कोणी घर देता का घर...

    15-Mar-2025
Total Views | 10
 
घर
 
नाटक हा विषय तसा मराठी सारस्वतांच्या जिव्हाळ्याचा. अनेक दिग्गज कलावंतांचा वारसा मराठी रंगभूमीला लाभला. मात्र, या कलाकारांच्या यशाचे मर्म आपल्याला त्यांच्या बालपणातच सापडते. मात्र, सध्याच्या बालकलाकारांनाच त्यांच्या हक्काचे रंगमंदिर म्हणजे, कलाकाराचे घर मागण्याची वेळ आली आहे. बालकलाकारांच्या समोरच्या हक्काचे घर या समस्येवर केलेले भाष्य...
हा लेख मी घरातून लिहित नसून, पण एका कलाकाराला घर वाटावे असे हे ठिकाण आहे. मी रवींद्र नाट्य मंदिर, दादर येथे आहे. थोड्याच वेळात ‘महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धे’तले नाटक सुरू होणार आहे. आरती सुरू होण्याच्या आधी जशी तयारी सुरू असते, तसेच इथेही प्रकाशयोजना आणि संगीत देणार्‍यांची लगबग दिसते आहे. गाभार्‍याचे दार उघडण्याची उत्कंठा आहे. ऊर्जा सकारात्मक असून, अद्भुत काहीतरी अनुभवायला मिळणार असे वाटते आहे. माझी नजर चौफेर जाते आहे. लाल रंगाच्या खुर्च्या, लाल पडदे, लाकडी दार, प्रेक्षकांची कुजबुज. कोणी या वास्तूला ‘थिएटर’ म्हणतात, तर कोणी ‘रंगमंदिर’. पण घर? याला ‘घर’ म्हटले तर?
 
लहानपणापासून मला रंगमंदिरात यायची सवय. कधी वडिलांसोबत प्रेक्षक म्हणून, कधी मोठ्यांच्या नाटकासाठी छोटीशी मदतनीस म्हणून, तर कधी बालनाट्यातले सहभागी म्हणून. मला नाट्यमंदिर हे नेहमीच घरच वाटले. नुकतेच पु.ल.अकादमी प्रभादेवीच्या उद्घाटन सोहळ्यासाठी इथे आले होते. या वास्तूत काही फारच सुंदर बदल करण्यात आले आहेत. काळानुरूप झालेले आधुनिकीकरण पाहून शासनाचे, सांस्कृतिक विभागाचे कौतुक वाटले आणि अभिमानही वाटला. आपल्या महाराष्ट्रात नाट्यमंदिरे खूप आहेत; पण खरी गरज आहे ती नाट्यघरांची. म्हणजे त्यांची संख्या अधिक हवी, ते घर इतके स्वच्छ, सुंदर, टिकाऊ असावे, म्हणजे नाट्यमंदिरे नको? ती हवीच, पण असे ठिकाणही असावे जिथे दररोज जाता यावे. कलाकाराला जर नाट्यमंदिर त्याचे माहेरघर वाटत असेल, तर बालकलाकाराला ते त्याचे पाळणाघर वाटायला हवे. तुम्ही म्हणाल, नाट्यमंदिरे आहेत, आम्ही तिथे जाऊन नाटक बघतो, तुम्ही तिथे येऊन नाटक करता, आता हे आणिक घराबिराचे खुळ कशाला? तर मी म्हणेन, ही काळाची गरज आहे.थोडे लांबचे आणि मग थोडे जवळचे उदाहरण घेऊन सांगते. अमेरिका आणि ऑस्ट्रेलियात ‘कम्युनिटी स्पेस’ असतात. या जागा आपल्या नाट्यगृहासारख्या नसतात, मात्र त्या कलाकाराच्या गरजा भागवतात आणि तिथे नाटक सादरही होऊ शकते. अशा जागा, या तिकडे प्रत्येक नगरात आहेत. आपल्याकडे जागेचा तुटवडा नक्कीच आहे. पण, त्यांच्याकडे जास्त आहे ते नियोजन, कार्यसंस्कृती आणि राजकीय इच्छाशक्ती. आपली नाट्यसंस्कृती, नाट्यशास्त्राचा अभ्यास आणि दस्तावेज त्यांच्यापेक्षाही फार जुने आहेत. तरी आपण नाट्यघर उभारण्यात मागे का?
 
‘कोणी घर देता का घर’ असे म्हणत फिरायची वेळ जेव्हा माझ्यावर आली, तेव्हा मला परिस्थितीचे याचे गांभीर्य समजले. काही जण म्हणाले, “जागा खूप आहेत, पण पैसे आहेत का? जागा आहे, पण सोयी नाही. अहो, बालनाट्यच करता आहात ना, मग करा की जरा तडजोड.” मी म्हणाले, “नाही हो, मी 75 बालकलाकारांना घेऊन ‘बालमहानाट्य’ करते आहे, त्यासाठी हवे आहे.”
 
