‘सशक्त आपुल्या राष्ट्रातें। करणें असल्या योग शिका॥’ हा मंत्र जपत योगाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी झटणार्या नाशिकच्या स्वाती प्रमोद मुळे यांच्याविषयी...
वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी पितृछत्र हरपलेल्या स्वाती यांचा जन्म १९६८ साली नाशिकमधील भगूर गावी झाला. पुढे आजीआजोबांकडे बागलाण तालुक्यातील विरगाव येथे इयत्ता बारावीपर्यंतचे त्यांनी शिक्षण घेतले. त्यांना गायनाची विशेष आवड होती. पांडुरंगशास्त्री आठवले यांच्यासमोरही त्यांनी गायन केले. इयत्ता बारावीनंतर १९८८ साली प्रमोद मुळे यांच्याशी लग्न करून त्या मनमाडला आल्या. जेमतेम ८०० लोकवस्तीच्या ग्रामीण भागातून येऊन त्यांच्या प्रयत्न, जिद्द आणि चिकाटीतून त्यांनी उच्च शिक्षण घेऊन मनमाड पंचक्रोशीत आपल्या कर्तृत्त्वाचा ठसा उमटविला. लहानपणीच वडील गेल्यानंतर बर्याच ठिकाणी अवहेलना झाली. परंतु, तरीही स्वाती मात्र खंबीर होत्या.
घरसंसार सांभाळत, ‘बी.कॉम’ आणि ‘बी.ए.’ केले. नंतर योगविद्याधाम, नाशिक येथून ‘योगशिक्षक, योग अध्यापक’ ही पदवी घेऊन, त्यांनी संस्थेमार्फत योगवर्ग सुरू केले. हे करत असतानाच आणखी तीन विद्यापीठांतून योग व निसर्गोपचार तज्ज्ञ ही पदवी, तर योगशास्त्रामध्ये आणि संस्कृतमध्ये ‘एम.ए.’ केले. शिवाय, योगशास्त्रामध्ये ‘नेट’ ही परीक्षा उत्तीर्ण होऊन ‘योग प्राध्यापक’ ही पदवी मिळविली. त्या गेली ३० वर्षे योगक्षेत्रात कार्यरत असून, यौगिक शिक्षणाच्या अनुभवातून त्यांनी अनेक प्रकारचे योगवर्ग घेतले. योग परिचय, योग प्रवेश, स्थूलता निवारण, उंची संवर्धन, सामान्य योग, मनोविकार, योग संस्कार वर्ग, महिलांच्या विविध समस्या जसे की, मासिक पाळीचे विकार, पीसीओडी, थायरॉईड, गर्भसंस्कार असे अनेक प्रकारचे योगवर्ग ऑनलाईन, ऑफलाईन संपूर्ण भारतात आणि परदेशातदेखील त्या घेत आहेत. हे वर्ग मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये त्या घेतात. त्यांनी आपल्या अनुभवातून वेगवेगळ्या विकारांवर योग थेरपी विकसित केल्या आहेत. आतापर्यंत त्यांनी दीड हजारांहून अधिक वर्ग घेतले असून, त्याद्वारे हजारो लोकांना त्यांनी योगाविषयी जागृत करत मार्गदर्शन केले.
स्वाती या उत्तम वक्त्यादेखील आहेत. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या विषयांवर व्याख्यानांसाठी त्यांना आमंत्रित केले जाते. आतापर्यंत अनेक ठिकाणी गायन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा यांचे परीक्षक म्हणूनही त्यांना बोलावले गेले. हे सर्व करताना संगीताची आवडदेखील त्यांनी जोपासली. गायन या विषयात त्या संगीत विशारद आहेत. तसेच, त्या रेकी ग्रॅण्डमास्टरदेखील आहेत. रेकीद्वारे अनेक रुग्णांवर उपचार करतात. योग आणि समाजकारणाबरोबरच राजकारणातही त्यांचा सक्रिय सहभाग आहे. भाजपच्या ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ अभियानाच्या नाशिक जिल्हा संयोजक म्हणून त्या सध्या काम पाहत आहेत. त्यांना ‘माणुसकी पुरस्कारा’नेही सन्मानित करण्यात आले आहे. अध्यात्माच्या आवडीमुळेच योग त्यांनी जास्त आत्मसात केला आणि त्यांच्या आतापर्यंत मिळालेल्या यशाला शेगावच्या गजानन महाराजांचे आशीर्वाद आहेत, असे त्या सांगतात. पती प्रमोद मुळे यांचे त्यांना मोलाचे सहकार्य लाभते. योगशास्त्रात ‘पीएच.डी’ करण्याचा त्यांचा मानस आहे. महिला सबलीकरण, महिला सक्षणीकरणासाठीही विविध प्रकरणांमध्ये महिलांच्या मदतीसाठी त्या पुढाकार घेतात. मनमाड शहरातील पहिल्या योगशिक्षिका म्हणून स्वाती मुळे ओळखल्या जातात.
“योगाला शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट केले पाहिजे. १५ मिनिटांचा ओंकार जपही समाविष्ट करायला हवा. योग शारीरिक, मानसिक पातळीवर काम करतो. समाजात तुम्ही कसे वावरले पाहिजे, तसेच नियम पाळून जीवन कसे जगावे, हे योगामुळे समजते. शरीरातील उर्जा वाढते, रक्ताभिसरण वाढते,” असेही स्वाती सांगतात. विशेष म्हणजे, मुस्लीम तरुणीनेही त्यांच्याकडून गर्भसंस्काराविषयी मार्गदर्शन घेतले आहे. “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक विशेषतः भाऊराव पाटील, भिकूजी (दादा) इदाते, शिरीशराव भेडजगावकर, नाना (विकास) फडके, जयंतराव रानडे यांचे संघकार्यामुळे अनेकवेळी घरी येणे असते. त्यावेळी चर्चेतून, त्यांच्या वागण्यातून जीवनात पुढे जाण्यासाठी खूप प्रेरणा मिळाली. या सगळ्यांचा त्याग आणि समर्पण बघून दुःखाशीसुद्धा कसे दोन हात करायचे आणि कठीण प्रसंगातही आयुष्यात नव्या उमेदीने कसे जगायचे, हे शिकले.
असाध्य शारीरिक व्याधींचा बाऊ न करता, त्याकडे दुर्लक्ष करून आपल्या ध्येयावर लक्ष ठेवून कार्य करावे, याचे जणू बाळकडूच मिळाले. असे म्हणतात की, ‘साधुसंत येती घरा तोचि दिवाळी दसरा’ किंवा ‘देवपूजा करता करता प्रत्यक्ष देवच दृष्टी पडावा’ याप्रमाणे, दि. ५ डिसेंबर २०१६ रोजी स्वतः सरसंघचालक आदरणीय डॉ. मोहनजी भागवत यांचे घरी आगमन झाले आणि घर त्या पुनीत पावलांनी पावन झाले आणि आतापर्यंत केलेल्या सेवेचे फळ मिळाल्यासारखे झाले,” असेही स्वाती सांगतात. श्री गजानन विजय ग्रंथात सांगितल्याप्रमाणे, ‘सशक्त आपुल्या राष्ट्रातें। करणें असल्या योग शिका॥’ हा मंत्र जपत योगाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी झटणार्या स्वाती मुळे यांच्या आगामी वाटचालीस दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा!