कालिदासाचे ‘रघुवंश’

    15-Mar-2025
Total Views | 8
 

कालिदासाचे ‘रघुवंश’ 
 
संस्कृत साहित्यात एकसे एक थोर नाटककार झाले. त्यामध्ये कालिदास हा सर्वाधिक लोकप्रिय व सर्वश्रेष्ठ मानला जातो. म्हणून त्याचा ‘कवीकुलगुरू’ असाही गौरव करतात. कालिदास हे संस्कृत साहित्याला पडलेले सुरम्य स्वप्न आहे. त्याच्या उपमांना, विश्वसाहित्यातही तोड नाही. कवी कालिदासाचा काळ, स्थळ, जन्म आणि तो कोणत्या राजदरबारात होता, यावर अनेक वाद आहे. पण, त्याच्या साहित्यकृती हाच त्याचा खरा परिचय आहे. तीन अभिजात नाटके, दोन महाकाव्ये आणि दोन खंडकाव्ये असे विपुल साहित्य त्याच्या श्रेष्ठतेची अक्षरलेणी आहेत. ‘रघुवंश’ महाकाव्यात त्याने केवळ रामाचेच नव्हे, तर रघुवंशातील 29 राजांचे वर्णन केलेले आहे. 19 सर्गांचे हे महाकाव्य सूर्यवंशीय रघुकुलाच्या महानतेचे गुणसंकीर्तन आहे.
 
संस्कृत साहित्याने भारतवर्षाला जे महान साहित्यिक दिले, त्यामध्ये आदिकवी वाल्मिकी, व्यासांप्रमाणेच नाटककार कवीकुलगुरू ‘कालिदास’ एक जगविख्यात महाकवी आहे. संस्कृत साहित्यविश्वाला पडलेले सुरम्य सुंदर स्वप्न म्हणजे कालिदास! असा त्याचा केलेला गुणगौरव सार्थ व समर्पक आहे. संस्कृत अभिजात साहित्यात ‘पंचमहाकाव्यम’ म्हणून ज्या काव्यग्रंथांना सर्वोच्च सन्मान दिला जातो, त्या पंचमहाकाव्यात कवीकुलगुरू कालिदासकृत ‘रघुवंश’ आणि ‘कुमारसंभव’ या दोन महाकाव्यांचा समावेश आहे. कालिदासाच्या साहित्यिक गुणसमुच्चयातील उपमा जगविख्यात आहेत. म्हणून ‘उपमा कालिदासस्य’ असा त्याचा गौरव साहित्यविश्वात अजरामर आहे.
 
अनेक मतमतांतरे
 
भारतातील अनेक ऋषी, संत, थोर साहित्यिक यांच्याप्रमाणेच कवी कालिदासाची ठोस, सबळ आधाराधिष्ठित माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे कालिदासाचा जन्म, गाव, काळ या सार्‍या गोष्टी वादग्रस्त आहेत. काहींच्या मते तो उज्जैनी येथील असावा. राजा विक्रमादित्याच्या इसवी सन पूर्व काळात तो राजकवी होता. पण, काहींच्या मते तो चौथ्या शतकात, गुप्त घराण्यातील समुद्रगुप्त-चंद्रगुप्त यांच्या दरबारात राजकवी होता. काहींच्या मते, तो कालिमातेचा उपासक असल्याने, त्याने ‘कालिदास’ नाव धारण केले होते; तर काहींच्या मते तो कट्टर शिवभक्त होता. उज्जैनी येथील एका शिवमंदिरातील शिवाचे नाव ‘कालिन’ आहे. त्यामुळेच ‘कालिदास’ नाव पडले असावे. त्यांच्या साहित्यातील विशेषतः मेघदूतमधील वर्णनावरून, काही अभ्यासक त्याला महाराष्ट्रातील रामटेक येथे तो राहात असावा असेही म्हणतात. सध्या तेथे (रामटेक) कालिदास विद्यापीठ, स्मारक आहे. काही अभ्यासक सम्राट विक्रमादित्याची कन्या विद्योत्तमा, ही त्याची पत्नी आणि गुरू होती असेही म्हणतात. खरंतर हा एकूण भारतीय सनातन परंपरेतील विचाराचाच परिपाक आहे की, बहुतेक कवी, संत, चिंतक यांनी खूप काही ग्रंथलेखन केले. पण, स्वतःबद्दल न लिहिण्यातच धन्यता मानली. आत्मलोपीवृत्तीने ईश्वराची उपासना भक्ती म्हणूनच, त्यांनी हे ‘अक्षरवाङ्मय’ निर्माण केले व त्याचे श्रेय ईश्वरी कृपेला देऊन स्वतःला निमित्तमात्र मानले. त्यावेळी हा आत्मलोपीपणा सद्गुण असेलही पण, आता त्यामुळे अभ्यासकांना त्या थोर महापुरुष साहित्यिकाबद्दल नेमकेपणाने सराधार काहीही सांगता येत नाही ही अडचण आहेच. असो.
 
कवी कालिदासांच्या नावावर अधिकृत विनावाद ज्या साहित्यकृती सर्वमान्य झाल्या आहेत, त्यामध्ये एकूण सात साहित्यकृती अजरामर झाल्या आहेत. कालिदासाची ही ‘अक्षर सप्तपदीच’ आहे. या सात साहित्यकृतींमध्ये ‘अभिज्ञान शाकुंतल’, ‘विक्रमोर्वंशीयम्’ आणि ‘मालविकाग्निमित्र’ अशी तीन अभिजात नाट्यकृती आहेत. तसेच, ‘रघुवंश’ आणि ‘कुमारसंभव’ ही दोन महाकाव्ये आहेत आणि ‘मेघदूत’, ‘ऋतुसंहार’ ही दोन खंडकाव्ये आहेत.
 
