दक्षिण भारतातल्या कर्नाटक राज्यातील ‘कन्नड’ ही एक सशक्त व समृद्ध भाषा. या भाषेतील वचनसाहित्याचा ठेवा कन्नड भाषेचे वैभव आहे. महात्मा बसवेश्वर, योगिनी अक्कमहादेवी, संत पुरंदास आदी संतांचे कन्नड साहित्यात विशेष योगदान आहे. कर्नाटकमध्ये शैव आणि वैष्णव, अशा दोन्ही भक्तिधारा पूर्वीपासून विद्यमान आहेत. वनवास काळात किष्किंधा अरण्यातील वानराज वाली-सुग्रीव यांच्या राज्यात श्रीरामाचे वास्तव्य होते. किष्किंधा विद्यमान कर्नाटक राज्यातील हम्पी परिसरात आहे. अशा प्रकारे कर्नाटकची भूमी श्रीराम-लक्ष्मणांच्या चरणस्पर्शाने, पावन झालेली भूमी आहे. कन्नड भाषेत अनेक रामायणे लिहिली गेलेली आहेत. ‘तोरवे रामायण’ त्यापैकी एक मुख्य साहित्यकृती-काव्यग्रंथ आहे. त्याचा हा अल्पपरिचय...
रामायणामध्ये किष्किंधा अरण्याचे विशेष महत्त्व आहे. वाल्मिकी रामायणामध्ये जी सप्तकांडे आहेत, त्यामध्ये एका कांडाचे नावच ‘किष्किंधा कांड’ आहे. भगवान विष्णु अवतार श्रीराम आणि भगवान शेषाचा अवतार रामबंधू लक्ष्मण. या दोन रघुकुल सुपुत्राच्या पदस्पर्शाने आणि वास्तव्याने परम पावन झालेले किष्किंधा, आज विद्यमान कर्नाटक राज्याचा भूभाग आहे. विद्यमान हम्पी परिसर हा त्रेता युगातील किष्किंधा आहे, असे अभ्यासकांचे मत आहे. किष्किंधा म्हणजे वानर राज्य. या वानरसेनेच्या सीता शोधात व युद्धातील सहभागामुळेच, रामाला लंका विजय संभव झाला. या वानर राज्याचे अधिपती वानरराज ‘वाली’ आणि त्याचा भाऊ ‘सुग्रीव’ हेसुद्धा ईश्वरी अवतारच मानले जातात. वाली हा देवराज इंद्र तथा सुग्रीव सूर्यदेवाचा पुत्र मानले जातात. एकाच मातेचे हे दोन पुत्र होते, त्यांच्या मातेचे नाव ‘ऋक्षराज’ होते.
कर्नाटकची कन्नड भाषा, एक सशक्त-संपन्न भारतीय भाषा आहे. जगतज्योती महात्मा बसवेश्वर आदी शिवशरणांचे ‘वचन साहित्य’ कन्नड भाषेचा अमृतठेवा व ऐश्वर्य आहे. कर्नाटकही शैव-वैष्णवांसह अनेक भक्ती विचाराची संगमस्थली आहे. अशा या भक्तिभूमीत श्रीरामाला दैवत मानून, त्याचे चरित्रगायन अनेक कवींनी-संतांनी केलेले आहे. कन्नड भाषेमध्ये सुमारे 20 रामायणे व रामकथा लिहिल्या गेल्या. त्यामध्ये ‘कुमुदेन्दु रामायण’, ‘रामचंद्र चरितम्’, ‘बत्तलेश्वर रामायण’ आणि ‘तोरवे रामायण’ही काही प्रमुख रामायणे मानली जातात. श्रीरामाचा विष्णुचा अवतार, देव म्हणून विविध संस्कृत रामायणातून, स्तुतीपाठ गायल्या नंतरच्या काळातील ही सर्व रामायणे आहेत. त्यामुळे या सर्व रामकथांमध्ये रामाचे परब्रह्म, देवता अशा श्रद्धाभावाने चित्रण केलेले आढळते. त्यामुळे या रामायणात, अनेक चमत्कार कथांचा सढळपणे समावेश दिसतो. अनेक ठिकाणी रामापेक्षा, रामनामाला तारकमंत्र, संजीवकमंत्र म्हणून उपासनेच्या अंगाने विशेष प्राधान्य दिलेले आहे. नामस्मरण भक्तीचे मुख्य साधन म्हणून, रामनामाचे महत्त्व विशद करण्यात आलेले आहे.
