‘इंडस रिव्हर डॉल्फिन’ म्हणजेच ‘सिंधू नदी डॉल्फिन’ ही नेमकी कोणती प्रजात आहे?
‘सिंधू नदी डॉल्फिन’ ही गोड्या पाण्यात आढळणारी डॉल्फिनची प्रजात आहे. हा मासा नसून तो सागरी सस्तन प्राणी आहे. भारतात गोड्या पाण्यात अधिवास करणार्या डॉल्फिनच्या ‘गंगा नदी रिव्हर डॉल्फिन’ आणि ‘सिंधू नदी रिव्हर डॉल्फिन’ या दोन प्रजाती आढळतात. त्यापैकी ‘सिंधू नदी रिव्हर डॉल्फिन’ ही प्रजात सिंधू नदी आणि तिच्या उपनद्यांमध्ये आढळते. डॉल्फिनची ही प्रजात पूर्णपणे अंध आहे. ती इकोलोकेशन तंत्राचा अवलंब करून पाण्यात माग काढते आणि शिकार करते. या डॉल्फिनची संख्या अंदाजे दोन हजारांहून कमी उरल्याने ‘आययूसीएन’च्या लाल यादीत तिला ‘संकटग्रस्त’ प्रजातीचा दर्जा देण्यात आला आहे.
‘सिंधू नदी डॉल्फिन’ नेमके कुठे सापडतात?
सद्य परिस्थितीत ‘सिंधू नदी डॉल्फिन’ ही भारतातील केवळ पंजाब राज्यातील बियास नदीत आढळते. २००७ पूर्वी ही प्रजात भारतामधून नामशेष झाल्याचे मानले जात होते. परंतु, २००७ साली पंजाब वनविभागातील वनकर्मचार्यांना ही प्रजात बियास नदीत दिसली. ज्याठिकाणी ही प्रजात दिसली, तो प्रदेश या प्रजातीच्या पूर्वीच्या ज्ञात अधिवासापासून सुमारे ६०० किमी लांब होता. सुरुवातीला वनकर्मचार्यांना हा मासा वाटला. मात्र, वरिष्ठ वनाधिकार्यांनी हा मासा नसून तो डॉल्फिन असणार्यावर शिक्कामोर्तब केले. त्यानंतर २०१० आणि २०११ साली ‘डब्लूडब्लूएफ-इंडिया’ आणि पंजाब वनविभागाने या डॉल्फिनच्या सर्वेक्षणाचे काम केले. बियास, रावी, सतलज या तीन नद्या मिळून सुमारे ४७० किमीच्या नदी पात्रामध्ये सर्वेक्षण करण्यात आले. नदीकाठी राहणार्या १०४ सदस्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. ज्यामध्ये संदर्भासाठी खुल्या प्रश्नावली आणि डॉल्फिनच्या रंगीत छायाचित्रांचा वापर केला गेला. त्या सर्वेक्षणात असे दिसून आले की, या डॉल्फिनचा अधिवास केवळ हरिके वन्यजीव अभयारण्याचा परिसर आणि बियास नदीवरील बियास डेराच्या खालच्या भागात आहे. रावी आणि सतलज नद्यांमध्ये या डॉल्फिनचा अधिवास आढळला नाही. सद्य परिस्थितीत हा डॉल्फिन केवळ बियास नदीत आढळतो. मात्र, या नदीच्या संपूर्ण पात्रात नाही. २०१५ पासून बियास शहराच्या खालच्या भागात डॉल्फिनचा प्रामुख्याने आढळ असून साधारण ७० किमीच्या नदीपात्रामध्येच तो पाहिला जात आहे.
‘सिंधू नदी डॉल्फिन’ची नेमकी संख्या किती आहे?
