मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मराठी भाषेला मिळालेला अभिजात भाषेचा दर्जा या पार्श्वभूमीवर ३ ऑक्टोबर हा दिवस अभिजात मराठी भाषा दिन सन्मान दिन म्हणून साजरा केला जाईल तसेच ३ ऑक्टोबर ते ९ ऑक्टोबरदरम्यान अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा करण्यात येणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. दि. १० मार्च रोजी महाराष्ट्र राज्याचा २०२५-२६ सालचा अर्थसंकल्प सादर करताना ते बोलत होते.
दिनांक ३ ऑक्टोबर २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मराठी भाषेला मिळालेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाली. यानंतर ठिकाणी मराठी भाषेचा, मराठी संस्कृतीचा जागर सुरू झाला. अशातच आता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला असून, यामध्ये मराठी भाषा विभागासाठी २२५ कोटी रूपयांचा निधी जाहीर करण्यात आला असून, भाषेच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची पाऊलं उचलण्यात आली आहेत.
संशोधन केंद्राची उभारणी व पुरस्कार
मराठी भाषा विद्यापीठ रिद्धपूर येथे अभिजात मराठी भाषेच्या संशोधन व अध्ययनासाठी उच्च दर्जाचे संशोधन केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे. त्याच बरोबर मराठी भाषेच्या संशोधनातील उल्लेखनीय कामगिरीसाठी पुरस्कार सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली आहे. अभिजात मराठीचा प्रचार प्रसार व्हावा, या दृष्टीने मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या संस्थांच्या माध्यमातून अभिजात मराठी भाषाविषयक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.