सैन्य, युद्ध आणि अनामिक वीरांच्या गाथांचे मराठी साहित्यवैभव

    15-Mar-2025
Total Views | 8

Marathi literary
 
 
भारताच्या तिन्ही सीमांवर शत्रू कायमच कुरघोडी करत असतो. त्यात पाकिस्तान हा नित्याचाच झाला आहे. बांगलादेशी घुसखोरांची वाढती समस्या, हा या देशासमोरील मोठा प्रश्न. चीन तर गेली कित्येक वर्षे भारताशी आधुनिक पद्धतीचे युद्ध डावपेच खेळत आहेच. त्यामुळे साहजिकच भारतासमोरील आव्हाने ही प्रचंड मोठी आहेत. मात्र, मराठी साहित्यविश्व या सगळ्यापासून कोसो दूर आहे. देशासमोरील सुरक्षेच्या समस्या आणि त्याविषयीची मराठी साहित्यातील निर्मिती याचा घेतलेला आढावा...

भारता आम्ही तुलाच देव मानतो,हाच महाराष्ट्र धर्म एक जाणतो।
राखतो महान आमची परंपरा,
रक्त शिंपुनी पवित्र ठेवती धरा।
याच मातीवरी प्राण गेला तरी,
अमुची वीर गाथा उरे
मर्द आम्ही मराठे खरे।
 
नवी दिल्ली येथील 98व्या साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेकरिता लिहिलेल्या लेखाचा तिसरा आणि शेवटचा भाग खालीलप्रमाणे होता,
 
बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरी हा भारताला लागलेला कॅन्सर
 
आज चार ते पाच कोटी बांगलादेशींनी, भारतामध्ये घुसखोरी केली असावी. ही घुसखोरी अजूनसुद्धा पश्चिम बंगालमधून सुरूच आहे. दरवर्षी भारतीय पोलीस, तीन ते चार हजार बांगलादेशी पकडतात. परंतु, ही घुसखोरी थांबण्याचे काही लक्षण दिसत नाही.
यासाठी मतपेटीच्या राजकारणाला विरोध करावा लागेल. तसेच सातत्याने या समस्येच्या विरोधात लेखन आणि प्रचार करायला हवा. ही राष्ट्रीय सुरक्षेची समस्या आहे, हे लक्षात घेऊन सर्व राजकीय पक्षांनी एकत्र आले पाहिजे.
 
आताच झालेल्या निवडणुकांमध्ये, अनेक बांगलादेशींनी मतदान केल्याच्या बातम्या प्रकाशित झाल्या आहेत. घुसखोरी जर चालू राहिली, तर 2029 सालापूर्वीच आसाम व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदावर बांगलादेशी बसल्याचे पाहण्याची दुर्दैवी वेळ आपल्यावर येईल.
 
‘बांगलादेशी घुसखोरी भारताच्या सुरक्षेसमोरील सर्वात मोठे आव्हान?’ या विषयावर मी लिहिलेली पुस्तके सोडून, अजून कुठलीही पुस्तके प्रकाशित झाल्याचे दिसत नाही. जर यावरती पुस्तके प्रकाशित झाली, तर जास्त चांगले होईल.
 
आव्हान चिनी अनियमित युद्ध किंवा मल्टिडोमेन युद्धाचे
 
गलवानच्या लढाईमध्ये आपण चीनचे 70हून जास्त सैनिक मारले होते. चीनबरोबर पारंपरिक लढाईची आपल्याला चिंता करण्याची गरज नाही, चिंता आहे ती 365 दिवस चालणार्‍या हायब्रीड वॉरची.
 
सध्या चीनचे भारताविरुद्ध(आणि जगातील अनेक देशांविरुद्ध) एक नवीन प्रकारचे युद्ध चाललेले आहे. त्याला ‘हायब्रीड वॉर’, ‘ग्रे झोन वॉर फेअर’ किंवा ‘अनरिस्ट्रीक्टेड वॉर’ किंवा ‘अनियमित युद्ध’ म्हणून ओळखले जाते. हे युद्ध 365 दिवस सुरू असते आणि वेगवेगळ्या स्तरावर लढले जाते. या युद्धाचा उद्देश आहे की, भारतात हिंसाचार वाढवून, अराजकता माजवून, भारताच्या आर्थिक प्रगतीचा वेग कमी करायचा. त्यामुळे भारत चीनचा प्रतिस्पर्धी म्हणून पुढे येणार नाही आणि कायमचा चीनच्या आधिपत्याखाली राहील.
 
