आज होळीचा सण! त्यामुळे आता रंग, पिचकारी अशा विविध साधनांनी बाजारपेठ सजली आहे. मात्र, दिवसेंदिवस हा सण पर्यावरणाकडे अक्षम्य दुर्लक्ष करूनच साजरा केला जात आहे. त्यामध्ये होळीसाठीची सामग्री असो किंवा रंगपंचमीचे रंग असो. हे सारे काही पर्यावरणपूरक पद्धतीने उत्साहात कोणतीही कमतरता न ठेवता कसे साजरे करायचे याचा घेतलेला आढावा...
'होली खेले नंदलाल बिरज मे होली खेले नंदलाल’ होळीचा सण जवळ आला आहे. होळी म्हणजे अगदी लहानांपासून मोठ्यांच्या आवडीचा सण. पौराणिक काळापासून, राधा-कृष्णाच्या रंगपंचमीचे वर्णन आपण वाचत आलो आहोत. होळी येते, मग दुसर्या दिवशी धूळवड व पाचव्या दिवशी रंगपंचमी. पण आता सोयीप्रमाणे, अनेक ठिकाणी होळीच्या दुसर्या दिवशीच रंगपंचमी साजरी केली जाते. भारत हा सणांचा देश आहे. प्रत्येक सण एका विशिष्ट पद्धतीने साजरा केला जातो. सणानिमित्ताने विशिष्ट खाद्यपदार्थही केले जातात. या सगळ्याचा त्या काळातील ऋतू, हवामान, आरोग्य, आनंद यांच्याशी घनिष्ट संबंध आहे. प्रत्येक सणाबरोबर विविध पौराणिक कथासुद्धा जोडलेल्या आहेत. होळीची कथासुद्धा अशीच सांगितली जाते. भक्त प्रल्हाद आणि हिरण्यकश्यपु यांची गोष्ट, तर सर्वांनाच माहीत आहे. हिरण्यकश्यपु हा राक्षस होता. त्याला भगवंताचे नाम अजिबात आवडत नसे व प्रल्हाद हा त्याचा पुत्र भगवद्भक्त. प्रल्हादाच्या मुखी सतत भगवंताचे नामस्मरण असे. आता हे कसे जमावे? हिरण्यकश्यपुने प्रल्हादाचे नामस्मरण थांबवण्याचे अनेक प्रयत्न केले. ना ना प्रकारे प्रल्हादाचा छळ केला. पण प्रत्येक वेळी भगवान धावून आले आणि त्यांनी प्रल्हादाला वाचवले. होलिका ही हिरण्यकश्यपुची बहीण. हिला वरदान मिळाले होते की, तिला अग्नी जाळू शकणार नाही. म्हणून हिरण्यकश्यपुने तिला सांगितले की, प्रल्हादाला मांडीवर घे व चितेवर बस. प्रल्हाद अग्नीत भस्म होईल; पण तुला वरदान आहे, त्यामुळे काहीच होणार नाही. त्याप्रमाणे, ती प्रल्हादाला मांडीवर घेऊन चितेवर बसली. प्रल्हादाचे नामस्मरण चालूच होते, पण झाले उलटेच. भगवंतांनी आपल्या भक्ताला वाचवले व होलिका तिच्या वाईट विचारांमुळे जळून गेली. म्हणून होळीत जे नष्ट व्हावे असे वाटते, त्याचे दहन केले जाते; अर्थात प्रतीकात्मक. सगळेच सण साजरे करण्याच्या पद्धतीत, काळाच्या ओघात खूप बदल झाले. यातील अनेक बदल पर्यावरणासाठीही योग्य नव्हते अणि नाहीतही. त्यामुळे सर्वच सण, पर्यावरणाचा विचार करून साजरे करण्याची आवश्यकता आहे.
