डॉ. ईश्वर नंदापुरे हे समरसतेसाठी काम करणारे अत्यंत संवेदनशील आणि साहित्यिक विचारवंत. महाराष्ट्रातील साहित्य चळवळीचा वारसा समरसताशील बनवण्यासाठी त्यांचे योगदान मोठे आहे. त्यांच्या ‘माय अनटोल्ड स्टोरी’ (स्वकथन) ग्रंथाचे प्रकाशन दि. 15 मार्च रोजी नागपूर येथे संपन्न झाले. या सोहळ्यामध्ये अनेक मान्यवरांनी ‘माय अनटोल्ड स्टेारी’ या पुस्तकाबद्दल भाष्य केले. यानिमित्ताने या पुस्तकाचा परिचय करून देणारा हा लेख...
डॉ. ईश्वर तुकाराम नंदापुरे लिखित ‘माय अनटोल्ड स्टोरी’ हे आत्मचरित्र ‘लाखे प्रकाशन’ यांनी प्रसिद्ध केले आहे. एकूण 580 पृष्ठांचे हे आत्मचरित्र म्हणजे डॉ. ईश्वर नंदापुरे यांच्या संघर्षरत जीवनाची यशोगाथा आहे, असे म्हणावे लागेल. जीवन जगत असताना आपली भूमिका, भूमिकेतला संघर्ष जणू काही एकट्यानेच तो साकार केला आहे, याची प्रचिती हे आत्मकथन वाचताना वाचकाला आतून जाणवल्याशिवाय राहत नाही. मराठी साहित्यातल्या आत्मकथनामध्ये ‘माय अनटोल्ड स्टोरी’ हे निश्चितच स्वकथनाला एक नवीन वळण देईल असे वाटते.
दलित स्वकथने आपण अभ्यासत असताना, त्याची प्रेरणा ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची असते. खर्या अर्थाने या सगळ्या जीवनातल्या सुखदुःखांचे भागीदार आपण स्वतः असतो आणि आपणच आपले आदर्श निर्माण करावे, असा भाव व्यक्त करत असताना, आयुष्याच्या अखेरच्या कालखंडात आज मराठी साहित्यामध्ये पारंपरिक पद्धतीची आत्मचरित्रे अनेक मंडळींनी लिहिली. शंकरराव खरात, शांताबाई कांबळे, प्र. इ. सोनकांबळे, दया पवार अशी नावे घेत असतानाच डॉ. ईश्वर नंदापुरे यांची ‘माय अनटोल्ड स्टोरी’ हे आत्मकथन एका वेगळ्या वळणावर जाऊन उभे राहते. ही ‘अनटोल्ड स्टोरी’ अर्थात कधीही न सांगितलेली गोष्ट डॉ. ईश्वर नंदापुरे यांनी आपल्या विदेशात राहत असलेल्या नातीला सांगितली आहे. ही ‘स्टोरी’ अर्थात हे स्वकथन आपल्या नातीला सांगत असताना एखाद्या निवडुंगासारखी। ओबडधोबड, कुठेच आकार नाही, सर्वत्र त्या निवडुंगावर काटेच काटे पसरलेले, स्वतः ईश्वर यांची नात ईश्वरी म्हणते, ‘एक होता निवडुंग.’ मग ही नात कोण, तर तिचे नाव ईश्वरी आहे.
या नातीला ‘स्टोरी’ सांगताना सगळ्या वास्तविक जीवनाचा सारीपाट उलगडताना आपल्या भावनेचा परिस्पर्श डॉ. ईश्वर नंदापुरेे आपल्या स्वकथनातून प्रगट करताना दिसतात. त्यामुळे या आत्मकथनामध्ये एक प्रकारचे लालित्य आणि संयम प्रभावीपणे आलेले दिसते. ही नात आपल्या आजोबांना या गोष्टीचे इंग्रजी भाषांतर करू असे वचन देते आणि ईश्वर म्हणतात, आपण त्याची वाट पाहू.या आत्मचरित्राच्या अनुषंगाने ही एक जीवनविषयक जाणिवा प्रगट करणारी महाकादंबरीसारखी स्थिती आणि त्याचा आवाका आपल्याला आत्मकथनांमधून जाणवतो. इतकेच नाही, तर या आत्मकथनातील वेगवेगळे संदर्भ वाचकाला खिळवून ठेवतात. आपल्या वयाच्या अमृतकाळात मागे पुढे वळून पाहताना डॉ. ईश्वर नंदापुरे यांनी काळोख्या अंधारामध्ये सत्याचा प्रखर उजेड शोधत असताना, ते पुढे पुढे जात राहिले आणि त्यांच्या लेखन सामर्थ्याला एक नवी धार तयार होत गेली.
