रा. स्व. संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते व डोंबिवलीचे पूर्व शहर कार्यवाह बा. वा. तथा बाळासाहेब भागवत यांचे दि. 7 मार्च रोजी निधन झाले. बाळासाहेब डोंबिवलीमधील अनेक शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी होते. वनवासी, देहदान चळवळ, स्त्री-शिक्षण यांसारख्या सेवाकार्यात अमूल्य योगदान देणार्या बाळासाहेब भागवत यांच्या स्मृतींना उजाळा देणारा हा लेख...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मनुष्यनिर्माण व व्यक्तिमत्त्व विकास यांची संस्कारशाळा आहे. या शाळेतून प्रशिक्षण व सुसंस्कारित झालेल्या सामान्य स्वयंसेवकाने आपल्या जीवनातील पुढील काळात समाज संघटन, समाजधारणा व राष्ट्रउभारणी या कार्यात आपल्या शक्तिबुद्धीनुसार स्वत:ला समर्पण भावनेने झोकून द्यावे, अशी अपेक्षा असते. त्याच्यासमोर व्यक्ती, समाज व राष्ट्रजीवनात भौतिक प्रगती (अभ्युदय/समुत्कर्ष) व आध्यामिक सुख (नि:श्रेयस) साध्य करत, ‘परं वैभवं नेतुमेतत स्वराष्ट्रं’ हे लक्ष्य गाठावे, असे ध्येय संघाने ठेवलेले असते, असे संघ व संघपरिवाररूपी कार्यकर्ताधिष्ठित राष्ट्रव्यापी जनसंघटन या देशात गेल्या शतकापासून देशाच्या कानाकोपर्यांत कार्यरत आहे. त्याचे कार्य सातत्याने वर्धिष्णू होत आहे. याची दोन कारणे आहेत. एक म्हणजे अगदी संघ स्थापनेपासून त्याचे कार्य प्राचीन भारतीय संस्कृती व हिंदू चिंतन यावर आधारित सुस्पष्ट व सुनिश्चित सैद्धांतिक किंवा वैचारिक जगावर उभे आहे. दुसरे म्हणजे, आपला जीवितहेतू साध्य करण्यासाठी संघाने व संघपरिवाराने आपापल्या क्षेत्रासाठी नित्य विकसनशील अशी कार्यपद्धती निर्माण केली आहे. अशा या संस्कारशाळेतून आजवर स्वत:चा चेहरा विसरलेले (Faceless) लाखो कार्यकर्ते विकासित झाले आहेत व जीवनाच्या विविध क्षेत्रांत अनामिक राहून फारसा गाजावाजा न करता नि:स्वार्थ भावनेने व समर्पणवृत्तीने ते कार्यरत आहेत. आपल्या योगदानाची कोणी दखल घ्यावी, अशीही त्यांची अपेक्षा नसते. अशा शब्दश: लाखो कार्यकर्त्यांच्या मालिकेतील एक नाव म्हणजे, नुकतेच दिवंगत झालेले ज्येष्ठ स्वयंसेवक बाळकृष्ण वासुदेव तथा बाळासाहेब भागवत. संघाच्या पवित्र स्पर्शाने ज्यांच्या जीवनाचे सोने झाले, असे हे लखलखित व्यक्तिमत्त्व. संघाने त्यांच्या मनात रुजविलेले स्वप्न साकार करण्यासाठी मनापासून व व्रतस्थ भूमिकेतून कार्य करीत राहिलेला हा संघाचा एकनिष्ठ स्वयंसेवक. आयुष्यभर शिस्तबद्ध जीवन जगलेल्या बाळासाहेबांनी ‘विना दैन्येन जीवनम्‘ हा अनुभव तर घेतला आहे; पण निरोगी आयुष्य जगल्यामुळे ‘अनायासेन मरणं’ अनुभव घेतला. जीवनाविषयी सतत सकारात्मक, आनंदी व समाधानी वृत्ती व स्वभाव असल्यामुळे त्यांना हे सहज शक्य झाले. त्यांच्या बहुभाषायी व कर्तृत्व संपन्न परंतु, अनामिक जीवनाच्या परिचय करून देणे, हा या लेखाचा उद्देश आहे.