“हे बघा, शासनाचा हॉल मागाल तर तो सवलतीच्या दरात मिळेल. पण, तो मिळवण्यासाठी वेळ खूप जाईल, बघा. नाट्यमंदिरे आहेत, पण त्याच्यावर अधिराज्य व्यावसायिक नाटकवाल्यांचे.” मी म्हणाले, “नको. त्यांनी तरी कुठे करायचे प्रयोग? मला जिथे मुलांच्या आणि पालकांच्या दृष्टीने सोयीचे होईल अशी जागा हवी होती.” ते म्हणाले, “अवघड आहे.” खरंच अवघड आहे. कारण, आपण इतर गोष्टींएवढे नाटकाला महत्त्व दिलेले नाही. बालनाट्याला तर नाहीच नाही.
 
आज फक्त बालनाट्यासाठी असे एकतरी नाट्यगृह तुम्ही बघितले आहे का? खरेतर प्रत्येक नगरामध्ये असे नाट्यगृह हवे. शाळेत असतात पण, ते खासगी असतात. कार्यालय असतात पण, तिथे मुलांचा आवाज नको असतो. अशा नानाविध अडचणी आहेत. आज प्रत्येक नगरात खेळाचे मैदान असते, मग नाट्यगृह का नाही? ‘नटसम्राट’ नाटकातल्या आप्पासाहेब बेलवलकरांसारखी माझी स्थिती आहे. बालकलाकारांसाठी जागेची तडजोड करावी लागते ना, तेव्हा माझा जीव पिळवटतो. मग मी पण वणवण भटकते, कोणी घर देता का घर? म्हणत. मी महाल मागत नाही, मी मागते आहे घर. हक्काचे, बालकलाकारांचे, त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, विकास व्हावा म्हणून.
 
बालनाट्य बसवणे ही साधी गोष्ट नव्हे. नाटक म्हटले की वेशभूषा, केशभूषा, नेपथ्य, साहित्य सामग्री, प्रकाशयोजना, संगीत, सगळे आले. बरं या वस्तू ठेवण्यासाठीही जागा लागते. यावर माझ्यासकट सगळेच मार्ग काढतात आणि म्हणूनच बालनाट्य आजही आपल्याला बघायला मिळते. पण, का सतत मार्ग काढूनच नाट्यप्रयोग करायचे? उद्याच्या नटसम्राटांना हक्काची जागा नको?
तिथे अमेरिकेत प्रत्येक नगरात एक मिनी थिएटर आहे. सांस्कृतिक कार्यक्रमातल्या सहभागासाठी शाळेत राखीव गुण आहेत. तिथे प्रशिक्षकाला काही टक्के कर सवलत आहे. का? तर तो समाज उद्धाराचे काम करतो. वास्तविक ‘लायन किंग’सारखीच नाटकेच ते सतत बसवतात. आपल्याकडे तर याबाबतीत विविधतेची खाणच आहे. पण, मात्र नाटक सादर करताना अडचणी अजूनही फारच प्राथमिक आहेत. मी महाराष्ट्रभर एका व्यावसायिक नाटकाच्या निमित्त फिरते. तेव्हा ग्रामीण भागातील अवस्था पाहून असे वाटते की, ती नाट्यगृह फारच दुर्लक्षिलेली आहेत की काय! नाट्यगृहात येताच सुगंध दरवळतो आहे, खुर्च्या सुबक आहेत, रंगमंच तारांकित प्रकाशाने लखलखतो आहे, असे अमेरिकेतील नाट्यगृहासारखे फार कमी ठिकाणी वाटले. असे नाट्यगृह जर मिळालेच, तर ते संपूर्ण शहरात एकच असते. फार अपेक्षा ठेवाल तर शपथ.
 
असो, फार अपेक्षा न ठेवता, ‘नटसम्राट’मधील प्रसिद्ध वाक्यातच माझी वाक्य जोडली, ‘कोणी घर देता का घर? एका अगम्य साहसी बालनाट्यासाठी, चार भिंती नकोत, चार खुर्च्या द्या, छप्पर नसले तरी चालेल; पण सपाट जमीन द्या, मिणमिणते दिवे नको, एक तेवती समयी ठेवा, रंग चढवायला एक पेटी द्या, प्रेक्षकांना एक वाट द्या, लहान समजून कोणी उठवणार नाही, अशी हक्काची जागा द्या.’ खरे तेच लिहिते आहे वाचकांनो. नाटक करून मी दमत नाही. पण, ते करण्यासाठी घर मागून खचते आहे. खरं सांगते, अगम्य साहसी बालनाट्य हजारवेळा करायचे आहे. पण त्यासाठी आमची कैफियत ऐकून, पावले उचलणारा एक माणूस हवा आहे, रसिक मायबाप प्रेक्षक हवा आहे. आम्ही घेऊन येऊ आमची कला. नटेश्वर प्रसन्न व्हावा म्हणून, अफाट प्रयत्न करु आणि घरात येताना उचलून आणू आम्ही आमचा गणपती बाप्पा! पण, आमच्यासाठी नाही, तरी निदान या बाप्पासाठी तरी कोणी घर देता का घर!
 