ईश्वर नंदापुरे यांना पूर्व विदर्भातील अकोट, चिंचाळ या जोड गावाचे स्मरण आहे. 200 वस्तींच्या या गावांमध्ये वैनगंगेच्या निळ्याशार अशा धारेमध्ये, जवळच असलेल्या पवनी, कोंढा, कोसार्यापासून चिंचाळाकडे जाणार्या रस्त्यावर अकोट अर्थात हे विदर्भातील भंडारा जिल्ह्यातील गाव. पवनीच्या दक्षिणेस निलजपर्यंत आणि पुढे नागपूर मार्गावरील भुयार अर्थात भिवापूर या गावापर्यंतचा परिसर आहे. हा डॉ. नंदापुरे यांच्या कर्मभूमीचा परिसर. त्या परिसरात वैनगंगेच्या किनार्यालगत वडसेपार, तर दुसर्या बाजूने आरमोरी ते साकोली असा जंगलपट्टा आणि तिकडे रामटेकपर्यंत संपूर्ण असे रानवैभव, त्याला आजही ‘अंभोर्याचा जंगल’ असे निसर्गरम्य परिसर म्हटले जाते.अशा या निसर्गरम्य परिसरामध्ये अकोट हे गाव. पण, हे गाव पूर्णपणे त्याकाळी जातवार विभागलेले, अलुतेदार-बलुतेदार पद्धतीने गावात काम करणारी सगळी माणसे, पण तितकीच एकदिलाने राहणारी, सांस्कृतिक जीवन जगणारी आहेत.
डॉ. ईश्वर नंदापुरे यांच्या आत्मकथनामध्ये गावाचे संस्कार त्यांच्यावर फार मोठ्या प्रमाणात झालेले दिसतात. त्यांच्या कुटुंबातील माय म्हणजेच त्यांची आजी. हे व्यक्तिमत्त्व अत्यंत उठावदार पद्धतीने रेखाटले आहे. अनेक संकटांवर मात करण्याची तिच्यात विलक्षण क्षमता आहे. मुळात जुन्या संस्काराने संस्कारित झालेल्या या पिढीवर नकळत पंढरीचा विठोबा आणि वारी याचा प्रभाव आजही ग्रामीण भागामध्ये, गावखेड्यामध्ये होताना आपल्याला दिसतो. ही सगळी कुटुंबातली मंडळी पंढरपूरला अधूनमधून जात असतात. अकोट या गावातच त्यांचा जन्म झाला. लेखकाचा जन्म याच घरात झालेला. याचे वर्णन ते आपल्या या आत्मकथनामध्ये करतात. ते म्हणतात, “हे घर पाहिल्यावर ते माल्याचे (नावी) घर कोणी म्हणू शकत नव्हतं, इतकं ते दुमजली देखणं आणि सुंदर असं घर. मुळात गावगाडा बलुतेदारीवर चालत असे.” या सगळ्या ग्रामीण व्यवस्थेचे वर्णन लेखक डॉ. ईश्वर नंदापुरे अत्यंत सामर्थ्याने करतात. पुढे आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवत असताना, माय म्हणजे आजीमुळे अर्ध्या एकराचा तुकडा जमीन पण शेतीपेक्षा घरातील माणसे तितकीच हिरवी. समृद्धीने संपन्न घरातील श्रीमंती बलुतेदारीतून मिळालेल्या दाणीवर अर्थात आजही ग्रामीण भागामध्ये पैशाचा देवघेव व्यवहार नसतो. एखाद्या कामाच्या बदल्यात त्यांना दाणे देण्याची अर्थात धान्य देण्याची पद्धत आहे. ती पद्धत ईश्वर नंदापुरे यांच्या घरी होती. अशा या जीवनव्यवस्थेतून जीवन संघर्ष करीत डॉ. ईश्वर नंदापुरे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित होऊन ‘शिका, संघटित व्हा, आणि संघर्ष करा’ या बाबासाहेबांच्या त्रिसूत्रीचा विचार करून नागपूरमधल्या कामठी स्थित