बालपण
बाळासाहेबांचे वडील हे पक्के ठाणेकर. ते ठाणे नौपाडा भागातील ब्राह्मण वसाहतीत राहत असत. ते रेल्वेमध्ये कारकून होते. घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच. घरात मुले व पत्नी मिळून पाच जणांचे छोटे कुटुंब. गरिबी असली तरी समाधानी असणारे. निवृत्तीनंतर त्यांनी ठाण्यात चरितार्थासाठी कोळशाची वखार घातली व प्रामाणिकपणे व्यवसाय केला. ठाण्यात संघ स्थापन झाल्यापासून ते संघाशी संबंधित होते. सेवाकार्याची त्यांना मुळातच आवड. त्यामुळे ते त्याही परिस्थितीत गरजूंना मदत करीत. तेथील ब्राह्मण सेवा संघाची वाढ होण्यास ते अखेरपर्यंत कार्यरत राहिले. तोच वसा त्यांच्या मुलांनी शिक्षण संपता संपताच पुढे चालू ठेवला.
अशा संस्कारसंपन्न घरात बाळासाहेबांचा दि. 19 मार्च 1933 रोजी जन्म झाला. भागवत कुटुंबाला वडिलांपासूनच संघसंस्काराचे व समाजसेवेचे बाळकडू मिळाले. त्याने प्रेरित होऊन वासुदेवरावांची तिन्ही मुले आजही कार्यरत आहेत. स्वत: बाळासाहेब वयाच्या 92व्या वर्षीही शेवटच्या श्वासापर्यंत संघात कार्यरत होते. त्याचे धाकटे बंधू आनंद भागवत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काही वर्षे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक होते. आजही ते संघकार्यात व सामाजिक सेवा प्रकल्पात कार्यमग्न आहेत. वासुदेवरावांची मुलगी शकुंतला ही बालपणापासून ‘राष्ट्र सेविका समिती’त जात होती. पुढे लग्नानंतर सौ. जयश्री बर्वे झालेल्या शकुंतला भागवत डोंबिवलीतील समितीच्या कामात अग्रेसर होत्या. तर अशा या सुसंस्कारी कुटुंबात बाळचे बालपण गेले. प्राथामिक शिक्षण झाले व वयाच्या 17व्या वर्षी मॅट्रिकची परीक्षा तो उत्तीर्ण झाला. याच काळात तो संघशाखेतही जाऊ लागला. संघ संस्कारांचे बीज त्याच्या जीवनात रुजले व पुढे ते फुलत, फळत राहिले. शिक्षण, समाजसंघटन व सेवाकार्यात तो आयुष्यभर कार्यरत राहिला.
ज्ञानसाधना
मॅट्रिक व ‘एसटीसी’ झाल्यावर बाळासाहेब रेल्वेच्या ठाकुर्ली (डोंबिवली) येथील ‘रेल चाईल्ड शिक्षण संस्थे’च्या शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले व आजन्म शिक्षणक्षेत्राशी जोडलेले राहिले. आपल्या या नोकरीतून त्यांनी 1989 साली स्वेच्छानिवृत्ती घेतली. तरीदेखील शिक्षणक्षेत्र व ज्ञानसाधना यात ते सातत्याने कार्यरत राहिले.
