या वह्या-पुस्तके ठेवण्यासाठी दोन्ही खांद्यांवर येणारे बंद म्हणजे हँडल असलेली दप्तरे वापरत. श्रमिक लोक कामावर जाताना डबा ठेवण्यासाठी चक्क कापडी पांढर्‍या पिशव्या वापरत, तर पांढरपेशे लोक डब्बा आणि थोडेफार इतर साहित्य नेण्यासाठी दोन बंदवाल्या चामडी किंवा रेक्झीनच्या छोट्या बॅगा वापरत. या बँगा हातात धरल्या जात किंवा बंद खांद्याला अडकवून बगलेत धरल्या जात. त्या पुढचा टप्पा म्हणजे ब्रीफकेस. ऐटबाज ब्रीफकेस घेऊन ऑफिसला जाणारा इसम हा कुणीतरी अंमलदार असलाच पाहिजे, असे लोक समजत. मग फॅशन आली एका खांद्यावर किंवा क्रॉस पट्टा अडकवायच्या काळ्या कुळकुळीत चामडी किंवा रेक्झिन बॅगची. साधारण १९९०-२००० सालच्या दशकातली तरुण पोरे अशा बॅगांमधून, त्यावेळचा वजनाला जड असा लॅपटॉप घेऊन हिंडायची आणि आपणच बिल गेटस् किंवा स्टीव्ह जॉब्स आहोत, असा फुकट रुबाब मारायची. पण, यापेक्षा वेगळ्या प्रकारची बॅग कुणी ऑफिसत्त्व आपणे, हे फारच गावंढळ समजले जात असे.
 
पण, जग सतत बदलतच असते. ‘पिट्टू’ किंवा ‘हॅवरसॅक’ किंवा ‘बॅकपॅक’ ही सामान पिशवी एकेकाळी हायकिंग-ट्रेकिंग करणारे आणि सैनिकच फक्त वापरायचे. तीच बॅकपॅक थैली आज इतकी लोकप्रिय ठरली आहे की, सर्व व्यवसायांमधल्या साहेबांपासून शिपायापर्यंत सर्व लोक सर्रास बॅकपॅक वापरू लागले आहेत. लोकांच्या आवडीचा हा बदलता कल पाहून ‘दिओर’, ‘शॅनेल’, ‘सेंट लॉरेंट’, ‘मिस्टरी रँच’ अशा मोठमोठ्या डिझायनर कापडविक्या कंपन्या विविध प्रकारचे आकर्षक, टिकाऊ बॅकपॅक बनवत आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल की, गेल्या दोन वर्षांपासून युद्धमान स्थितीत असलेल्या युक्रेन देशातली ‘पॅकोलॅब’ ही कंपनी सध्या सर्वाधिक लोकप्रिय आहे. तिने बनवलेला बॅकपॅक सध्या साधारण ४०० डॉलर्सना विकला जात आहे. (सध्या एका डॉलरला ८७ रुपये भाव आहे. करा हिशोब!)
 
केदारनाथ हे देवस्थान उत्तराखंड राज्याच्या गढवाल भागात मंदाकिनी नदीच्या तीरावर वसलेले अत्यंत प्राचीन तीर्थक्षेत्र आहे. ते सुमारे ११ हजार फूट उंचावर आहे. संपूर्ण देशभरातून सर्व वयोगटांतले स्त्री-पुरुष यात्रेकरू तिथे येत असतात. ज्यांना चालणे-चढणे शक्य नाही, त्यांच्यासाठी दोन सोयी आहेत. पहिली म्हणजे घोडा. पण, अनेकांना घोड्यावर बसायची भीती वाटते. त्यांच्यासाठी दुसरा पर्याय म्हणजे पिट्टू. एक माणूस बूड आणि पाठ टेकवून बसू शकेल, एवढी एक मजबूत गवती करंडी किंवा टोपली असते. तिला दोन बाजूंना बंद असतात. यात्रेकरू त्या करंडीत बसतो. त्याला वाहून नेणारा माणूस करंडीचे बंद आपल्या दोन्ही खांद्यांवर अडकवतो आणि डोंगर चढू लागतो. थोडक्यात, पाठुंगळी बसण्याचाच प्रकार, पण बसणार्‍याने चालणार्‍याची कंबर दोन्ही पायांनी धरायची आणि हातांनी त्याचे खांदे धरायचे, हे जास्त दमछाक करणारे असते. शिवाय महिला यात्रेकरूंना अशा रीतीने पुरुष हमालाच्या पाठुंगळी बसायला फारच संकोच वाटतो. यासाठी करंड्याची योजना एकदम छान. यालाच म्हणतात ‘पिट्टू.’ कदाचित गढवाली भाषेत पाठुंगळी घेणे, यालाच ‘पिट्टू’ असे म्हणत असतील.
 
