अमेरिकेतल्या हमास समर्थक रंजनी श्रीनिवासननं गुंडाळला बोजा बिस्तारा! असं काय घडलं की स्वतःहून परतली भारतात?
15-Mar-2025
Total Views | 11
वॉशिंग्टन डी सी : (Indian Student Ranjani Srinivasan Self-Deports) अमेरिकेत पॅलेस्टाईन समर्थक निदर्शनांमध्ये सहभागी झाल्यामुळे त्यांचा विद्यार्थी व्हिसा रद्द करण्यात आला होता. कोलंबिया विद्यापीठात डॉक्टरेटची भारतीय विद्यार्थिनी असलेल्या रंजनी श्रीनिवासन हिचादेखील व्हिसा अमेरिकन प्रशासनाने रद्द केला होता. रंजनीने सीबीपी होम (Customs and Border Protection) अॅपद्वारे स्वतः देश सोडण्याचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे.. अमेरिकेतून परततानाचा रंजनी श्रीनिवासनचा एक व्हिडिओही समोर आला आहे.
अमेरिकेच्या गृह सुरक्षा विभागाने ( Department of Homeland Security - DHS) एक निवेदन जारी करून रंजनी श्रीनिवासनबद्दल माहिती दिली आहे. "रंजनी श्रीनिवासन दहशतवादी संघटनेला पाठिंबा देणाऱ्या कारवायांमध्ये सहभागी होती. ५ मार्च २०२५ रोजी परराष्ट्र विभागाने तिचा व्हिसा रद्द केला होता. ११ मार्च रोजी स्व-निर्वासनासाठी कस्टम्स अँड बॉर्डर प्रोटेक्शन (सीपीबी) एजन्सी अॅप वापरतानाचे व्हिडिओ फुटेज गृह सुरक्षा विभागाने मिळवले आहे," असे निवेदनात म्हटले आहे.
कोण आहे रंजनी श्रीनिवासन?
रंजनी कोलंबिया विद्यापीठात शहरी नियोजनात डॉक्टरेट करत होती. ती एफ-१ व्हिसावर अमेरिकेत शिक्षण घेत होती. त्याच वेळी, डिपार्टमेंट ऑफ होमलँड सेक्युरिटीजच्या आरोपनुसार, ती दहशतवादी संघटना हमासला पाठिंबा देत होती. रंजनीची शैक्षणिक पार्श्वभूमी खूप चांगली आहे. तिने कोलंबिया विद्यापीठातून शहरी नियोजनात एम.फिल केले. याशिवाय, ती स्कूल ऑफ आर्किटेक्चरमधून पदवीधर आहे. तिने हार्वर्ड विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी घेतली. यासह CEPT विद्यापीठातून बॅचलर ऑफ डिझाइन कोर्स देखील पूर्ण केला आहे.