मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Tushar Gandhi Controversial Statement) राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत वादग्रस्त टिप्पणी केल्याचे निदर्शनास आले आहे. केरळमधील तिरुअनंतपुरम येथे झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी रा.स्व.संघ या देशात 'कर्करोग' पसरवत असल्याचं म्हटलं होतं. त्यांच्या वक्तव्यानंतर अनेक ठिकाणी निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
गांधीवादी नेते गोपीनाथन नायर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी तुषार गांधी तिरुअनंतपुरम जिल्ह्यातील नेयट्टींकारा येथे पोहोचले होते. त्याठिकाणी उपस्थितांना संबोधत असताना, 'देशाचा आत्मा कर्करोगाने ग्रस्त आहे आणि संघ परिवार त्याचा प्रसार करत असल्याचे त्यांनी म्हटले'. इतकंच नाही तर, ही लढाई स्वातंत्र्य लढ्यापेक्षाही अधिक गरजेची असल्याचे ते म्हणालेत.
त्यांच्या या विधानावर अनेकांनी संताप व्यक्त केला असून तुषार गांधींनी याबाबत माफी मागावी अशी मागणी करण्यात आली आहे. विरोधानंतरही तुषार गांधी आपल्या विधानावर ठाम असल्याचेच दिसून आले.