हा प्रकार इंग्रजी ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकार्‍यांना इतका आवडला की, सैनिकांच्या पाठीवरच्या सामानाच्या थैल्यांना सर्रास ‘पिट्टू’ हाच शब्द रूढ झाला. नंतर त्यांना ‘पिट्टू’ बरोबरच ‘हॅवरसॅक’ किंवा नुसतेच ‘सॅक’ म्हणू लागले. १९८० सालच्या दशकात महाराष्ट्रात गिर्यारोहण आणि गडकिल्ल्यांचे पदभ्रमण हा छंद झपाट्याने वाढू लागला. यात खूप मोठा वाटा होता, दुर्गभ्रमण छंदाचे पितामह म्हणता येईल अशा गोपाळ नीळकंठ उर्फ अप्पासाहेब दांडेकरांचा. गोनीदांच्या ‘शिवदुर्ग पदभ्रमण’ मोहिमांनी आणि या मोहिमांच्या रसाळ वृत्तांत लेखांनी भारावलेली खूप तरुण मुले प्रथम सह्याद्रीत आणि मग हिमालयात पदभ्रमण करू लागली. आता पदभ्रमण म्हटले की, थोडेफार सामान बरोबर हवेच. मग त्यासाठी पाठीवर मजबूत ‘पिट्टू’ किंवा ‘हॅवरसॅक’ हवेच. सामानाचा भार पाठीवर आणि कमरेवर गेला की, दोन्ही हात मोकळे.
 
मला आठवतेय की, पुण्याच्या जुन्या बाजारात भारतीय सैन्याच्या रद्दीत काढून टाकलेल्या ‘हॅवरसॅक’ यायच्या. तशाच दिल्लीच्या चांदणी चौकातल्या बाजारात भारतीय लष्कराच्या नि क्वचित अमेरिकन सैन्याच्यासुद्धा रद्दीत काढलेल्या ‘हॅवरसॅक’ मिळायच्या. आम्ही ट्रेकर मित्र त्या मिळवण्यासाठी जीव टाकायचो. गर्द शेवाळी रंगाच्या त्या लष्करी ‘हॅवरसॅक’ पाठीवर टाकून शिवरायांचे गड चढताना आम्हाला, आम्ही पण कुणीतरी शूर लष्करी जवान आहोत, असे वाटायचे.
 
पण, ट्रेकर्स आणि सैनिकांपुरताच वापर असणारे ते ‘पिट्टू’, त्या ‘हॅवरसॅक’ किंवा ते ‘बॅकपॅक’ आज लेटेस्ट फॅशन बनले आहेत. शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांपासून ते बिझनेस एक्झिक्युटिव्ह ते उच्च अंमलदारापर्यंत सर्व लोक सर्रास ‘बॅकपॅक’ वापरत आहेत. मोठ्यामोठ्या डिझायनर कंपन्या ते ‘बॅकपॅक’ अधिक सोयीस्कर, अधिक शोभिवंत कसे दिसतील, यासाठी कल्पना लढवत आहेत. लोकांना आश्चर्य वाटत आहे की, सामानाचे सगळे वजन पाठीवर आणि कमरेवर टाकून, हात मोकळे ठेवणारी ही पिशवी, आम्हाला यापूर्वीच का नाही मिळाली? उगाच आम्ही त्या ब्रीफकेसी हातात वागवायचो!

मल्हार कृष्ण गोखले

वीस वर्षाहून अधिक काळ चालू असलेल्या विश्वसंचार या लोकप्रिय सदरचे लेखक. विपुल प्रमाणात वृत्तपत्रीय लिखाण. आंतरराष्ट्रीय घडामोडीवर खुसखुशीत भाष्य. भारतीय इतिहास संकलन समितीच्या कोकण प्रांताचे सचिव. संस्कृत व समाजशास्त्र विषय घेऊन बी.ए.   

अग्रलेख
जरुर वाचा
२१ वर्षांनी पुन्हा रंगभूमीवर चतुरस्र अभिनेते सचिन खेडेकर; चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित

२१ वर्षांनी पुन्हा रंगभूमीवर चतुरस्र अभिनेते सचिन खेडेकर; चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित 'या' नाटकात दिसणार मुख्य भूमिकेत!

एखादा कलाकार कितीही मोठा झाला, कितीही राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवले, मसालापटांपासून चरित्रपटांपर्यंत आभाळाएवढ्या उंचीच्या व्यक्तिरेखा साकारल्या तरी रंगभूमीची ओढ कधीच संपत नाही. कोणताही हाडाचा कलाकार ठराविक वेळेनंतर पुन्हा तो रंगभूमीकडे वळतो, इथे होणाऱ्या तिसऱ्या घंटेसोबत व्यक्तिरेखेत शिरतो, प्रयोगांमागून प्रयोग करत त्यातच रमतो आणि जिवंत कला पाहण्याचा अनुभव रसिकांना देताना स्वत:लाही धन्य मानू लागतो. चतुरस्र अभिनेते सचिन खेडेकरही याला अपवाद नाहीत. मराठीपासून हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये ..

सर्वसमावेशक विकासासाठी पतपेढी चळवळ आवश्यकच : विद्याधर अनास्कर

सर्वसमावेशक विकासासाठी पतपेढी चळवळ आवश्यकच : विद्याधर अनास्कर

2025 हे वर्ष संयुक्त राष्ट्राने ‘आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष’ म्हणून जाहीर केले आहे. याच सहकार क्षेत्राचे जाळे महाराष्ट्रात खूप खोलवर रुजले आहे. त्यातील महत्त्वाचा भाग म्हणजे सहकारी वित्तीय संस्था आणि या वित्तीय संस्थांमधील महत्त्वाचा भाग म्हणजे, सहकारी पतसंस्था म्हणजेच सहकारी पतपेढी. सर्वसामान्य माणसांच्या जवळच्या आणि त्यांच्या अर्थकारणातही या पतसंस्थांना आजही जिव्हाळ्याचे स्थान आहे. पण, आज याच पतसंस्थांची चळवळ ही काही गैरप्रकारांमुळे संशयाच्या भोवर्‍यात सापडली आहे. त्यानिमित्ताने पतसंस्थांच्या अर्थकारणाचा, ..