लेखक म्हणून रमेश पतंगेंचा नव्याने परिचय करून देणे अप्रस्तुत आहे. कारण, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व सकल हिंदू समाज यांच्यामध्ये सेतूबंधनाचे काम करणार्या ‘समरसता’ या मूल्याच्या निर्मितीपासून ते ‘गतिविधी’ म्हणून हे मूल्य रुजवण्यापर्यंत रमेश पतंगेंचे योगदान वादातीत आहे. अनेक पुस्तकांचे लेखक, विचारवंत, चिंतक, वक्ते म्हणून आज रमेश पतंगे ओळखले जातात. सा. ‘विवेक’च्या प्रदीर्घ संपादकीय कारकिर्दीदरम्यान 1996 साली रमेश पतंगेंनी ‘मी, मनू आणि संघ’ हे पुस्तक लिहिले. आजही हे पुस्तक संदर्भासाठी वापरले जात असले, तरी 80 ते 90च्या दशकात हे पुस्तक संघविरोधी खोट्या अपप्रचाराचा बुरखा फाडण्याचे महत्त्वाचे साधन ठरले होते. ‘ब्राह्मणेत्तरांना रा. स्व. संघात महत्त्वाचे स्थान नाही, असले तर ते गौण आहे,’ हा संघविरोधी दुष्प्रचार नव्वदीच्या दशकात जोरात होता. ‘मी, मनू आणि संघ’ या पुस्तकाने तथाकथित पुरोगामी ज्या मासलेवाईक निकषांच्या आधारावर समाजाची विभागणी करतात, त्याला सडेतोड उत्तर दिले. आर्थिक विषमता, वर्ण, जात या सगळ्यापलीकडे जाऊन रमेश पतंगेंची कारकीर्द संघ परिवारात बहरली व सन्मानजनक ठरली. अनुसूचित जाती-जमातींच्या काही अप्पलपोट्या पुढार्यांना व विचारवंतांना स्वतःची इंजिने धगधगती ठेवण्यासाठी संघविरोधाचे इंधन लागते. ‘आम्ही संघात का आहोत...’ हे पुस्तक या उरल्यासुरल्या विखारालाही उत्तर ठरावे असे आहे.
संघ समजून घ्यायचा असेल, तर संघात या, असे आवाहन संघाकडून होत असते. संघाविषयी कितीही सकारात्मक कुतूहल असले, तरीही समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला ते शक्य होईलच, असे मानता येणार नाही. ‘मी, मनू आणि संघ’ किंवा ‘आम्ही संघात का आहोत’ अशा पुस्तकांचा इथे चोख उपयोग होऊ शकतो. समाजाला संघ समजावून देण्याचे काम हे पुस्तक करेलच; परंतु सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी पुस्तकासाठी लिहिलेल्या प्रस्तावनेप्रमाणे आज संघात असणार्या अनुभवी स्वयंसेवकांनासुद्धा हे पुस्तक मुळातून संघदृष्टीने संघ आकळण्याचा पुनःप्रत्यय घेता येईल.
पुस्तक संपूर्ण वाचल्यानंतर रमेश पतंगेंनी संघ स्वयंसेवक म्हणून ज्या अमृताची अनुभूती घेतली, त्याचा गोडवा आपल्यालाही अनुभवण्याचा प्रत्यय येतो. एकूण 17 प्रकरणांत मांडलेल्या या पुस्तकात उपनिषदातील निरनिराळ्या जातककथांचा उत्तम उपयोग केला आहे. कुठल्याही कर्मठ स्वयंसेवकाला वयाच्या प्रत्येक टप्प्यावर संघ वेगवेगळ्या प्रकारे भेटत असतो. व्यक्तिगत अनुभूतीचा हा प्रवास कार्यकर्त्याच्या क्षमतांनुसार त्याच्या व्यक्तिमत्त्वात बदल घडवत जातो. स्वयंसेवक नाराज होऊन घरी बसतात किंवा संघ प्रचारकाचे आयुष्य स्वीकारून सर्वस्व समर्पण करतात. संघ जगण्याच्या या अवस्थांचे शिशु, बाल, तरुण, प्रौढ, परिपक्व अशा पाच स्तरांमध्ये रमेश पतंगेंनी निरूपण केले आहे. अत्यंत सर्वसाधारण क्षमतेचे स्वयंसेवक आपल्या समर्पण व सातत्य या गुणांमुळे प्रचंड मोठी कामे करतात. संघावरची श्रद्धा हे त्यामागचे महत्त्वाचे कारण. अटल बिहारी वाजपेयी, कुशाभाऊ ठाकरे यांच्यासारखे दिग्गज भारताला देणार्या नारायणराव तरटेंचे लहानसे, पण विलक्षण व्यक्तिचित्रण या पुस्तकात वाचायला मिळते. ‘छांदोग्य उपनिषदा’तील राजा जानुश्रृती आणि गाडीवान रैक्व यांची कथा रमेश पतंगेंनी इथे उद्धृत केली आहे. खरेतर पुस्तकाचा विषय जड आहे; पण सुलभ व मार्मिक शैलीत जगलेले तत्त्वज्ञान सुलभपणे मांडलेले आहे. या मांडणीला नर्मविनोदी खुसखुशीतपणाची किनारदेखील लाभली आहे.