एका मोठ्या कॉलेजमध्ये प्राध्यापक होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास, हा अत्यंत विलक्षण आणि तितकाच कष्ट प्रद आहे. डॉ. नंदापुरे यांचे आजोबा लहानपणी मृत्यू पावतात. पाच लेकरांचा गोतावळा, डोईचा पदर खांद्यावरून कमरेला खोचून लेकरांना वाढवणारी ती आजी, मर्दासारखा जगणारा बापू, जेव्हा त्यांना दुःख येते, तेव्हा ते तितकेच गहिवरून जातात. उकिरड्याचा पांग फिटतो. सोबत आपण माणसे आहोत. आपले दिवस पुढे जातील. आपलेही पांग फिटतील असा बाणेदारपणा इथे बापूंच्या जीवनात दिसतो. आपला बापू अर्थात तुकाराम या लेकरांना वाडग्यावर वस्त्रा-कैची कशी चालवायची, असे पोराला शिकवणार्या मायच्या कर्तृत्वाला पाहून लोक हसत, पण ती हिंमतवाली होती. दोन मुलांची ज्यांनी लग्न लावली, दोन युवांना पोतभर राणी छाप कलदार देणारी ती माय. खरंतर ‘माय’ हा स्वतंत्र कादंबरीचा विषय व्हावा, असे तिचे जीवन आणि तिची व्यक्तिरेखा लेखकाने ठसठशीतपणे उभी केली आहे.
डॉ. ईश्वर नंदापुरे यांनी आपला बाप आणि आपली आई तुळसा यांच्या संघर्षाचे चित्रण आपल्या या ‘माय अनटोल्ड स्टोरी’ या स्वकथनातून उभे केले आहेत. आर्थिकदृष्ट्या सर्व काही ठीक चाललेले असताना, या दोघांमध्ये जणू काही एक अबोल प्रेम होते. पण, कालांतराने ‘सवत’ प्रकरण सुरू होते आणि तुळजा आईचे मनस्वास्थ्य पूर्णपणे बिघडून जाते. ती आपल्या सासूला म्हणते, “माया कपारी जे लिवलं सटवी न ते थं भोगा लागलंच!” एका वाक्यातून तिची हाताशा आणि उद्ध्वस्त झालेले भावजीवन आपल्या लक्षात येते. निवेदन हे जरी कधी कधी प्रचलित मराठीतून होत असले, तरी या निवेदनात निसर्ग परिसराचे वर्णन, वैनगंगा नदीच्या किनार्यावरचा, आसपासच्या संपूर्ण ग्रामीण बोली भाषेचे ते एक प्रतिनिधित्व करते. दिनकरराव शब्दे गुरुजींनी गांधी विद्यालय, कोंडा कोसारा या गावी जागृती विद्यालय स्थापन केल्यामुळे शिक्षणाची गंगा या सगळ्या गावखेड्यांमध्ये वाहू लागली. डॉ. नंदापुरे एक यात्री होते. ते यात्रिक म्हणून आपला प्रवास करताना त्यांच्या वाट्याला आलेले निवडुंगासारखे जीवन डॉ. नंदापुरेंना ते जाणवते आणि हेच गाव आज धुक्यात हरवल्याची जाणीव त्यांच्या मनाला सतत होते. त्यांच्या मनावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या भजनांचा संस्कार झालेला होता. अत्यंत संयमी आणि शांत पद्धतीने आपले जीवनमान रेखाटताना डॉ. ईश्वर नंदापुरे कधीही आपला तोल बाजूला कुठे पडू देत नाहीत. त्यांच्या जीवनात अनेक कडू-गोड आठवणी निर्माण झाल्या. अनेक कठीण प्रसंग आले. पण, या सगळ्या कठीण प्रसंगांना समर्थपणे तोंड देत डॉ. ईश्वर नंदापुरे यांनी आपला जीवनक्रम कुठेही आक्रस्ताळेपणा न करता अत्यंत संयमीपणे सांगितला आहे.
