आजवरच्या भारताशी संबंधित इतिहासलेखनात देवळांच्या संहारामागचे खरे षड्यंत्र हे कायमच गुलदस्त्यातच कसे राहील, याची अगदी पद्धतशीर तजवीज केली गेली. ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘समाजवादी’ या दोन झापडांच्या आड, मंदिरांचा विध्वंस हिंदू प्रतीके म्हणून नव्हे, तर लुटीसाठी झाल्याचा खोटा इतिहास हिंदूंच्या गळी वर्षानुवर्षे अलगद उतरविण्यात आला. त्यामुळे इतिहासाकडे डोळसपणे बघून, त्याचे यथार्थ आकलन करणे हे स्वत्वाच्या शोधासाठी आवश्यक आहे. नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सोमनाथ मंदिराला भेट दिली. त्यानिमित्ताने गझनीच्या महमूदाने सोमनाथ मंदिरावर केलेल्या स्वार्या आणि मंदिराचा विध्वंस यांच्या असत्य इतिहासलेखनाविषयी...
'भारतीय इतिहासाच्या आकलनातील त्रुटी’ असा विषय पाहिल्यास, त्यात एक प्रमुख प्रकरण असेल ते म्हणजे, देवळांच्या पद्धतशीर विध्वंसाचा लपवलेला इतिहास. उत्तर भारतातील आणि दक्षिण भारतातील देवळे अशी आपण तुलना केल्यास, आपल्याला साहजिक असे जाणवते की, दक्षिण भारतातील देवळे अधिक भव्य आणि संपन्न आहेत. तिथे मोठ्या प्रमाणात स्थापत्यकलेचे नवनवीन अविष्कार आपल्याला दिसतात. आपल्या पुराणांतील धार्मिक स्थळांचे वर्णन ऐकल्यास आपल्याला याच्या उलट परिस्थिती दिसते. उत्तरेला काशी, प्रयाग, मथुरा, गया यांसारखी अनेक महत्त्वाची धार्मिक स्थळे असल्याचे आपल्याला माहीत असते. देवळेच नाही, तर नालंदा, तक्षशिला यांसारख्या विद्यापीठांचे उल्लेख आपल्याला माहीत असतात. परंतु, प्रत्यक्षात आपण जेव्हा त्या ठिकाणी जातो, तेव्हा भग्न अवशेष केवळ उभे असतात. आपल्या इतिहासाच्या अज्ञानामुळे स्वाभाविकपणे आपल्याला असे वाटते की, हा केवळ मध्ये उलटून गेलेल्या काळाचा प्रभाव आहे. या सर्व वास्तूंचा, तेथील परंपरांचा आणि मोठ्या प्रमाणावर तेथील समाजाचाही समूळ उच्छेद करण्याचा एक पद्धतशीर प्रयत्न भारताच्या इतिहासातील एका मोठ्या कालखंडात झाला, याची जाणीव आज समाजमनात पुरेशी तीव्रपणे नाही आणि ती पुसण्याचा प्रयत्न स्वातंत्र्योत्तर काळात एका विशिष्ट विचाराच्या आधारे केला गेलेला आहे.