नवीन युद्ध, ‘अनरिस्ट्रीक्टेड वॉर’, ‘हायब्रीड वॉर’
 
2014 सालानंतर नवीन युद्ध सुरू झाले. ज्याला ‘अनरिस्ट्रीक्टेड वॉर’, ‘हायब्रीड वॉर’ किंवा नियम नसलेले युद्ध असे म्हटले जाते. या युद्धामध्ये चीन वेगवेगळ्या पद्धतीने, भारताची आर्थिक प्रगती थांबवण्याचा प्रयत्न करत आहे. याचे अनेक पैलू आहेत. आर्थिक युद्ध, व्यापार युद्ध, मानसिक युद्ध, प्रपोगंडा वॉर, सायबर युद्ध, सोशल मीडियात घुसखोरी इत्यादी
 
‘हायब्रीड वॉर’ ही एक लष्करी रणनीती आहे, जे पारंपरिक युद्ध, राजकीय युद्ध, अनियमित युद्ध, सायबर युद्ध, मानसिक युद्ध यांचे मिश्रण आहे. ‘हायब्रिड वॉरफेअर’ मुत्सद्देगिरी, निवडणूक हस्तक्षेप यांसारख्या इतर प्रभावी पद्धतींना एकत्र करते. हा लढा केवळ शस्त्रास्त्रांनी लढला जात नाही, तर त्यात लोकांची विचारसरणी बदलण्याचा प्रयत्न केला जातो. अशा प्रकारच्या युद्धात अफवा, चुकीची माहिती आणि बनावट बातम्या पसरवल्या जातात. इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या युगात असे करणे पूर्वीपेक्षा सोपे आहे.
 
आर्थिक युद्ध, व्यापार युद्ध
 
चीनने भारतात केलेली आर्थिक घुसखोरी, भारताशी चाललेले आर्थिक युद्ध किंवा व्यापार युद्ध हा एक महत्त्वाचा आयाम आहे. आर्थिक युद्ध लढण्याकरिता, आपण ‘आत्मनिर्भर भारता’च्या माध्यमातून चीनची आपल्या आर्थिक व्यवस्थेमध्ये झालेली घुसखोरी कमी करत आहोत. ‘मेक इन इंडिया’ला महत्त्व देऊन, चीनमधून येणार्‍या गोष्टी भारतात तयार करत आहोत. मात्र, ही लढाई अनेक वर्षे चालणारी आहे.
 
मानसिक युद्ध, प्रपोगंडा वॉर
 
मानसिक युद्ध, प्रपोगंडा वॉर, दुष्प्रचारयुद्धाकरिता चीनने भारतात अनेक जणांना विकत घेतले आहे. त्यांचे हस्तक भारताच्या प्रिन्ट, इलेक्ट्रॉनिक, आणि सोशल मीडियावर चीनच्या बाजूने प्रचार करतात. हे युद्ध, सामान्य माणसाच्या मोबाईलमध्ये घुसलेले आहे. हे युद्ध कसे जिंकायचे? त्यासाठी प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये देशभक्ती, देशप्रेमाची भावना जागृत व्हायला पाहिजे. त्यांनी चीनच्या दुष्प्रचाराला बळी पडू नये.
 
प्रत्येक भारतीयाने आपल्या देशाचे कान आणि डोळे बनले पाहिजे. भारताचे शत्रू कुठलाही दुष्प्रचार करत असतील, मानसिक युद्ध करत असतील अशांना शोधून, त्यांची माहिती आपल्या सुरक्षा यंत्रणेला दिली पाहिजे. ज्यामुळे हे युद्ध जिंकण्यात मदत मिळेल.
 
सायबर युद्ध
 
चीन आपल्यासोबत सायबर युद्ध लढत आहे. सायबर युद्ध जिंकण्याकरता आपल्याला, देशाची सायबर यंत्रणा अधिक मजबूत करावी लागेल आणि हे काम सतत सुरू राहणार आहे. ज्याप्रमाणे आपण आपल्या संगणकामधील अ‍ॅन्टी व्हायरस अपडेट करत असतो; त्याचप्रमाणे सायबर वॉरपासून वाचण्याकरता आपल्याला, देशाची सुरक्षा यंत्रणा अपडेट करावी लागणार आहे.
 
समाजमाध्यमांत घुसखोरी
 
चीनने आपल्या समाजमाध्यमांत घुसखोरी केली आहे. पण, आपण मात्र चीनच्या समाजमाध्यमांत घुसखोरी करू शकत नाही. कारण, समाज माध्यमे चिनी नियंत्रित आहे. त्यामुळे समाजमाध्यमांत त्यांच्या दुष्प्रचाराला कसे प्रत्युत्तर द्यायचे?
 