पूर्वी जंगले खूप होती व माणसांची संख्या कमी. आता हे प्रमाण जवळपास व्यस्त झाले आहे, हे आपण सर्व सुजाण नागरिक जाणतोच. मग होळींची संख्या कमी करणे, प्रत्येक गल्लीबोळात होळी पेटवण्यापेक्षा छोट्या गावात ‘एक गाव एक होळी’ करू शकतो का? तसेच शहरात ‘एक विभाग एक होळी.’करता येईल का ? याचा विचार केला पाहिजे. लाकडाऐवजी आता गोकाष्ठ उपलब्ध आहेत, त्यांचा वापर करणेही योग्य ठरेल. आतापासून तापमान इतके वाढू लागले आहे, तर होळी पेटवून अजून वाढवायचे का? याचाही विचार करावा लागेल. काही ठिकाणी जिवंत झाडेच होळीसाठी तोडली जातात. एकीकडे आपण ‘झाड लावा, हिरवाई वाढवा,’ असे सांगतो. मग होळीसाठी मुद्दाम झाडं तोडणे योग्य होईल का? काही ठिकाणी रात्रभर होळी पेटती ठेवली जाते, तर काही ठिकाणी पाच दिवस. यासाठी किती लाकूड लागेल? याचा विचार आपण केला पाहिजे. या पद्धती त्या त्या काळात योग्य होत्या पण, आता त्यात बदल होण्याची गरज आहे. अनेक वेळा प्लास्टिक वापरू नका, गुटखा खाऊ नका इ. संदेश देण्यासाठी, त्यांची प्रतीकात्मक होळी केली जाते. प्लास्टिक हा राक्षस आहे किंवा प्लास्टिकच्या भस्मासुराने, आपल्याला ग्रासून टाकले आहे. हे कमी करण्यासाठी प्लास्टिकचा राक्षस उभा करतात, त्याच्याभोवती गुटख्याची पाकिटे वगैरे अनेक प्लास्टिकच्या वस्तू लटकवल्या जातात व त्याची होळी पेटवली जाते, जसे स्वातंत्र्यपूर्व काळात परदेशी कपड्यांची होळी केली गेली होती. पण प्लॅस्टिक जळणे खूप धोकादायक ठरू शकते. प्लॅस्टिक जळताना जो धूर निघतो, तो हानिकारकच असतो. अनेक ठिकाणी प्लॅस्टिक पटकन पेटते म्हणून चूल पेटवण्यासाठी, विटभट्टीसाठी प्लॅस्टिक जाळले जाते. पण हे आरोग्याच्या दृष्टीने हानिकारकच आहे.
हा सण दोन दिवस दिवस साजरा केला जातो. पहिला दिवस होळी. या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवणे, होळीला नारळ अर्पण करणे अशा विविध पद्धतींनी, प्रत्येक भागात होळी केली जाते. मग येते रंगपंचमी, हा तर रंगांचा सण. जीवनातील विविध रंगांचे प्रतिबिंब यात बघायला मिळते. या दिवशी, पांढरे कपडे परिधान करण्याची प्रथा आहे. संक्रांतीला काळी वस्त्रे परिधान केली जातात. कारण थंडीच्या काळात हा काळारंग फायदेशीर सिद्ध होतो, तर होळीपासून गरमीचा मौसम सुरू होतो. आता कपड्यांच्या रंगातदेखील बदल आवश्यक. पांढरा रंग उष्णता परावर्तीत करणारा आहे, हे सर्व आपण शाळेत शिकलो आहोतच. तेच सारे सणांच्या माध्यमातून प्रत्यक्ष आचरणात आणले जाते. सध्याच्या काळात आपण रंगपंचमी, रासायनिक रंग वापरून खेळतो. हे रंग सहज बाजारात उपलब्ध असतात. पण याचा आपल्या आरोग्यावर, पर्यावरणावर काय परिणाम होईल? याचा विचारही करत नाही. रंग आपण त्वचेवर लावतो. तोंड, हात, पाठ, जिकडे मिळेल तिकडे त्या रंगात अगदी माखून जातो. हे सारे रासायनिक रंग असल्याने, या रंगांमध्ये आपल्या त्वचेसाठी हानिकारक रसायने असू शकतात. रंगपंचमी झाल्यावर अनेक वेळा त्वचा लाल झाली, पुरळ उठले, अॅलर्जी आली असेही घडते. आपण एक साधा विचार करून पाहा, त्वचा मऊ व्हावी म्हणून आपण त्वचेवर तेल लावतो, मॉईश्चराईजर लावतो, सूर्यप्रकाशापासून वाचण्यासाठी सनस्क्रीन लोशन लावतो. त्वचेवर लावलेल्या या सगळ्या गोष्टी त्वचेत शोषून घेतल्या जातात व त्याचे चांगले परिणाम आपल्याला दिसून येतात. मग हे रासायनिक रंगही त्वचेत शोषून घेतले जात नसतील का? त्यामुळे, त्याचा त्रास होणे स्वाभाविकच आहे. हे रंग भरपूर प्रमाणात हवेत उधळले जातात. ते श्वासाबरोबर फुप्फुसात जातात. त्याचेही दुष्परिणाम होऊ शकतात. हे रंग हवेबरोबर सगळीकडे पसरतात. नंतर जमिनीवर बसतात. मातीतही ही अनावश्यक रसायने मिसळली जातात. तसेही सध्या विविध कारणांनी, मातीचे आरोग्य धोक्यात आहे; त्यात ही भर.
