बीडमधील २६ पोलिस कराडच्या मर्जीतले! पुरावे सादर करणार; तृप्ती देसाईंचा आरोप काय?
15-Mar-2025
Total Views | 17
पुणे : बीडमधील २६ पोलिस अधिकारी आणि कर्मचारी वाल्मिक कराडच्या मर्जीतले असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केला आहे. दरम्यान, यासंदर्भातील पुरावे सादर करण्यासाठी त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. तृप्ती देसाई यांनी याबाबतची माहिती दिली.
त्या म्हणाल्या की, "बीड जिल्ह्यातील वाल्मिक कराडच्या मर्जीतील २६ पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची यादी २७ जानेवारी रोजी मी जाहीर केली होती. तसेच गृहमंत्रालय आणि बीडच्या पोलिस अधिक्षकांनाही यासंदर्भात तक्रार केली होती. पोलिसांनी याची दखल घेऊन पुरावे सादर करण्यासाठी मला नोटीस जारी केली आहे. या नोटीसचे उत्तर देण्यासाठी सगळे पुरावे घेऊन सोमवार, १७ मार्च रोजी बीड पोलिस अधिक्षक कार्यालयात जाणार आहे."
"वाल्मिक कराडशी संबंधित पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांबद्दलचे सगळे पुरावे सादर करणार आहे. या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बीड जिल्ह्याच्या बाहेर बदली होणे गरजेचे आहे. तसेच चुकीचे काम करणाऱ्यांचे निलंबन होणे आवश्यक आहे," असे तृप्ती देसाई म्हणाल्या.
वाल्मिक कराडवर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड असल्याचा आरोप असून तो सध्या पोलिस कोठडीत आहे. याप्रकरणाचा तपास सुरु असून रोज नवनवीन माहिती पुढे येत आहे. दरम्यान, बीडमधील अनेक पोलिस वाल्मिक कराडशी संबंधित असल्याचा आरोप तृप्ती देसाई यांनी केला होता. आता त्यांनी पुरावे सादर केल्यानंतर या पोलिसांवर कारवाई होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.