हायब्रीड युद्धाला प्रत्युत्तर
 
स्वतःचे रक्षण करणे हे नेहमीच कठीण असते. परंतु, ‘हायब्रीड ऑपरेशन्स’ आपणसुद्धा चीन, पाकिस्तानमध्ये करू शकतो. तुम्ही आमच्या देशामध्ये हस्तक्षेप केला, तर आम्हीसुद्धा तिबेट, शिनझियांग, हाँगकाँग इथल्या नेत्यांशी संवाद साधून, त्यांना आम्ही राजकीय मदत करू शकतो. हायब्रीड युद्धाच्या विविध प्रकारांमध्ये, चीन भारताच्या पुष्कळच पुढे आहे. म्हणून हायब्रीड युद्धाच्या प्रत्येक प्रकारच्या लढाईमध्ये प्रत्युत्तर देण्याची क्षमता, भारताला निर्माण करावी लागेल.
 
हायब्रीड युद्धात प्रत्येक भारतीय हा फ्रंट लाईन सैनिक आहे. कारण, हे युद्ध बंदुकीने लढले जात नाही. आता प्रत्येकाने स्वत:ला प्रश्न विचारला पाहिजे की, देशाला सुरक्षित करण्याकरता मी काय करू शकतो? प्रत्येक भारतीयाने चिनी वस्तूंवर बहिष्कार घालून, या युद्धात आपले योगदान दिले पाहिजे.
 
मराठी भाषेत चिनी ‘हायब्रीड वॉर’, ‘ग्रे झोन वॉर’, ‘अनरिस्ट्रीक्टेड वॉर’, अनियमित युद्ध किंवा मल्टिडोमेन युद्ध, आर्थिक युद्ध, व्यापार युद्ध, मानसिक युद्ध, प्रोपोगंडा वॉर, दुष्प्रचार युद्ध, सोशल मीडियात घुसखोरी, सायबर युद्ध, मुत्सद्देगिरी, निवडणूक हस्तक्षेप, वर काहीच साहित्य प्रकाशित झालेले नाही.
 
मल्टिडोमेन युद्धाविषयी अनभिज्ञता
 
अनेक सुशिक्षित असा प्रश्न विचारतात की, चीनबरोबर आपले तिसरे महायुद्ध तर होणार नाही? त्यांना ही कल्पना नसते की, चीन आपल्याशी गेले अनेक वर्षे, 365 दिवस, दिवसातून 24 तास मल्टिडोमेन युद्ध लढत आहे आणि देशातील नागरिकांना याविषयी माहिती नाही किंवा फारशी परवाही नाही. अनेक, खास तर कॉर्पोरेट वर्ल्ड चीनला आपला शत्रूच मानतच नाही आणि त्यांना वाटते की, चीनशिवाय ते आपला उद्योगधंदा चालवू शकत नाही. म्हणून हे अत्यंत जरुरी आहे की, चीन वेगवेगळ्या प्रकारे भारताची प्रगती कशी थांबवतो आहे, हे भारतीयांना कळायला पाहिजे आणि सगळ्यांनी योध्ये म्हणून, चीन विरुद्धच्या या युद्धामध्ये भाग घेतला तरच आपण चीनविरुद्ध मल्टिडोमेन युद्ध हे जिंकू शकतो.
 
मराठी साहित्यिक मल्टिडोमेन युद्धाविषयी मराठीमध्ये साहित्य निर्माण करून, देशभक्त नागरिकांना एक माहिती योद्धा आणि मल्टिडोमेन युद्धात देशाला सहकार्य करणारा देशभक्त नागरिक तयार करण्यामध्ये मदत करू शकतात. देशभक्त नागरिकांची चीन, पाकिस्तान आणि देशाच्या शत्रूंनी चालवलेल्या मल्टिडोमेनमध्ये काय जबाबदारी असेल? हा सुद्धा एक महत्त्वाचा विषय आहे. यासाठीच त्यावरती मराठी साहित्य निर्माण होणे आवश्यक आहे. मात्र, याकरिता मराठी साहित्यिकांना मेहनत करून मल्टिडोमेन युद्धाच्या वेगवेगळ्या आयामांवर साहित्य निर्माण करून, सामान्य जनतेला शिक्षित करावे लागेल.

हेमंत महाजन
अग्रलेख
जरुर वाचा