मागील लेखात म्हटल्याप्रमाणे, येथे उद्देश हा अशा प्रकारे इतिहास झाकून ठेवण्यामागे किंवा विशिष्ट पद्धतीतूनच त्याची मांडणी करण्यामागे हेतू कोणते आणि वसाहतवादी विचारांचे प्राबल्य त्यामागे कसे आहे, याचे विवेचन करणे असा आहे. त्यामुळे या विषयात जे काही संशोधन झाले असेल, त्याचा संदर्भानुसार नामोल्लेख केवळ आपण करू. देवळांवरील आक्रमणांची सुरुवात ही मुसलमान राजांनी भारतावर स्वार्या सुरू केल्या तेव्हापासून होते. गझनीच्या महमूदाने सोमनाथ मंदिरावर केलेल्या स्वार्या या अशा प्रकारच्या पहिल्या प्रसिद्ध स्वार्या म्हणता येतील. त्यानंतर उत्तर भारतावर घोरी, तुघलक, लोदी, खिलजी आणि सरतेशेवटी मुघल या अन्यान्य शासकांनी केलेली राज्ये आणि एतद्देशीय हिंदू राजांशी झालेली त्यांची युद्धे यात एक समान धागा म्हणजे, सामरिक विजयानंतर तेथील हिंदू समाजाच्या धर्मश्रद्धांना पायदळी तुडवण्याच्या हेतूने स्थानिक मंदिरांचा विध्वंस. या सर्व मुसलमान राजांच्या दृष्टीने या सर्व लढायांचा उद्देश काय आणि त्यानंतर करण्यात आलेले देवळांचे विध्वंस आणि सामान्य हिंदू प्रजेचे शिरकाण कशासाठी केले गेले, हे या सर्व राजांनी आणि त्यांच्या दरबारी इतिहासकारांनी स्पष्टपणे नोंदवून ठेवलेले आहे. असे असताना अर्वाचीन भारताच्या इतिहासकारांनी हे स्पष्ट पुरावे समाजापासून लपवून का ठेवलेले आहेत, असा प्रश्न स्वाभाविकपणे समोर येतो.
ब्रिटिशांच्या राजवटीतून स्वातंत्र्य प्राप्त केल्यानंतर नवस्वतंत्र भारतीय राज्याचे स्वरूप काय असावे, असा विचार जेव्हा चालू झाला, तेव्हा सद्यकाळी प्रचलित परिस्थितीनुसार संविधानिक लोकशाही राज्याचे स्वरूप त्यास असावे असे ठरले. संविधान निर्मितीसाठी घटनासमितीची नियुक्ती झाली आणि साधारण तीन वर्षांनी भारताची लिखित घटना तयार झाली. ही घटना लोकांना व राष्ट्राला समर्पित करताना घटनाकारांनी तिच्या सुरुवातीस एक उद्देशिका लिहिली आहे. ही उद्देशिका हे एक प्रकारे भारतीय नागरिकांनी स्वतःला दिलेले एक वचन आहे. या राष्ट्राला कोणत्या दिशेने पुढे न्यायचा संकल्प आम्ही भारताचे नागरिक म्हणून करत आहोत, त्याचे चित्र या उद्देशिकेत दिसते. जरी संविधानाचे महत्त्व राजकीय दृष्टीने अधिक असले, तरी त्याचे उद्देशिकेसारखे भाग समाजव्यवहारांच्या सर्व आयामांवर प्रभाव टाकतात. १९७६ साली या उद्देशिकेत बदल करून त्यात ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘समाजवादी’ हे शब्द जोडण्यात आले. हे शब्द घटनासमितीच्या मूळ सदस्यांना आवश्यक वाटत नसावेत. त्यांचा समावेश घटनेच्या उद्देशिकेत का करण्यात आला आणि त्या मूल्यांच्या सततच्या उद्घोषामुळे आपल्या समाजाच्या स्वबोधाच्या आकलनात नेमके काय बदल घडले, त्याची कारणमीमांसा फारशी झाल्याचे दिसत नाही. या दोन्ही शब्दांचा विचार आजच्या विषयाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.