जनसंघाच्या कार्यकर्त्यांना समाजात ‘तुमचा आर्थिक कार्यक्रम काय आहे हे सांगा,’ असा प्रश्न विचारला जाई. दीनदयाळजींनी ही गरज समजून ‘जनसंघाचे आर्थिक चिंतन’ या विषयावर वर्ग घ्यायला सुरुवात केली. रूढ अर्थाने राजकीय कार्यकर्त्यांना आवडते असे हे भाषण नव्हते. तिसरे सत्र झाल्यानंतर कार्यकर्ते दत्तोपंतांकडे गेले आणि म्हणाले, “दत्तोपंतजी, यह क्या चल रहा हैं? आधे से अधिक विषय सर के उपरसे जा रहे हैं।” दत्तोपंत हसून त्यांना म्हणाले, “आपने ही पुछा आर्थिक धोरण क्या हैं, वह समझाने के लिए वर्ग रखा हैं।” त्यावर तो कार्यकर्ता म्हणाला, “हमने ऐसा कब कहा था की, वह आर्थिक धोरण हमको समझना चाहिए। आप कह देते की, अपना आर्थिक धोरण हैं और दीनदयाळजी के पास सुरक्षित हैं, तो हमारा काम चल जाता।”
यातील मजेचा भाग सोडला, तर फारशा तात्त्विक चिंतेत न फसता, संघमूल्यावर निष्ठा ठेवून कार्यप्रवण राहणार्या स्वयंसेवकांची मनस्थिती इथे मांडली आहे. संघावरील सर्वच खोट्या आरोपांना या पुस्तकात उत्तरे दिली आहेत. ‘संघ जाणण्याची अवस्था’ हे प्रकरण या पुस्तकाचा परमोच्च बिंदू ठरावे. ‘तैतेरीय उपनिषिदा’चा व त्यातील जातककथांचा आधार लेखकाने इथे घेतला आहे. हे पुस्तक संघाची महती सांगणारे रटाळ स्तोत्र नाही, तर प्रारंभी म्हटल्याप्रमाणे हा रमेश पतंगेंच्या प्रौढावस्थेतील संघ अनुभूतीचा परिपाक आहे. पुस्तक लिहिताना यासाठी त्यांनी वापरलेला जागतिक परिपेक्ष या पुस्तकाला वेगळ्या उंचीवर घेऊन जातो. संघातील बैठका हा कधी कुतूहलाचा, तर कधी चेष्टेचा विषय; मात्र याच वारंवार बैठका घेण्याच्या कार्यपद्धतीने संघात निर्मळ लोकशाहीचे बीज रुजवले. या तुलनेत रशिया, चीन यांसारख्या देशांत चालणारी लोकशाहीची चेष्टा त्यांनी मांडली आहे.
देशाला ऐहिक भूमीचा तुकडा मानायचे की त्याला ‘राष्ट्र’ या संकल्पनेशी जोडायचे, ही प्रदीर्घ चालणारी चर्चा. ‘मातुष्का रोशिया’चे या पुस्तकात दिलेले उदाहरण खूपच भावस्पर्शी आहे. संघाचा सत्तेशी असलेला संबंध, राजसत्तेपेक्षा समाजसत्ता प्रबळ करण्याची संघाची संकल्पना, अशा कितीतरी मूलभूत संकल्पना रमेश पतंगेंनी या पुस्तकात समर्पकपणे विशद केल्या आहेत. संघ स्वयंसेवकांनी हे पुस्तक विकत घ्यावे, वाचावे, पुन्हा पुन्हा वाचावे. संघ समजून घेण्याच्या कुतूहलाने जी मंडळी आपल्याकडे येतात, त्यांना हे पुस्तक जरूर भेट द्यावे. संघविषयक बुद्धिभेदांचे निराकरण करण्यासाठी त्यांचा नक्कीच उपयोग होईल.
किरण शेलार
पुस्तकाचे नाव : आम्ही संघात का आहोत...
लेखक : रमेश पतंगे
प्रकाशक : विवेक प्रकाशन
पृष्ठसंख्या : 188
मूल्य : रुपये 250
पुस्तकासाठी संपर्क : 9594961858