पाकिस्तान हा जगाच्या पाठीवरचा असा देश आहे, ज्याने भारताचे नुकसान करण्याच्या नादाने स्वतःच्या पायावरच धोंडा मारून घेतला आहे. वास्तविक पाहता, स्पर्धा ही चांगलीच; मात्र त्यातील हेतू स्वतःची प्रगती हा असावा. मात्र, स्वतःला मिळाले नाही, म्हणून भारतालादेखील मिळता कामा नये. यासाठी त्यांनी जंग जंग पछाडले आहे. मात्र, त्यांच्या हाती काहीही आजवर लागलेले नाही. त्यांनी पेरलेला दहशतवाद आज त्यांच्यावरच उलटला आहे. दि. १० मार्च रोजी बलुचिस्तानमधील नसीराबाद येथे घडलेली प्रवासी रेल्वे अपहरणाची घटना ही पाकिस्तानच्या अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून एक गंभीर घडामोड ठरली असून ती खर्या अर्थाने बलुच असंतोषाची नांदी ठरणार आहे. या घटनेने केवळ बलुचिस्तानातील असंतोष जगसमोर आला असे नाही, तर पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षाव्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित केले आहेत.
बलुचिस्तान हा पाकिस्तानच्या एकात्मतेसाठी, दीर्घकाळपासून आव्हानात्मक प्रदेश राहिला आहे. पाकिस्तानात समाविष्ट झाल्यानंतरच्या पहिल्या दशकापासूनच या प्रांतात असंतोषाचे वारे वाहू लागले होते. वास्तविक पाहता नैसर्गिक संसाधनांनी समृद्ध असलेला हा प्रदेश. मात्र, पाकिस्तानी नेतृत्व आणि लष्कर यांनी या भागाला विकासाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित ठेवले आहे, हे वास्तव जगजाहीर आहे. परिणामी, स्थानिक जनतेत असंतोषाची भावना बळावली असून, बलुच स्वातंत्र्याच्या मागण्या दिवसेंदिवस उग्र रूप धारण करत आहेत. प्रवासी रेल्वेचे झालेले अपहरण हे त्याचेच एक रुप आहे. या अपहरणामध्ये जवळपास ४५०च्या आसपास प्रवाशांना बलुच दहशतवाद्यांनी बंदी केले असून, त्यात अनेक सैनिकांचादेखील समावेश आहे. सैनिकांचा समावेश असलेल्या रेल्वेचे अपहरण होते, हे पाकिस्तानी लष्करासाठीही लज्जास्पद असेच आहे. लष्कराने कारवाई करण्यास सुरुवात केली असली, तरीही बलुच बंडखोरांकडून लष्कराला प्रत्युत्तर दिले जात आहे.
या अपहरणाला एक व्यापक सामरिक आणि राजकीय पाश्वर्र्भूमी आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला थेट लक्ष्य करून, बंडखोरांनी पाकिस्तानच्या राज्ययंत्रणेच्या क्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. रेल्वे गाड्या या कोणत्याही राष्ट्राच्या अंतर्गत सुरक्षेचा अत्यंत मूलभूत भाग असतात. अशा यंत्रणांमध्ये जर सुरक्षा सुनिश्चित करता आली नाही, तर ती परिस्थिती अधिक व्यापक असुरक्षिततेची द्योतक मानली जाते.पाकिस्तान लष्कर आणि गुप्तचर यंत्रणा, बलुचिस्तानमध्ये दीर्घकाळापासून सक्रिय आहेत. तरीही, बंडखोर गटांच्या या प्रकारच्या कारवाया रोखण्यात सातत्याने अपयश येत आहे, हे या घटनेतून अधोरेखित झाले आहे. जागतिक सामरिक अभ्यासकांचे मत आहे की, पाकिस्तानच्या अंतर्गत सुरक्षाव्यवस्थेतील ही पोकळी दीर्घ काळासाठी अस्थिरता निर्माण करणारी ठरू शकते.
या घटनेचा परिणाम केवळ पाकिस्तानच्या अंतर्गत स्थितीपुरता मर्यादित राहणार नाही. चीन-पाकिस्तान आर्थिक महामार्ग हा प्रकल्पही बलुचिस्तानमधून जात असल्याने, अशा प्रकारच्या अस्थिर घडामोडी चीनच्या दृष्टीनेही चिंतेचा विषय ठरतात. बलुच बंडखोर गटांनी पूर्वीही या प्रकल्पांच्या सुरक्षेवर हल्ले चढवले असून रेल्वे अपहरणानंतर यासंदर्भातील धोका पुन्हा वाढल्याचे अधोरेखित झाले आहे. पाकिस्तानच्या लष्करी धोरणातील ही कमकुवत बाजू त्याच्या जागतिक प्रतिष्ठेसाठी आव्हान ठरते. एक आण्विक शक्तिधारक देश म्हणून पाकिस्तानची ओळख असली, तरी अशा घटनांमुळे त्याच्या अंतर्गत सुरक्षेविषयी शंका निर्माण होतात. विशेषतः जर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची सुरक्षितता टिकवणे शक्य होत नसेल, तर संवेदनशील लष्करी तळ किंवा आण्विक प्रकल्प यांची सुरक्षितता कितपत सुनिश्चित केली जाऊ शकते, या प्रश्नाचा विचार जागतिक समुदायाला करावा लागणार आहे.
बलुचिस्तानमधील ही घटना पाकिस्तानसाठी गंभीर इशारा आहे. पाकिस्तानात अंतर्गत असंतोषाचे आणि दडपशाहीच्या धोरणाचे दुष्परिणाम दिसून येत आहेत. यावर तातडीने उपाययोजना न झाल्यास, ही स्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, सध्या तरी पाकिस्तान या संकटातून मान सोडवण्यासाठी, नेहमीप्रमाणे भारताच्या सीमेवर कुरघोडी करण्याची शक्यता दाट आहे. त्यामुळे, भारतीय सैन्याने अधिक सतर्कतेने राहणेच इष्ट ठरणार आहे, हे निश्चित!