‘रघुवंश’ महाकाव्याचे विशेषत्व
 
‘रघुवंश’ हे कालिदासाचे महाकाव्य श्रीरामाच्या सूर्यवंशी रघुकुलातील राजांची दिव्य जीवनगाथा आहे. आपल्या इतिहासात अनेक मोठमोठी राजघराणी होऊन गेली आहेत. त्यापैकी ‘श्रीरामांचे’ सूर्यवंशीय रघुवंश घराणे आणि श्रीकृष्णाचे चंद्रवंशीय यदुकुल घराणे हे राजवंश विशेष प्रसिद्ध आहेत. ‘रघुकुल रीत सदा चली आयी । प्राण जाय पर बचन न जायी ।’ अशा सत्याधिष्ठित जीवनमूल्यावरच, रघुकुलातील राजांचे जीवन समर्पित होते. ‘रघुवंश’ या महाकाव्यात 19 सर्ग आहेत. त्यामध्ये रघुवंशातील ख्यातनाम अशा 29 राजांची जीवनचरित्रे समाविष्ट आहेत. त्यामध्ये राजा दिलीप, राजा रघु, राजा अज, राजा दशरथ आणि राजा राम हे पाच प्रमुख आहेत. त्याशिवाय रामानंतरचे लव, कुश आणि उत्तरकालीन काही राजे यांचाही कालिदासाने समावेश केलेला आहे. रघुवंशाचा प्रारंभ राजा दिलीपपासून होतो आणि शेवटचा राजा अग्निवर्ण यांच्या मनमानी-विलासी राजवटीने, या महान रघुवंशाचा शोकात्मिक अंत होतो. या राजांचे तपस्वी जीवन, या राजाचा पराक्रम, राजधर्म, सेवा समर्पित वृत्ती, सत्यनिष्ठा, भूतदया अशा श्रेष्ठ मूल्यांचे दर्शन तसेच, अधःपतन आणि अंत याची बहुविध रसांनी रसरसलेली गाथा, कालिदासाने रघुवंशातून अक्षरांकित केलेली आहे.
 
वागर्थाविव सम्पृक्तौ वागर्थप्रतिपत्तये ।
जगतः पितरौ वन्दे पार्वतीपरमेश्वरी ॥
 
रघुवंशाचा आरंभ कालिदासाने शिवपार्वती वंदनेने केलेला आहे. एकूण 1 हजार, 564 श्लोक-छंद असलेल्या, 19 सर्गात्मक या महाकाव्यातील पहिले एक ते नऊ सर्ग, हे श्रीरामाचे पूर्वज राजा दिलीप, राजा रघु, राजा अज आणि राजा दशरथ यांची जीवनगाथा कथन करणारे आहेत. त्यानंतर दहा ते 15 असे सलग सहा सर्ग, एकट्या प्रभु रामचंद्राची परम पुरुषार्थी रामायण कहाणी आहे. श्रीरामाला सहा सर्ग देऊन, कालिदास हे महाकाव्य प्रामुख्याने रामकथाच आहे हे दर्शवितो. सर्ग नऊमध्ये दशरथाचे हातून श्रावणबाळ वधाचा प्रसंग येतो आणि सर्ग दहामध्ये श्रीरामाचा विष्णुचा अवतार म्हणून जन्म होतो, हा कथाभाग मुख्य आहे. सर्ग 11मध्ये सीतास्वयंवर आदी कथाभाग, सर्ग 12मध्ये रामाचा वनवास, सीता अपहरण आणि थेट राम-रावण युद्ध इतका मोठा कथाभाग आहे. सर्ग 13मध्ये, लंकेहून राम सीताचे पुष्पक विमानाने अयोध्या आगमन. सर्ग 14मध्ये, रामाचा राज्याभिषेक, सीता डोहाळे, सीता त्याग असा कथा भाग आहे. सर्ग 15मध्ये लवकुश जन्म, सीता भूमीप्रवेश, श्रीरामाची अवतार समाप्तीने हा सर्ग समाप्त होतो. थोडक्यात कविकुलगुरू कालिदासाचे ‘रघुवंश’ संस्कृत महाकाव्यातील गौरीशंकर शिखर आहे.
॥ जय श्रीराम ॥

विद्याधर ताठे
9881909775
(पुढील लेखात : रामकथा मर्मज्ञ पद्मभूषण डॉ.कामिल बुल्के)
अग्रलेख
जरुर वाचा
मराठी चित्रपटसृष्टिला धर्मा प्रॉडक्शनचं पाठबळ; ये रे ये रे पैसा ३

मराठी चित्रपटसृष्टिला धर्मा प्रॉडक्शनचं पाठबळ; ये रे ये रे पैसा ३ 'या' तारखेला होणार प्रदर्शित!

ब्लॉकबस्टर चित्रपटांनंतर, हिट मराठी कॉमेडी फ्रँचायझी तिसऱ्या भागासह परतली आहे.ये रे ये रे पैसा ३ अखेर येत आहे. यावेळी, निर्माते आणखी गोंधळ आणि मनोरंजनाचे आश्वासन देत आहेत. संजय जाधव हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत, तर त्यांनी आणि अरविंद जगताप यांनी एकत्रितपणे पटकथा लिहिली आहे. तेजस्विनी पंडित, संजय नार्वेकर, आनंद इंगळे, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, वनिता खरात, नागेश भोंसले आणि विशाखा सुभेदार या कलाकारांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट १८ जुलै २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. धर्मा प्रॉडक्शन्स ..