नाशिक: ( women cluster ) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी दिपक पाटील यांची नुकतीच महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रिकल्चरचे उपाध्यक्ष संजय सोनवणे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने भेट घेतली. याप्रसंगी प्रादेशिक अधिकारी दिपक पाटील यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला.
नाशिक जिल्ह्यातील औद्योगिक विकासाबाबत चर्चा व सूचना करण्यात आल्या. याप्रसंगी ‘महाराष्ट्र चेंबर’तर्फे उभारण्यात येत असलेल्या ‘महिला क्लस्टर’साठी राजूर बहुला औद्योगिक क्षेत्रात जागा देऊ, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिपक पाटील यांनी दिले. प्रारंभी उपाध्यक्ष संजय सोनवणे यांनी ‘महाराष्ट्र चेंबर’च्या कार्याची माहिती दिली. तसेच, उत्तर महाराष्ट्र व नाशिक जिल्ह्यात व्यापार उद्योगाच्या विकासासाठी चेंबर करत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. आयटी उद्योगांसह मोठे उद्योग नाशिकमध्ये यावे, यासाठी ‘चेंबर ऑफ कॉमर्स’तर्फे सर्व सहकार्य राहील, अशी ग्वाही दिली. तसेच, ‘महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा’नेसुद्धा यासाठी प्रयत्न करावे, असे सांगितले.
उद्योगांसाठी पोषक वातावरण व पायाभूत सुविधा, मनुष्यबळ उपलब्ध असल्याची माहितीही देण्यात आली. चर्चेत व्यवस्थापन समितीचे निमंत्रित सदस्य विजय वेदमुथा, कांतीलाल चोपडा, ‘कृषी व ग्रामविकास समिती’चे चेअरमन राजाराम सांगळे यांनी सहभाग घेतला व नवीन उद्योग येण्यासाठी विविध सूचना केल्या. याप्रसंगी ‘एव्हिएशन समिती’चे चेअरमन मनिष रावल हेदेखील उपस्थित होते.