‘तोरवे रामायण’ हे 15व्या शतकाच्या दरम्यान लिहिले आहे. ते कुणी लिहिले, त्या कर्त्याचे ठामपणे संपूर्ण नाव अद्यापी अज्ञात आहे. पण, कुमार वाल्मिकी या कवीने ते लिहिले असे मानले जाते. काहींच्या मते तोरवे हे लेखक-कवीच्या गावाचे नाव आहे. ते गाव कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्ह्यात आहे. हा कवी कुमार वाल्मिकी, गुरू नरहरी यांचा शिष्य होता असे म्हणतात. काहींच्या मते, कवीचे नरहरी हे उपास्य दैवत होते. स्वतः कवीने स्वतःबद्दल स्पष्टपणे काहीही लिहिलेले नाही. त्यामुळे संशोधकांमध्ये ही विविध प्रकारची, मतमतांतरे आहेत. बहुतेक कवी स्तुतीस्तोत्रे, ग्रंथ लिहून ईश्वरार्पण करीत असत. या साहित्याचा कर्ता करविता ईश्वर असून, मी निमित्तमात्र आहे, अशा भावाने ते लिहित होते. म्हणून ते स्वतःचे नाव, गाव, मातापिता, लेखन काळ, स्थान याचा उल्लेख करीत नसत.
कुमार वाल्मिकीचे ‘तोरवे रामायण’ छंदोबद्ध काव्य आहे. ‘भामिनीषटपदी’ या छंदामध्ये, ते महाकाव्य रचलेले आहे. त्यात 112 प्रकरणे असून, 500 छंद आहेत. ‘तोरवे रामायण’ यामध्ये कवीने श्रीरामाला परब्रह्म, देवाचा अवतार मानूनच, एकूण लेखन केलेले आहे. बर्याच ठिकाणी या कवीने, कवीकुलगुरू कालिदासाच्या रघुवंश संस्कृत महाकाव्याचे अनुकरण केले आहे. विशेषतः श्रीरामाच्या वंशावळीचा सारा तपशील, या कवीने कालिदास काव्यातून घेतलेला आहे असे दिसते. या रामायणातील अर्धा अधिक भाग राम-रावण युद्धावरच आहे. त्यामुळे या रामायणात, वीर रसाचा अत्याधिक उपयोग केल्याचे दिसते. 15व्या शतकातील हिंदू समाजात, धर्मांध मुस्लीम राजवटीतील अत्याचारामुळे निर्माण झालेले भयाचे, न्यूनगंडाचे जे वातावरण निर्माण झाले होते, त्या स्थितीमध्ये हिंदू समाजात रामाच्या पराक्रम कथांद्वारे जनजागरण करण्याच्या हेतूनेही रामायणे लिहिली गेली आहेत. धर्म रक्षण, धर्मभाव जागृती हेच या रामायणांमागे मुख्य उद्देश असावा.
तोरवे रामायणाचे वैशिष्ट्य आणि वेगळेपण म्हणजे, कवीने यामध्ये दर्शवलेले श्रीरामाचे द्रष्टेपण. श्रीरामाला भविष्यात घडणार्या घटनांचे, स्वप्नदृष्टांताने पूर्व सूचन होते. उदा. 1) युवा श्रीरामाला मिथिलेला जाण्यापूर्वीच, एका स्वप्नदृष्टांतात आपण सीते समवेत एका उद्यानामध्ये विहार करीत आहोत, असे दृश्य दिसलेले असते आणि त्याबद्दल रामाने आपले कुलगुरू वसिष्ठ, गुरू विश्वामित्र यांना पूर्व कल्पनाही दिलेली असल्याचे चित्रण, या ‘तोरवे रामायणा’त आहे. 2) सीता हरण करण्यास रावण संन्याशाच्या वेषामध्ये सीतेच्या कुटीबाहेर येतो, तेव्हा पितृतुल्यविभूती समजून, सीता त्या रावणास वंदन करते, पाया पडते. 3) रावणाला आपण युद्धात मरणार आहोत याची कल्पना असते, म्हणून तो युद्धापूर्वी प्रमुख सल्लागारांची बैठक घेऊन, माझ्या मृत्यूनंतर बिभिषणाचाच आपण राज्याभिषेक करावा, असे बजावून सांगतो. एवढेच नव्हे, तर आपले सारे दागदागिने लोकांमध्ये वाटून टाकतो, असा प्रसंग घालून रावणाची प्रतिमा उजळून टाकण्याचा प्रयत्न केला. 4) राजा जनकास शेत नांगरताना एका पेटीत एक बालिका सापडते, तेव्हा हिचे काय करायचे प्रश्न पडतो? अशा वेळी ‘तोरवे रामायणात’ तेथे देवर्षी नारद प्रगटतात आणि जनक-नारद संवाद होतो. त्यानंतर राजा जनक त्या बालिकेस आपली मुलगी मानून, राजवाड्यात तिचे संगोपन करतो, हे प्रसंग, ‘तोरवे रामायणा’चे वैशिष्ट्य आहे.
15व्या शतकातील हे ‘तोरवे रामायण’ कन्नड साहित्यातील एक श्रेष्ठ कलाकृती मानले जाते. या रामायणानंतर कन्नडमध्ये रामकथा व रामायण लेखनाचा सुकाळ झाला.
॥ जय श्रीराम ॥
9881909775 (पुढील लेखात : संस्कृत नाटककार ‘भास’ याची रामपर दोन नाटकं)