1958 साली त्यांचे लग्न झाले. संसार सुरू झाला. शिक्षकीपेशात ते रमले. पण, त्यांची ज्ञानसाधना कधीच संपली नाही. स्वबळावर, स्वाध्यायाच्या आधारावर त्यांनी उच्च शिक्षणाची साधना सुरू ठेवली. किंबहुना, त्यामुळेच संधी मिळूनही त्यांनी प्राथमिक शिक्षकाची नोकरी सोडली नाही. शिकवता शिकवता ते स्वतः शिकत राहिले. ‘हिंदी शिक्षक सनद (1956)’, ‘राष्ट्रभाषा पंडित (1958)’, ‘साहित्य प्राज्ञ मराठी (1960)’ या पदवी परीक्षा ते उत्तम श्रेणीत उत्तीर्ण झाले. पुढे 1973 साली ते मुंबई विद्यापीठातून ‘बी.ए. हिंदी’ व वयाच्या 42व्या वर्षी म्हणजे 1976 साली ‘एम. ए. हिंदी’ ते प्रथम श्रेणीत त्याच विद्यापीठातून उत्तीर्ण झाले. या काळात मराठीबरोबरच हिंदी भाषेवर त्यांनी असामान्य प्रभुत्व संपादन केले. हिंदी व मराठी भाषेतील उत्तमोत्तम ग्रंथांचा खजिना त्यांच्या संग्रही होता. ते विख्यात अनुवादकर्तेही होते. मराठीतून हिंदी व हिंदीतून मराठी असा अनुवादाचा सुगम प्रवास ते करीत राहिले. माझ्या माहितीप्रमाणे, ‘हिंदी विवेक’च्या सुरुवातीच्या काळात मार्गदर्शक म्हणूनही त्यांनी काम पाहिले. संघसाहित्याच्या अनुवादासाठी ते सदैव तत्पर होते. अनेक मराठी व हिंदी ग्रंथांचे त्यांनी अनुवाद केले. (‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंतीनिमित्त दिल्ली येथून प्रसिद्ध होणार्या ‘पांचजन्य’ या साप्ताहिकाच्या विशेषाकांत माझा लेख प्रसिद्ध झाला होता. त्याचा सुरेख हिंदी अनुवाद बाळासाहेबांनी मला करून दिला.) अगदी अलीकडे म्हणजे नव्वदीच्या उंबरठ्यावर असेपर्यंत बाळासाहेबांची ही अनुवादाची ज्ञानसाधना अखंडपणे सुरू होती. संघाने रुजविलेल्या निष्ठेचे हे फलित आहे. हिंदीवर त्यांचे असलेले प्रभुत्व माहीत असल्यामुळेच प्रा. राम कापसे हे जेव्हा 1989 साली लोकसभेचे खासदार झाले, तेव्हा त्यांनी बाळासाहेबांची स्वीय साहाय्यक म्हणून निवड केली. त्यासाठी काही वर्षे ते दिल्लीनिवासीही झाले होते. पुढे नाना देशमुखांचे स्वीय साहाय्यक म्हणून काम करण्याची विनंती त्यांना करण्यात आली होती. परंतु, वाढत्या प्रापंचिक जबाबदारीमुळे ती जबाबदारी बाळासाहेब स्वीकारू शकले नाहीत. मात्र, हा नकार म्हणजे बाळासाहेबांच्या कर्तृत्वाला व विश्वासार्हतेला मिळालेली पावतीच होती, असे म्हणणे अतिशयोक्तीचे होणार नाही.
