रशिया आणि युक्रेन युद्ध सुरु होऊन, आता तीन वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला आहे. लाखोंच्या संख्येने झालेल्या मनुष्यहानीनंतरही, हा संघर्ष थांबण्याचे नाव नाही. अमेरिकेत झालेल्या सत्तांतरानंतर या संघर्षाला पूर्णविराम मिळेल, या आशेवर कोट्यवधी लोक जगत आहेत. युद्ध ही गोष्ट भीषण आहे, पण त्याहून भयावह म्हणजे या युद्धाचा परिणाम! दुसर्या विश्वयुद्धानंतर अनेक राष्ट्रांना स्थिरस्थावर होण्यासाठी, काही दशकांचा काळ जावा लागला. या दशकांमध्ये झालेली राजकीय, सामाजिक, आर्थिक स्थित्यंतरांमुळे, जगभरातील समाजमन ढवळून निघाले. वर्तमानात युक्रेन हा देशसुद्धा,अशाच स्थित्यंतरातून जात आहे. एका बाजूला शस्त्रबद्ध सैनिकांची तुकडी जीवाची बाजी लावून युद्धामध्ये उतरली आहे, तर दुसर्या बाजूला आपल्या देशातील सांस्कृतिक वारसा आपण कसा जतन करायाचा, याची चिंता युक्रेनला दिवसरात्र पोखरत आहे.
रशियाने केलेल्या हवाई हल्ल्यामध्ये, युक्रेनमधील अनेक ऐतिहासिक वास्तू बेचिराख झाल्या. अनेक संग्रहालये उद्ध्वस्त झाली. त्याचसोबत रशियातील लष्करी फौजांना जिथे जिथे घुसखोरी करणे शक्य झाले, त्या ठिकाणच्या अनेक मौल्यवान कलाकृती त्यांनी लुटून नेल्या. अनेक इतिहासकर आणि कायदेतज्ञांचे असे मत आहे की, ही लुटालूट आणि हल्ले यांचा संबंध केवळ युद्धाशी नाही, तर युक्रेनची असलेली सांस्कृतिक अस्मिता रशियाला संपुष्टात आणायची आहे. युक्रेनच्या सांस्कृतिक स्थळांच्या रक्षणासाठी काम करणार्या हॅलिना च्यझिक म्हणतात की, “उद्या जरी आम्ही युद्धात आघाडी घेतली आणि युद्ध जिंकलो, तरी त्याचा उपयोग काय? आमच्या ऐतिहासिक वास्तू, आमची ग्रंथसंग्रहालये जर नष्ट होणार असतील, तर जगाच्या पाठीवर आमची ओळख काय राहणार?”
युनेस्कोच्या एका अहवालानुसार, आतापर्यंत युक्रेनमधील ४०० पेक्षा जास्त सांस्कृतिक वारसास्थळे उद्ध्वस्त झाली आहेत.
युक्रेनमधील रहिवाशांचा या आकडेवारीशी मतभेद असून, उद्ध्वस्त झालेल्या स्थळांची संख्या जास्त असल्याचा दावा त्यांनी केला आहे. युद्धाचे रान पेटल्यानंतर, इतिहासकार लिओनिड मारुश्चाक यांनी हाच ऐवज वाचवण्याचा प्रयत्न सुरू केला. आतापर्यंत लाखो चित्रे, शिल्पे यांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्यात,मारुश्चाक यांना यश आले आहे. बखमुत नावाच्या एका शहरावर रशियातील सैनिकांनी ज्यावेळेस हल्ला चढवला, त्यावेळेस महत्प्रयासाने त्यांनी एका वाघाचे शिल्प वाचवले. सदर शिल्प किमान हजार वर्षे तरी जुने असल्याचा, इतिहासकारांचा अंदाज आहे. या संदर्भात माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, “शहर जवळपास बेचिराख झाले होते. संग्रहालयाच्या भिंती कोसळल्या होत्या. या परिस्थितीमध्ये आम्ही काही निवडक लोक ते शिल्प वाचवण्यासाठी धावलो.”
अनेक इतिहासकारांसाठी वर्तमानात सुरू असलेल्या या युद्धाचे दस्तऐवजीकरण करणे, हीसुद्धा एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. युद्धामुळे संस्कृतीचा अमूल्य ठेवा नष्ट होणे किंवा तो जाणीवपूर्वक नष्ट करणे, ही बाब निंदनीय आहे. काही इतिहासकारांच्या मते, सांस्कृतिक ठेवा जपण्याचा उत्तम मार्ग म्हणजे तो जगाच्या पाठीवर लोकांपर्यंत पोहोचायला हवा, याउद्देशाने इथल्या असंख्य वस्तू युरोपमध्ये पाठवण्यात आल्या. या वस्तुंसोबतच, एक भावनिक नाळही युक्रेनच्या नागरिकांची जोडलेली असते. आपल्या भूमीतील हा अमूल्य ठेवा नाईलाजास्तव दुसर्या देशाकडे सोपवताना, त्यांच्या मनाला प्रचंड यातना होत आहेत. युद्धजन्य परिस्थितीमध्ये, कुठल्याही क्षणी हा सांस्कृतिक वारसा नष्ट होऊ शकतो, याची चिंता अनेक इतिहासप्रेमींना झोपू देत नाही.
२०२२च्या ऑक्टोबर महिन्यात, ‘खेरसन आर्ट म्युजियम’मधील अनेक मौलिक गोष्टी रशियातील नागरिकांनी लुटल्या. जवळपास दहा हजार मौलिक शिल्पे, चित्रे, चोरण्यात आले. या म्युझियमच्या संचालिका अलिना डोत्सेन्को यांना हे लक्षात आल्यावर, प्रचंड धक्का बसला. रिकाम्या संग्रहालयात, अलिना डोत्सेन्को एकट्याच धाय मोकळून रडल्या. चोरी गेलेला सारा ऐवज परत मिळवण्यासाठी, अलिना डोत्सेन्को आज कायदेशीर लढाई लढत आहेत. आपला सांस्कृतिक वारसा आपण वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करायचा, पण या युद्धकाळात आपला ठेवा आपण वाचवू शकू याबद्दलची शाश्वती त्यांना देता येत नाही. समोर असंख्य प्रश्न आहेत, पण त्यांना समर्पक अशी उत्तरे आज नाहीत आणि हीच या काळाची शोकांतिका आहे.