२०११ आणि २०१२ साली करण्यात आलेल्या सर्वेक्षणादरम्यान पाच डॉल्फिनची नोंद करण्यात आली होती. २०१३ ते २०१८ या काळात ही संख्या चार होती. त्यानंतर २०१८ साली ही संख्या सहा नोंदवली गेली. नुकत्याच प्रकाशित झालेल्या गोड्या पाण्यातील डॉल्फिनच्या सर्वेक्षण अहवालानुसार ही संख्या तीन आहे आणि ती खरी संख्या आहे. वर नमूद केलेल्या संख्या या केवळ भारतामधील आहेत. पाकिस्तानमधील संख्येबाबत मी भाष्य करू शकत नाही. संख्या कमी असण्यास ज्याप्रमाणे मानवनिर्मित कारणे आहेत, तसेच काही नैसर्गिक कारणेदेखील आहेत. या डॉल्फिनची प्रजनन क्रिया संथ आहे. कारण, मादी डॉल्फिन ही दोन वर्षांच्या अंतराने एका पिल्लाला जन्म देते. त्यामुळे त्यांची संख्या वाढण्यास बराच कालावधी जाऊ शकतो.
या डॉल्फिनच्या संवर्धनासाठी नेमके काय प्रयत्न सुरू आहेत?
केंद्र सरकारच्या ‘प्रोजेक्ट डॉल्फिन’ या प्रकल्पामध्ये या डॉल्फिनचा समावेश करण्यात आला आहे. शिवाय पंजाब वनविभागदेखील या प्रजातीच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी प्रयत्नशील आहे. या प्रजातीचा अधिवास असणारे क्षेत्र आणि त्याच्या आसपास पसरलेल्या १८५ किमी क्षेत्राला बियास नदी संवर्धन राखीव क्षेत्राचा दर्जा देण्यात आला आहे. या संवर्धन राखीव क्षेत्रात यांत्रिक पद्धतीने मासेमारी करण्यास बंदी आहे. महत्त्वाचे म्हणजे या प्रजातीचे महत्त्व ओळखून पंजाब सरकारने या प्रजातीला ‘राज्य जलचर प्राण्या’चा दर्जा दिला आहे. ‘गंगा नदी डॉल्फिन’प्रमाणे या प्रजातीला ‘सॅटलाईट टॅग’ करणे मुश्किल आहे. कारण, संख्येने आधीच ही प्रजात कमी आहे. अशा परिस्थितीत ‘सॅटलाईट टॅग’ करण्यासाठी तिला शोधणे आणि तिला पकडणे ही सहजसोपी गोष्ट नाही. समजा भविष्यात ती जाळ्यात अडकलेली सापडल्यास किंवा ’रेस्क्यू’ केली गेल्यास तिला ‘सॅटलाईट टॅग’ करण्याचा प्रयत्न करता येऊ शकतो.
‘डब्लूडब्लूएफ-इंडिया’ या प्रजातीच्या संवर्धनासाठी काय करत आहे?
आम्ही पंजाब वनविभागाच्या मदतीने या प्रजातीच्या संवर्धनासाठी काम करत आहोत. संख्येबाबत सर्वेक्षण करणे, पाण्याची गुणवत्ता तपासणे अशा शास्त्रीय गोष्टींबरोबरच जनजागृतीचे प्रयत्न आम्ही करत आहोत. जनजागृतीच्या माध्यमातून आम्ही २ हजार, २०० लोकांना ‘बियास मित्र’ म्हणून नामांकित केले आहे. हे ‘बियास मित्र’ आम्हाला बियास नदीच्या संवर्धनासाठी मदत करतात, तर आमचे ‘डॉल्फिन मित्र’ हे आम्हाला सर्वेक्षणासाठी मदत करतात. नदी ओलांडून शेतात जाणारे लोक, मच्छीमार, नदीकाठी राहणारे लोक, जे थेट या डॉल्फिनला पाहतात, त्यांना आम्ही ‘डॉल्फिन मित्र’ म्हणून नामांकित केले आहे.