वाचकांनो, माझ्या भावनांचे मी इथे नाटकीय रूपांतर करून लिहिले. काही साम्य आढळल्यास, तो केवळ एक योगायोग समजून सोडून देऊ नये. साम्य आढळलाच नाही, तर तुम्हाला वाटेल काय रडगाणे लावले आहे, आहेत तर सुंदर नाट्यगृह. बालनाट्य सादर करत असाल, तर सवलतीच्या दरात नाट्यगृह देतात. बालनाट्यासाठी शनिवार, रविवारचे सकाळचे सत्र राखीव असते, मग अजून काय हवे? पण,जेव्हा बालनाट्यासाठी नाट्यगृहाची तारीख हवी असते, तेव्हा कशाला? कधी? कुठे? केव्हा? याची उत्तरे दिल्यानंतरही प्राधान्य मिळतच नाही. त्याची वेगवेगळी आणि अनेक कारणे आहेत. पण साधारण असा सूर असतो.
 
कशाला? - तर बालनाट्यासाठी, मग त्याकरिता एवढे मोठे नाट्यगृह कशाला? एखादा शाळेचा हॉल पुरेल.
 
कधी? शनिवार-रविवार. अवघड आहे. पण, मग सकाळचे 9 ते 11 वाजताचे सत्र मिळेल? कोणत्या प्रेक्षकाला सकाळी 9 वाजता येण्याचा हुरूप असतो? मग आम्हाला प्रेक्षक मिळत नाहीत. त्यांना प्राईम टाईम हवा असतो.
कुठे? मोक्याच्या ठिकाणचे नाट्यगृह द्या. पण, मग ते व्यावसायिक नाटकांनी घेतलेले असते.
 
केव्हा? ठराविक दिवशी, ठराविक वेळ मिळूच शकत नाही. कारण, एक तर म्हटले तसे सगळ्यांना तीच वेळ हवी असते आणि कधी कधी तर एक अवघा महिना आधी तारीख मिळाल्याने, जाहिरातीसाठी वेळ पुरत नाही. व्यावसायिक नसल्यामुळे बाकीची गणिते, मग अवघड होतात. बरं बालनाट्याला खर्च कमी असतो, हा एक अजून गैरसमज. आम्हाला खूप खर्च असतो, शिवाय वेळ मर्यादा, स्वच्छता, सुरक्षा याच्याकडे विशेष लक्ष द्यावे लागते. शिवाय तिकिटाचे दरही कमीच ठेवावे लागतात.
 
आजच्या मुलांना काय हवे आहे? त्यांना हवे आहे एक घर. कला सादर करण्यासाठी. आजच्या पिढीला लाचार होऊन, हतबलतेने हक्काचे घर मागणे अमान्य आहे. आज जर आपण उद्याचा विचार करून पावले उचलली नाहीत, तर उद्याचा नट आपल्याला क्षमा करणार नाही. आजच्या पिढीला नाटकातील सगळेच करायचे आहे. पण, मग यासाठी लागते नाट्यगृह. ते मी त्यांना उपलब्ध कसे करून देऊ? त्यांना तशीच पायाभूत सुविधा मिळायला हवी.
 
सरकार प्रयत्नांना गती हवी आहे. नाट्यगृहे चालवण्याचे काम एखाद्या कलाकाराच्या देखरेखीखाली द्यायला हवे. भारताला आपल्याला पुढे न्यायचे आहे आणि नाटक जीवन कौशल्य शिकवणारी, विकसित करणारी कला आहे. त्यामुळे, To be or not to be, that should not be a question anymore. To be, to be, to be and that is the only answer. वाह! तिसरी घंटा वाजली, आता प्रभादेवी येथील देखण्या अशा रवींद्र नाट्यमंदिरात प्रयोग बघते. ‘आफ्टर ऑल, द शो मस्ट गो ऑन.’

रानी राधिका देशपांडे
raneeonstage@gmail.com
अग्रलेख
जरुर वाचा
मराठी चित्रपटसृष्टिला धर्मा प्रॉडक्शनचं पाठबळ; ये रे ये रे पैसा ३

मराठी चित्रपटसृष्टिला धर्मा प्रॉडक्शनचं पाठबळ; ये रे ये रे पैसा ३ 'या' तारखेला होणार प्रदर्शित!

ब्लॉकबस्टर चित्रपटांनंतर, हिट मराठी कॉमेडी फ्रँचायझी तिसऱ्या भागासह परतली आहे.ये रे ये रे पैसा ३ अखेर येत आहे. यावेळी, निर्माते आणखी गोंधळ आणि मनोरंजनाचे आश्वासन देत आहेत. संजय जाधव हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत, तर त्यांनी आणि अरविंद जगताप यांनी एकत्रितपणे पटकथा लिहिली आहे. तेजस्विनी पंडित, संजय नार्वेकर, आनंद इंगळे, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, वनिता खरात, नागेश भोंसले आणि विशाखा सुभेदार या कलाकारांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट १८ जुलै २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. धर्मा प्रॉडक्शन्स ..