याच आठवड्यात घडलेली कानपूर येथील घटना. हुसैन आणि अजहर यांनी, त्यांच्या परिचयातील १३ वर्षांच्या बालकाचे अपहरण केले. त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले आणि त्याला क्रूरपणे मारून टाकले. गुन्हेगारांना पोलिसांनी पकडले. अत्याचाराचा खुलासा करताना हुसैनने सांगितले, रमजानचा पवित्र महिना सुरू आहे. त्यामुळे बिबीसोबत लैंगिक संबंध ठेवणे, हे हराम असल्याचे बिबीने सांगितले. बिबीच्या नकारामुळे त्यांनी हे कृत्य केले. काय म्हणावे? प्रत्येक धर्माच्या व्यक्तीसाठी, आपआपल्या श्रद्धा महत्त्वाच्या असतात. मात्र रमजानदरम्यान पत्नीशी लैंगिक संबंध ठेवणे हराम आहे, ही श्रद्धा मानून बालकावर अत्याचार करणे, त्याचा खून करणे, हे त्या गुन्हेगारांच्या नजरेत पाक आहे, पवित्र आहे. भयंकर!
ही कोणती मानसिकता? तर्क, विवेक, नीती यांचा दुरान्वये संबंध नसलेली, भयंकर अमानवी मानसिकता. याच घटनेमध्ये असे स्पष्ट झाले की, मृत बालक हा हुसैन आणि अजहरच्या अगदी निकटच्या परिचयाचा होता. बालकाच्या पित्याशी या दोघा नराधमांची चांगली मैत्री होती. त्यामुळे त्या बालकाशीही ते परिचित होते. बरं, बालकाला या दोघांनी काय सांगून सोबत नेले असेल? तो बालक यांच्यासोबत का गेला असेल? समाजमाध्यमातील या घटनेसंदर्भातील बातम्यांमध्ये, या दोघांनी याबाबतचे स्पष्टीकरण काही वेगळेच दिले आहे. त्यानुसार ‘कॉलगर्ल’ला भेटवतो, असे या दोघांनी या बालकाला सांगितले होते. त्यामुळे घरी कुणालाही न सांगता, हा मुलगा त्या नराधमांसोबत गेला. अर्थात, घटनेचा कितीही ऊहापोह केला, तरी या नराधमांचा गुन्हा भयंकरच आहे. दुसरे असे की, बालकाचे अपहरण झाले, लक्षात आल्यावर रमजानच्या महिन्यात कौमच्या बालकाचे अपहरण झाले, असे म्हणत स्थानिक मुस्लीम समाज आक्रमक झाला. ’कौमवरच अत्याचार होतो’ असे म्हणत, सरकारविरोधात स्थानिक स्तरावर विविध पद्धतींनी संतापही व्यक्त केला. मात्र, पोलिसांनी हुसैन आणि अजहरला पकडल्यानंतर, संताप व्यक्त करतानाचा आवेग ओसरला. याचे कारण काय असावे? तर, याबाबत लोकांचे म्हणणे आहे की, हुसैन आणि अजहर हे कौमचे लोक आहेत. त्यांनी भयंकर गुन्हा केलाच, मात्र रमजानच्या महिन्यात कौमच्या माणसाविरोधात कृती करणे, हे हरामच आहे. यावर प्रश्न पडतो की, यांची ‘हराम’ आणि ‘हलाल’ची नेमकी व्याख्या समजेल का?
एक से बढकर एक...
"पंतप्रधानांसोबत फिरायला जेवढी मजा येणार नाही, तेवढी मजा संजय राऊतांसोबत दिल्ली फिरताना येते. दिल्लीत त्यांची वठ आहे,” असे आदित्य ठाकरे नुकतेच म्हणाले. समान आचाराविचारांच्या माणसांचीच गट्टी जमते, या सूत्राला आदित्य ठाकरे तरी अपवाद कसे असतील? ते पुढे ते म्हणाले की, “दिल्लीमध्ये लोक त्यांना ‘गुरूजी’ म्हणून संबोधतात. अगदी भाजपचे लोकही त्यांना मुद्दाम भेटून सांगतात की, ”लगे रहो, अच्छा कर रहे हो.”
यावर काही लोकांचे म्हणणे आहे की, “दिल्ली आमच्या देशाची राजधानी आहे. त्यामुळे दिल्लीचा अभिमान आहेच. पण राऊतांची दिल्लीत वठ आहे, हे सांगताना आदित्य यांना गर्व वगैरे वाटतो, हे कसे काय बरे? उबाठा सेना म्हणजे अगदी उद्धव, आदित्य आणि संजय राऊत सदान्कदा दिल्ली म्हणजे’ देशाबाहेरचे काहीतरी भयंकर ठिकाण असल्यासारखे बोलत असतात. महायुतीचे मुख्यमंत्री दिल्लीला गेले, तरी हे लोक महाराष्ट्र दिल्लीसमोर का झुकतो ? असे वगैरे काहीही बरळतात. थोडक्यात, दिल्लीबाबत यांचे मत प्रतिकुल असेच आहे, असे हे लोक दाखवतात. मात्र, याच दिल्लीमध्ये संजय राऊतांना लोक ‘गुरूजी’ संबोधतात, हे सांगताना आदित्य यांना कृतकृत्य वाटावे? आदित्य यांच्या म्हणण्यानुसार, पंतप्रधानांपेक्षाही राऊतांसोबत दिल्लीत फिरताना त्यांना मजा येते? पण, पंतप्रधानांनी स्वतःसोबत त्यांना दिल्ली फिरवण्याची शक्यताच नाही. याचाच अर्थ, ते पंतप्रधानांसोबत दिल्ली फिरले नाहीत. मग ते राऊतांची तुलना, पंतप्रधानांसोबत का करत आहेत? याचाच अर्थ त्यांना दिल्लीचा मोह आहे, मात्र दिल्ली दूर आहे म्हणून त्या दिल्लीचा रागराग करायचा, हेच सत्य असेल. असो, नेमके याच कालावधीमध्ये क्रिकेटबद्दल बोलताना भारतीय क्रिकेट टीमच्या पंड्या बंधूचा उल्लेख करत उद्धवही म्हणाले की, “आमच्याकडेपण राऊत बंधू आहेत.” यावर काही लोकांनी शंका उपस्थित केल्या की, “राऊतांचे आणि ठाकरेंचे संबंध जुने आहेतच, पण अचानक ठाकरे पिता-पुत्रांनी सातत्याने प्रेम दर्शवणे, यामागे काहीतरी कारण असावे का?” आपल्याला काय? काहीही असू द्या; मात्र राऊत जसे उद्धव ठाकरेंची स्तुती करताना अतार्किक बोलतात, तितकेच नव्हे, त्याहीपेक्षा जास्त अतार्किक आपण बोलू शकतो, हे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. थोडक्यात, ‘एक से बढकर एक’ आहेत.