संघकार्य
ज्ञानसाधनेत रमलेले बाळासाहेब संघकार्य कधीच विसरले नाहीत. त्यांची प्रभातशाखा कधीच चुकली नाही. याच शाखेचे पुढे ते कार्यवाहही झाले. त्यापुढे डोंबिवली पूर्व मंडल कार्यवाह आणि डोंबिवली शहर कार्यवाह अशाही जबाबदार्या त्यांनी यशस्वीरित्या पार पाडल्या. आपल्या कार्यकाळात शाखावाढ, उपस्थितीवाढ यावर जसे त्यांनी लक्ष केंद्रित केले, तसेच स्वयंसेवकांच्या बौद्धिक क्षमता वाढीवरही भर दिला. संघकार्याचा एक भाग म्हणून व्यापक जनसंपर्कातही त्यांनी लक्ष घातले. संघशाखेत येणारे आजचे स्वयंसेवक व न येणारे नागरिक-हिंदू नागरिक-हे उद्याचे स्वयंसेवक या भूमिकेतून व या विश्वासाने ते हा जनसंपर्क करीत. हा असा संघटनानिष्ठ जनसंपर्क करीत असताना ते त्या त्या कुटुंबाशीही जोडले जात. यातून ‘वहिनी’ या संस्थेशी ते जोडले गेले. त्यांच्या सहकार्याशिवाय संघकार्य वाढणे शक्य नाहे. हे त्यांनी ओळखले. ‘वहिनी’ या संस्थेशी संवाद साधताना त्यांच्या हे लक्षात आले की, अनेक जणींना उच्चशिक्षणाची संधीच मिळू शकली नाही. अनेक जणींना शिक्षण अर्धवट सोडून विवाहबंधनात अडकावे लागले. शिक्षण घेण्याची त्यांची इच्छा त्यांना पूर्ण करताच आली नाही. जनसंपर्कातून सामाजिक जीवनातील स्त्रियांच्या संदर्भातील ही उणीव भरून काढण्यासाठी व त्यांना उच्चशिक्षणाची संधी मिळवून देण्यासाठी आपण काहीतरी केले पाहिजे, हे बाळासाहेबांना प्रकर्षाने जाणवू लागले. त्यातून त्यांना त्याच्या जीवनाचा पुढचा मार्ग डोळ्यासमोर आला. स्त्रीशिक्षण विशेषतः स्त्रियांचे उच्चशिक्षण महात्मा फुले व सावित्रीबाई फुले, महर्षी कर्वे, डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांनी शिक्षणाच्या विशेषतः स्त्रीशिक्षणाच्या क्षेत्रात जे भरीव व प्रेरणादायी कार्य केले, तो वसा आपल्या कुवतीनुसार आपण पुढे का चालवू नये, असा विचार त्यांनी केला. ते ज्ञानाच्या क्षेत्रातील सूर्य असतील, पण मग आपण पणती होऊन जमेल तेवढा अंधार दूर का करू नये, असा विचार करून या एखाद्या शिलेदाराने स्त्री शिक्षणाचा आपला स्वतंत्र मार्ग शोधला.
स्त्रियांचे उच्चशिक्षण
सुट्टीच्या काळात व संसारी स्त्रियांच्या सोयीच्या वेळात म्हणजे सायंकालीन वर्ग स्त्रियांच्या उच्च शिक्षणासाठी घ्यावेत, असा निर्णय त्यांनी घेतला. राजाजी रोडवरील आदर्श विद्यालयात शाळेच्या नियमित वेळाव्यतिरिक्त त्यांनी हे वर्ग त्या शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या संमतीने सुरू केले. यासाठी त्यांचा प्रचंड जनसंपर्क त्यांना खूप उपयोगी पडला. या कार्याला संस्थात्मक रूप यावे, म्हणून त्यांनी ‘ज्ञानप्रबोधिनी’ या शिक्षण संस्थेची 1980 साली स्थापना केली. त्याचे सुरुवातीचे स्वरूप बहि:शाल मार्गदर्शन केंद्र असे होते. यासाठी त्यांनी आपल्या संस्थेला मुंबईच्या ‘एसएनडीटी वुमेन्स् युनिर्व्हसिटी’ या संस्थेशी जोडून घेतले. श्री. ना. दा. ठा. विद्यापीठाचे विद्यार्थिनींच्या उच्चशिक्षणासाठीच्या प्रवेशाचे, परीक्षांचे फॉर्म भरून घेणे, ते विद्यापीठात