भारतीय इतिहासलेखनावरील साम्यवादी इतिहासकारांचा प्रभाव आणि एकंदर विषयावर त्याचे झालेले दुष्परिणाम हे आपण सविस्तरपणे पाहिलेले आहेत. संविधानाच्या उद्देशिकेतच ‘समाजवादी’ हा शब्द घातल्याने या सर्व उद्योगाला एक प्रकारची राजमान्यता मिळाल्यासारखे झाले. आपल्या इतिहासाचे समाजवादी आकलन हेच योग्य आहे आणि भविष्याच्या दृष्टीने आपण त्याच भागावर लक्ष केंद्रित करायला हवे, अशा प्रकारचा एक मतप्रवाह प्रचलित झाला. या विचारधारेचे एक उदाहरण म्हणून प्रा. मोहम्मद हबिब यांनी लिहिलेल्या गझनीच्या महमूदाच्या चरित्राकडे पाहता येईल. महमूदाच्या सोमनाथवरील स्वार्या सर्वांना माहीत आहेत. त्यातून या मंदिराचा जीर्णोद्धार स्वातंत्र्यानंतर झाला. त्यामुळे उघडपणे गाळून टाकावा, इतका हा इतिहास विस्मृतीत गेलेला नाही. परंतु, या इतिहासाकडे पाहताना प्रा. हबिब यांनी या स्वार्यांचा उद्देश काय होता, हे पूर्णपणे बदलून टाकले आहे. “इस्लाममधील मूर्तिभंजनाच्या आज्ञेनुसार, मी या देवळाचा विध्वंस केला,” असे स्वतः महमूद स्पष्टपणे त्याच्या दरबारी इतिहासात नमूद करतो. मात्र, याच संदर्भाला आधार मानून जेव्हा हबिब त्यांचा इतिहास लिहितात, तेव्हा या स्वारीमागील धर्मप्रेरणा टाळून ही केवळ लुटीच्या उद्देशाने केली गेलेली स्वारी होती, असे लिहितात. स्थानिक हिंदूंनी जर मुकाट्याने संपत्ती महमूदाच्या हवाली केली असती, तर जणू काही त्याने देवळाला हातच लावला नसता. या प्रकारची मध्ययुगातील समाजाच्या मानसिकतेची चिकित्सा पूर्णपणे टाळून आणि अर्वाचीन सिद्धांतांचे विचार त्यांच्यावर लादून, त्यांच्या कृत्यांची मीमांसा असा अत्यंत अप्रामाणिकपणा इतिहासलेखनात येणे, हे या इतिहासाच्या समाजवादी आकलनामुळे झाले. त्या महमूदाला ‘साम्यवाद’ आणि ‘समाजवाद’ याचा गंधही नव्हता. पण, तरीही त्याच्या प्रेरणा कशा केवळ लुटीच्या होत्या, असा इतिहास आपण शिकत आलो आहोत.
तत्कालीन समाजाच्या धर्मश्रद्धांचे संदर्भ लक्षात घेतले नाहीत, तर कसे चुकीचे समज पसरतात, त्याचे उत्तम उदाहरण गझनीच्या महमूदाचे ‘भारतीय इतिहासातील चित्रण’ हे आहे. त्याविषयी दोन उदाहरणे जी आपल्या इतिहासात आपण गाळतो ती थोडक्यात पाहू. सोमनाथाचे मंदिर असलेल्या अनहिलवाडा येथील राजाने महमूदाच्या स्वारीच्या साधारण ५० ते १०० वर्षांपूर्वी एका अरबी व्यापार्याला सोमनाथ मंदिर परिसरात मशीद बांधायला जागा दिल्याचे उल्लेख आहेत. नंतर या मशिदीच्या खर्चासाठी जमिनीचे उत्पन्न लावून दिले होते. या दानपत्राची घटना ताजी असतानाच, महमूदाची स्वारी झालेली आहे. तत्कालीन हिंदूंना इस्लामच्या मूर्तिभंजनाच्या प्रवृत्तीचे आकलन झालेले नव्हते, असे यातून लक्षात येते. दुसरे उदाहरण म्हणजे, महमूदाने केलेला मथुरेचा विध्वंस. सोमनाथ आपल्या लक्षात राहतो; पण मथुरा स्मरणातून मागे पडते. त्याचे कारण म्हणजे, मथुरेचा विध्वंस हा फक्त लुटीसाठी म्हणता येत नाही. अनेक छोट्यामोठ्या फारशी संपत्ती नसलेल्या देवळांचा विनाश, मूर्तींची तोडफोड, निवडून काढून फक्त हिंदू पुरुषांची कत्तल, यांसारखी कृत्ये केवळ आर्थिक उद्देशाने घडली, असे म्हणता येत नाही. गझनीच्या महमूदाच्या स्वारीचा इतिहास यासारख्या प्रसंगांच्या योग्य आकलनावाचून अपुरा आहे. तत्कालीन समाजाच्या धर्मश्रद्धांचे आणि इस्लामच्या भारताकडे आणि एकंदरीतच जगाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनांचे तीव्र संदर्भ या इतिहासाला आहेत.