वडिलांना न सांगता त्यांच्या खिशातून चोरलेले दोन रुपये आणि त्या दोन रुपयात आणलेली वही, पुस्तक, पेन्सिल, पोटदुखेपर्यंत खाल्लेला चिवडा, मॅट्रिकच्या परीक्षेचा फॉर्म भरण्याचा प्रसंग, सावत्र आईने त्यांच्या बापाला पैसे द्यायचे नाहीत हे म्हटल्याचा प्रसंग, शेवटी त्यांनी इतर नातलगांकडून 24 रुपये जमा करून फॉर्म कसा भरला आणि ते कसे भरतात या सगळ्या गोष्टींचे वर्णन ते अत्यंत प्रभावीपणे करतात.
अत्यंत अभावग्रस्त शाळेतील वातावरण, तेथील मनाला चटके लावणारे अनेक प्रसंग ते आपल्या आत्मकथेतून लिहून जातात. एकदा फाटक्या पॅन्टवर शर्ट इन करण्याचा प्रसंग, मागच्या बाजूने पॅन्ट फाटली म्हणून त्यांनी पाठीमागून शर्ट इन न केल्याचे दिसते, हे त्यांच्या जीवनातले कटू सत्य त्यांनी अत्यंत समर्थपणे आपल्या आत्मकथनामध्ये सांगितले. मुळात ते शर्ट इन केलेले नव्हते. मागे आपली पॅन्ट फाटली आहे, ते झाकले जावे म्हणून त्यांनी सुरुवातीला पुढे इन केले. शाळा बुडवायची नाही म्हणून ते शाळेत नियमित जायचे. इतकेच नाही तर याचे परिणाम शिक्षकांनी त्यांना शाळेत घेऊन त्यांचे कौतुक केल्याचे आत्मकथनात सांगतात. त्यांच्या मनातले शल्य निघून गेले आणि ते अंतर्मुख झाले. हे शिक्षकांच्या जीवनातील प्रसंग वाचकालाही अंतर्मुख करतात. अशा या विषम परिस्थितीमध्ये काळ अशा अभावग्रस्त काळामध्ये डॉ. ईश्वर नंदापुरे यांचे जीवन आणि मुले शिकावी, ही इच्छा वडिलांच्या मनात कशी प्रगट होते? एका लेखात प्रसिद्ध समीक्षक डॉक्टर मदन कुलकर्णी त्याच संदर्भात म्हणतात, मला आठवते, मी मराठी दुसरी असेन. एक मुलगा लांब शर्ट बहुधा वडिलांचा घालून आला होता. आता खाली काहीच नव्हते. त्यावेळी मास्तरांनी म्हटले उद्यापासून लंगोटी लावून ये. शर्ट घालून ये, पण शाळा बुडवायची नाही. अशा या मास्तरांना परिस्थितीची जाणीव करून देणारे वास्तव डॉ. ईश्वर नंदापुरे यांनी आपल्या या आत्मकथनामध्ये मांडलेे आहे. डॉ. ईश्वर नंदापुरे हे उत्तम कथाकार, उत्तम कवी, उत्तम नाटककार, उत्तम एकांकिका लिहिणारे, उत्तम पथनाट्य लिहिणारे, उत्तम समीक्षा लेखन करणारे, असे प्रतिभावंत लेखक आहेत.
त्यांच्या आत्मकथनांमधली ही लेखणीची पकड अत्यंत घट्ट झालेली आपल्याला दिसते. सामाजिक मराठी वाङ्मयाच्या क्षेत्रात त्यांनी केलेले काम हे अत्यंत भरीव असे आहे. डॉ. ईश्वर नंदापुरे यांच्या विपरीत परिस्थितीत ऊन, वारा, वादळ सहन करत वाढत असलेला हा निवडुंग त्यांची सहचारिणी रजनी उर्फ तारा त्यांच्या आधाराने ताठ उभा राहतो. त्याची दखल घेऊन हे आत्मकथन. वाचकांच्या मनाला हुरहूर लावणारे आहे. या आत्मकथनाचे वैशिष्ट्य असे आहे की, हे आत्मकथन अत्यंत संयमी आणि शांत अशा स्वभावाचे प्रतिनिधित्व करते.
डॉ. विजय राठोड
(लेखक आर. एस. मुंडले धरमपेठ कला आणि वाणिज्य महाविद्यालय, नागपूर येथे मराठी विभागात कार्यरत आहेत.)
9325290270
vijayraorathod1975@gmail.com