१२१२ ठिकाणी होलिका दहन, ६० हून अधिक मिरवणुका

रंगोत्सवात न्हाली संभल नगरी

    14-Mar-2025
Total Views |

Holi at Sambhal

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Holi at Sambhal) 
उत्तर प्रदेशात संभलमध्ये होळी आणि शुक्रवारची नमाज या दोन्ही गोष्टी शांततेत पार पडल्या. गेल्या वर्षी झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमिवर गेले काही दिवस संभलमध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र दोन्ही गोष्टी मोठ्या उत्साहात आणि कुठलाही विपरित प्रकार न घडता संपन्न झाल्या. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार संभळ शहरात पारंपारिक चौपई मिरवणूकही काढण्यात आली. एकूण १२१२ ठिकाणी होलिका दहन आणि ६० हून अधिक मिरवणुका निघाल्याचे जिल्हा दंडाधिकारी राजेंद्र पेंसिया यांनी सांगितले. 

हे वाचलंत का? : संघ क्षितिजावरील देदीप्यमान तारा निखळला

संभळमधील शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणानंतर गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात दंगल झाली होती. यात चार जणांना आपला जीव गमवावा लागला. पोलिसांसह अनेक जण जखमी झाले होते. या घटनेनंतर संभळमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले असल्याने यंदा होळी आणि शुक्रवारची नमाज एकाच दिवशी असल्याने प्रशासनाने कडक बंदोबस्त ठेवला होता. ड्रोनच्या माध्यमातूनही पाळत ठेवण्यात आली होती. संपूर्ण शहराची २९ सेक्टरमध्ये विभागणी करण्यात असून त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली होती.

मशिदीचे सदर जफर अली यांनी दोन्ही समुदायांना शांतता राखण्याचे आवाहन केले होते. होळी आणि शुक्रवारचे दोन्ही नमाज सौहार्दपूर्ण वातावरणात साजरे करावेत, असे ते म्हणाले होते. ठरल्याप्रमाणे शुक्रवारची नमाज दुपारी अडीच वाजता शांततेत पार पडली. गेल्या वर्षीच्या दंगलीनंतरचा हा पहिलाच मोठा उत्सव होता, जो शांततेत पार पडला. त्यामुळे भविष्यातही असेच सर्व सण शांततेत साजरे होतील, असा विश्वास लोकांमध्ये निर्माण झाला आहे. प्रशासनाची सक्रियता आणि लोकांच्या परस्पर समजुतीमुळेच हे शक्य झाले आहे.

अग्रलेख
जरुर वाचा