देवळांच्या विध्वंसाच्या कारणमीमांसेचे योग्य आकलन होण्यातील दुसरी अडचण म्हणजे, उद्देशिकेतील ‘धर्मनिरपेक्ष’ हा दुसरा नवीन शब्द. इस्लामच्या किंवा त्यापेक्षा व्यापकपणे सर्वच अब्राहमिक पंथांच्या जागतिक दृष्टिकोनाचे यथार्थ आकलन आपल्याला एक समाज म्हणून झाले आहे का आणि एक प्राचीन समाज म्हणून या विचारधारेला आपण कशाप्रकारे सामोरे जाणार आहोत, या चर्चेला एक प्रकारे खीळ घालण्याचे काम या धर्मनिरपेक्षतेच्या अपेक्षेने झाले आहे. आपण विस्ताराने केवळ गझनीच्या महमूदाचे उदाहरण पाहिले. पण, हे एकमेव उदाहरण नाही. नंतरच्या काळात झालेल्या इस्लामी राजवटींनी दिल्ली, कनोज, मथुरा, काशी, बनासकाठा, रायचूर, चिदंबरम, मदुराई अशा भारतभरातील अनेक शहरांमध्ये देवळांचा विध्वंस केला आहे. त्यातील दगड वापरून त्याच ठिकाणी मशिदी बांधल्या आहेत. गोवा आणि मलबार प्रांतात ख्रिश्चन धर्मप्रसारकांनी याच प्रकारे देवळांवर हल्ले करत, स्थानिकांना विस्थापित केले आहे. आजही गोव्यात फिरताना देवळे डोंगरांच्या कडेने आणि चर्च समुद्रकिनारी असे दिसते. मात्र, आपण स्वतःला ‘धर्मनिरपेक्ष’ असे घोषित केल्याने, या सर्व इतिहासाची यथार्थ चिकित्सा आज होऊ शकलेली नाही. समाजाच्या डोळ्यासमोर एक प्रकारची झापडे लावून या प्रकारचे वर्तन केवळ इतिहासात घडले आणि तेही प्रामुख्याने ऐहिक संपत्ती मिळवण्याच्या उद्देशाने, असा एक सामाजिक भ्रम पसरलेला आहे. बाबराने केलेल्या राममंदिराचा विध्वंस शतकांच्या लढ्यानंतर आताच संपला आहे. मात्र, १९९२ साली जेव्हा बाबरी ढाँचा पडला, तेव्हा बांगलादेशात किती देवळांचा विध्वंस झाला, याची बातमी आपल्यापर्यंत पोहोचत नाही.
सामाजिक स्वत्वाचा आत्मबोध हा इतिहासाच्या निवडक विस्मृतीतून शक्य नाही. इतिहासातील बर्या-वाईट सर्व घटनांकडे डोळसपणे पाहून आजच्या घडीला आपल्यासाठी त्यातून काय बोध आहे, त्याचा सम्यक विचार व्हायला हवा. एक राष्ट्र म्हणून आपली प्रकृती नेमकी काय, या प्रकृतीच्या आधारे आपण इतिहासकालात उत्पन्न झालेल्या प्रश्नांना काय उत्तरे दिली आणि प्रकृतिविसंगत अशा कोणत्या विचारांना आपण योग्य वेळी तणासारखे बाजूला न काढल्याने राष्ट्रावर आपत्ती ओढवल्या, त्याचे साधकबाधक चिंतन करायला हवे. इतिहासाचे यथार्थ आकलन हे राष्ट्रीय स्वत्वाच्या शोधासाठी आवश्यक आहे.
(लेखकाने मुंबईतील टीआयएफआर येथून खगोलशास्त्रात ‘पीएच.डी’ प्राप्त केली आहे. सध्या एका खासगी वित्तसंस्थेत नोकरी करत असून, ‘प्रज्ञा प्रवाह’ या संस्थेचे कोकण प्रांत कार्यकारिणी सदस्य म्हणून कार्यरत आहेत.)
९७६९९२३९७३