रंगपंचमी खेळताना भरपूर पाणी वापरले जाते. पाण्याची किती कमतरता आहे, हे आपण जाणतोच. अनेक ठिकाणी आठवड्यातून एकदा पाणी येते. कितीतरी ठिकाणी, टँकर नियमितपणे मागवावा लागतो. मग अशा वेळी पाणी असे वापरून टाकणे योग्य आहे का? हे रंगमिश्रित पाणी जमिनीत झिरपते, हळूहळू नाल्यात व खाडीत, नदीत जसा प्रवाह जाईल तसे जाते. म्हणजे ही रसायने त्या पाण्यात मिसळतात. लेखाच्या सुरुवातीला उल्लेख केला की, ‘होली खेले नंदलाल.’ हा सण पुराण काळापासून साजरा होत आहे. तेव्हा कुठे होते रासायनिक रंग? राधा, कृष्ण, गोप-गोपिका काय रासायनिक रंग वापरून रंगपंचमी खेळायचे का ? आपण विविध नैसर्गिक पदार्थ वापरून रंग तयार करू शकतो. विविध रंगांची पाने, फुले, भाज्या वापरून अगदी सहजपणे, सोप्या पद्धतीने, स्वस्तात रंग तयार करता येतात. ओले रंग तसेच सुके रंगही तयार करू शकतो. आपल्याला परिसरात कितीतरी रंगांची फुले मिळतात. झेंडूची फुले किती विविध रंगी असतात. पिवळी, केशरी, लाल, भगवी. या फुलांच्या पाकळ्या पाण्यात भिजवून ठेवायच्या, अर्ध्या तासात पाकळ्यांचा रंग पाण्यात उतरू लागतो. विविध रंगांची जास्वंदी, अस्टरची फुले मिळतात. त्या त्या रंगाच्या पाकळ्या भिजत टाकायच्या व रंग तयार! गडद म्हणजे डार्क रंग हवा असेल, तर भिजत टाकलेल्या पाकळ्या मिक्सरमध्ये वाटायच्या, त्यानंतर मग पुन्हा पाण्यात मिसळायच्या. बिटापासून सुंदर मजेंडा, तर पालकापासून हिरवा रंग मिळतो. पारिजातकाच्या देठापासून, सुंदर असा केशरी सुवासिक रंग मिळतो. कांद्याच्या सालीपासून गुलाबी. निळ्या गोकर्णापासून गडद निळा. मेहेंदी भिजवल्या भिजवल्या हिरवा, तर थोड्या वेळाने ते पाणी लाल होत जाते. असे कितीतरी रंग आपापली कल्पनाशक्ती वापरून, तयार करता येतात. सुके रंग हवे असतील, तर या पाकळ्या सावलीत पसरून ठेवायच्या, छान चुराचुरीत वाळू द्यायच्या. हाताने चुरले तरी चालेल किंवा मिक्सरमधून पावडर करायची. त्यात घरात जे असेल ते बेसन किंवा तांदळाचे पीठ मिसळायचे, की सुका रंग तयार. अशा विविध पद्धती वापरून, आपण पर्यावरणपूरक होळी व रंगपंचमी साजरी करूया. सर्वांना होळीच्या व रंगपंचमीच्या शुभेच्छा.
(लेखिका पर्यावरण संरक्षण गतिविधी, अखिल भारतीय नारिशक्ती कार्यविभाग प्रमुख व पर्यावरण दक्षता मंडळाच्या सचिवपदावर कार्यरत आहेत.)