....आणि कुसुमाग्रजांनी नारायण सुर्वेंना दत्तक घेतलं!
10-Mar-2025
Total Views | 6
मुंबई : 'अनंत अमुची ध्येयासक्ती, अनंत अन् आशा किनारा तुला पामराला' आज १० मार्च, कोलंबसचे गर्वगीत गाणाऱ्या कुसुमाग्रजांचा आज स्मृतिदीन. आपल्या सिद्धहस्त लेखणीतून कुसुमाग्रजांनी मराठी साहित्य विश्वात स्वताचा वेगळा ठसा उमटवला. विष्णु वामन शिरवाडकर हे कुसुमाग्रजांचे पूर्ण नाव. नाशिक जवळच्या शिरवाडे या गावात त्यांचा जन्म झाला. शब्दांच्या माध्यमातून सुवर्णकाळ उभं करणाऱ्या कुसुमाग्रजांना त्यांच्या विशाखा या काव्यसंग्रहाने ओळख मिळवून दिली. ज्येष्ठ साहित्यीक विष्णु सखाराम खांडेकर अर्थात 'ययाति'कार खांडेकर यांनी विशाखा या काव्यसंग्रहाला दिलेल्या प्रस्तावनेमुळे आर्वाचीन कवितेतील नवीन वळण लोकांसमक्ष प्रकट झाले. शिरवाडकरांच्या नटसम्राट या नाटकाने मराठी रंगभूमीचं विश्व अक्षरश: दिपून गेलं.
कवी, साहित्यीक, नाटककार, असे विविध पैलू असलेले कुसुमाग्रज समाजकार्यात सुद्धा सक्रिय होते. अनाथ मुलांच्या शिक्षणचा खर्च असो किंवा मुलींच्या वसतिगृहाची बांधणीसाठी लागणारा पैसा. त्यांनी आपल्या लेखणीबरोबरच माणुसकीचा वसा सुद्धा जपला होता. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलानाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे सांगतात की कुसुमाग्रजांच्या घरामध्ये कायम लोकांचा राबता असायचा. त्यांच्या घरात सगळ्यांना मुक्तप्रवेश असे. नवोदित लेखक असो किंवा राजकारणी, कुसुमाग्रज अत्यंत जिव्हाळ्याने लोकांशी संवाद साधायचे. आज आपण जाणून घेणार कुसुमाग्रजांची संवेदनशीलता दाखवणारा असाच एक प्रसंग.
' कामगार आहे मी, तळपती तलवार आहे, सारस्वतांनो थोडा गुन्हा करणार आहे' असं म्हणत शब्दांच्या शिदोरीवर कष्टकरी वर्गाचं जगणं मांडणारा कवी म्हणजे नारायाण सुर्वे. मिलमध्ये काम करणाऱ्या एका कामगाराला रस्त्याच्या कडेला एके दिवशी कचऱ्या पेटीजवळ एक अर्भक सापडलं. त्याने त्या बाळाला दत्तक घेतलं आणि नारायण सुर्वे या माणसाचा पुर्नजन्म झाला. कामगार वस्ती आणि कम्युनिस्टांच्या चळवळीत लहानाचे मोठं झालेल्या नारायण सुर्वे यांचं आयुष्य अत्यंत हालाकीत गेलं. नारायण सुर्वे यांच्या पत्नी कृष्णामाई सुर्वे, नारायण सुर्वे यांना ' मास्तर' म्हणत असत. नारायण सुर्वे यांच्यावर त्यांचं प्रेम होतं. परंतु जात आडवी आल्यामुळे दोघांनी पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्न नंतरचे काही वर्ष दोघांसाठी अत्यंत हालाकीचे होते. परंतु त्या परिस्थीतीत सुद्धा दोघांनी एकमेकांची साथ सोडली नाही. त्यांच्या या सगळ्या जीवनाविषयी त्यांनी 'मास्तरांची सावली' या पुस्तकात वर्णन केले आहे. नारायण सुर्वे यांच्या कवितेची मराठी साहित्यजगताने दखल घेतली. कालांतराने नारायण सुर्वे यांच्या मुलाचे लग्न जमवण्याची वेळ आली, अशातच लग्न जमवताना, मुलीकडच्या लोकांनी नारायण सुर्वे यांची जात कोणती, त्यांचे कूळ कोणते याविषयी प्रश्न करायाला सुरूवात केली. आपल्या मुलाचे लग्न व्यवस्थित पार पाडावे एवढीच चिंता सुर्वे यांना सतावत होती. अशातच कुसुमाग्रजांना हा सगळा प्रकार लक्ष्यात आला, या वेळी वरपक्षाशी संपर्क साधत कुसुमाग्रज म्हणाले 'नारायण सुर्वे हा माझा मुलगा असं त्यांना सांगा, झालं तर मग ?" कुसुमाग्रजांच्या या एका वाक्याने समस्त सुर्वे कुटुंबियांना धीर दिला. नारायण सुर्वे यांच्या मुलाच्या लग्नाला कुसुमाग्रज जातीने उपस्थित राहिले.
पुढे १० मार्च १९९९ रोजी कुसुमाग्रज यांचे वृद्धपकाळाने निधन झाले. कुसुमाग्रज आज हयात नसले तरी त्यांची लेखणी मराठी काव्यविश्वात नवनवीन ठिणग्या पेटवत असते. कधी ती युवक युवतींना प्रेम कर भिल्लासारखं सांगते, तर कधी ' पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा' असं सांगत बळ देते. मराठी साहित्य विश्वात आपल्या अक्षरांनी सुवर्णलेणी कोरणाऱ्या या महाकवीला दै. मुंबई तरूण भारतचा मानाचा मुजरा.