पोहोचते करणे, परीक्षांचे संचालन करणे, परीक्षांच्या निर्णयानंतर ते निकाल विद्यार्थिनींच्या घरी नेऊन देणे, परीक्षांच्या बाबतीत काही अडचणी निर्माण झाल्या, तर त्या तत्काळ दूर करणे, स्त्रियांना उच्चशिक्षणासाठी प्रोत्साहित करणे, अशी विधायक कामे संस्था सुरुवातीच्या काही वर्षांत करीत असे. या विद्यार्थिनींसाठी आपले समृद्ध ग्रंथालय त्यांनी निःशुल्क उपलब्ध करून दिले. पुढे त्यांनी विविध विषयांसाठी शैक्षणिक वर्गही सुरू केले. त्यासाठी उत्तमोत्तम शिक्षकांचा समूह तयार केला. (मी स्वतः काही वर्षे या समूहाचा सक्रिय सदस्य होतो.) स्वतः बाळासाहेब ‘बी. ए.’ व ‘एम. ए.’च्या वर्गांना हिंदी हा विषय शिकवत असत. या त्यांच्या शैक्षणिक उपक्रमातून शेकडो, नव्हे हजारो स्त्रियांना आपली उच्चशिक्षण पूर्ण करण्याची व पदवी प्राप्त करण्याची भूक भागवता आली आहे. बाळासाहेबांच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाला 50 वर्षे पूर्ण झाली, तेव्हा त्यांचा प्रकट सत्कार करण्यात आला. त्यावेळी एक गौरविका प्रसिद्ध करण्यात आली होती. त्या स्मरणिकेत सुमारे 40 विद्यार्थिनींनी आपल्या बाळासाहेबांबद्दलच्या भावना व्यक्त करणारे लेख लिहिले आहेत. (त्या मीही एक लेख लिहिला होता.) बाळासाहेबांनी लावलेली ज्ञानाची ही पणती सुमारे 35 वर्षे अज्ञानाचा अंधार दूर करून आसमंत उजळत राहिली.
सामाजिक कार्य
‘वनवासी कल्याण आश्रमा’ने चालविलेल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी अनेक वर्षे ते नियमितपणे व सातत्याने जात असत. तेथील गरजू विद्यार्थ्यांना सर्व प्रकारची मदत ते आपल्या क्षमतेनुसार करीत असत. त्यांचा जनसंपर्क दांडगा असल्यामुळे वनवासी क्षेत्रातील अनेक प्रकल्पांना लक्षावधी रुपयांच्या देणग्या, त्याबद्दलची कोणतीही वाच्यता न करता, त्यांनी मिळवून दिल्या आहेत. डोंबिवलीतील दधिची देहदान मंडळाला त्यांनी आपल्या प्रयत्नातून 600 सदस्य केले व चार लाख रुपये देणगीदेखील मिळवून दिली. हे एक केवळ उदाहरण. ‘देहदान’ याविषयी जनजागृती हे किती कठीण काम आहे, हे सर्वज्ञात आहे. समाजोपयोगी अशी अनेक कामे त्यांनी पडद्यामागे उभे राहून केली आहेत.
बाळासाहेब हे सर्वस्पर्शी वाचक व अभ्यासू वक्ते होते. अनेक शैक्षणिक व सामाजिक विषयांवर ते अतिशय प्रेरणादायी व्याख्याने देत. त्यांचे स्वयंसेवकासमोरील बौद्धिक वर्गही प्रभावी व विचार प्रवर्तक असत. इतकी सगळी ज्ञानसमृद्धी असूनही त्यांनी स्वतःचे असे सर्जनशील लेखन का केले नाही, हे मला न उलगडलेले कोडे आहे.
बाळासाहेबांचे जीवन इतके साधे, सोपे सरळ होते का? त्यांना आयुष्यात कटु अनुभव आलेच नाहीत का? याचे उत्तर नकारार्थी आहे. पण, त्याचे भांडवल करून दुःख करण्याचा त्यांचा स्वभाव नव्हता. दुःख, निराशा, वेदना, अपयश पचवून आनंदी राहावे हा त्यांचा स्वभाव होता. म्हणूनच ते कृतार्थ असे दीघायुष्य जगले. त्यांच्या या सामान्याकडून असामान्यत्त्वाकडे झालेल्या अनामिक, अप्रकाशित प्रवासाला विनम्र अभिवादन!
प्रा. श्याम अत्रे
9324365910