पेशाने तसे ते इंजिनिअर. मुंबई महानगरपालिकेतील पाणीपुरवठा विभागातील नोकरी हे लौकिक अर्थाने त्यांच्या अर्थाजनाचे साधन.पण, त्यांचे साध्य होते ते क्रिकेट! क्रिकेटच्या मैदानाबाहेरही पैसे कमावता येतात आणि तेही अगदी बक्कळ, हे संझगिरीने आम्हा क्रीडा पत्रकारांना दाखवून दिले. पैसे अर्थात चांगल्या पद्धतीने. क्रिकेटच्या मैदानावरील थरार आपल्या लेखणीने आणि नंतर स्टेज शोने अवघ्या जगभरात पोहोचविणारे संझगिरी हे खर्या अर्थाने क्रिकेटच्या मैदानाबाहेरील ‘द ग्रेटेस्ट शोमॅन ऑफ क्रिकेट’ होते.
आकाशवाणीचे समालोचन ऐकण्याबरोबरच, खर्या अर्थाने दूरदर्शनवर दुरून दिसणारा क्रिकेटचा खेळ हा पुढे उपग्रह वाहिनी आणि त्यानंतर ओटीटी आणि युट्यूबमुळे घरोघरी पोहोचण्याचा तो काळ होता. जे क्रिकेट वर्तमानपत्राच्या वाचकांनी आपल्या डोळ्यांनी पाहिलेले असायचे, ते पुन्हा दुसर्या दिवशी वर्तमानपत्रातून लोकांना नव्याने काय सांगायचे, असा प्रश्न क्रीडापत्रकारांना पडण्याचे ते दिवस होते. इंटरनेटमुळे आणि मोबाईल क्रांतीमुळे क्रिकेटचा स्कोअर एका क्लिकवर मिळत होता. स्कोअर आणि अवघे क्रिकेट ओटीटीमुळे समोर असताना केवळ आपल्या शब्दांच्या जादूने अवघ्या जगभरात आपला चाहतावर्ग निर्माण करणारे क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी खर्या अर्थाने शब्दांचे जादूगार होते. क्रिकेटच्या वार्तांकनात त्यांनी खर्या अर्थाने ‘संझगिरी स्टाईल’ विकसित केली. अनेकांनी त्या स्टाईलची कॉपी करण्याचा नंतर प्रयत्नही केला. पण, शेवटी ओरिजिनल ते ओरिजिनलच! बापू नाडकर्णींपासून ते अजित वाडेकर, सचिन तेंडुलकरपासून अगदी कालपरवापर्यंतच्या अजिंक्य रहाणेंपर्यंत सर्वांशी मैत्री जपणारे संझगिरी आम्हा सगळ्या पत्रकारांसाठी ‘यारों का यार’ होते. पप्पू हे त्यांचे आम्हा मित्रमंडळीतील टोपण नाव.
संझगिरी एकटाकी होते. त्यांचे गाजलेले अनेक लेख त्यांनी फोनवरून सांगितलेले आहेत. मी दै. ‘सामना’त असताना आणि माझ्यानंतर मंगेश वरवडेकरने त्यांच्या या लेखनप्रपंचाला अनेकदा फोनवरून हातभार लावलेला असायचा. त्यांनी कधीही लॅपटॉप वापरला नाही. त्याबाबत ते अगदी ओल्ड स्कूलचे विद्यार्थी होते. जगात कुठेही गेले, तरी ते हाताने लेख लिहायचे. मग त्याचा फोटो काढायचे. तो आधी मेल आणि नंतर व्हॉट्सअप आल्यावर त्याच्यावर पाठवायचे. त्यांचे अक्षर समजणे म्हणजे मुरलीधरनचा टॉपस्पिन कळण्याइतके अवघड असायचे. पण, विश्वास ठेवा दै. ‘सामना’त त्यांचा लेख ऑपरेट करण्यासाठी आणि त्याचे मुद्रितशोधन करण्यासाठी चढाओढ असायची. त्यांच्या क्रिकेटच्या लेखनात मधूनच मधुबाला झळकायची. ‘शोले’तील गब्बर यायचा. अगदी अटल बिहारी वाजपेयींपासून ते मोदींपर्यंत असंख्य व्यक्तिरेखा चपखल असायचे. क्रिकेटच्या लेखात यांचे काय काम, असा कधी आपल्याला प्रश्नच पडायचा नाही. ‘अटल बिहारी वाजपेयींच्या दोन शब्दांतील पॉझमध्ये सचिन आरामात दोन धावा काढू शकतो, इतका त्याचा धावण्याचा वेग प्रचंड होता,’ असे लिहिताना कुठेही वाजपेयींचा उपमर्द होणार नाही, पण त्याचवेळी सचिन ‘नॉनस्ट्राईक एण्ड’ला असतानाही कसा दुसर्यांच्या धावांसाठी जीवापाड धावतो, हे सांगण्याची स्टाईल वाचकांची दाद मिळवून जायची. एकदा सचिनने 75 शतक केल्याबद्दल त्याचा सत्कार करावा, म्हणून ‘मुंबई क्रीडा पत्रकार संघा’चा सेक्रेटरी म्हणून मी आणि खजिनदार म्हणून मंगेश वरवडेकर असे आम्ही दोघे संझगिरींना भेटायला गेलो. संझगिरी हा माणूस खुल्या दिलाचा! ऐकण्याची त्यांची क्षमता अफाट होती. आमचा प्रस्ताव ऐकल्यावर संझगिरी लगेच फ्रन्टफुटवर खेळायला तयार झाले. शिवाजी पार्क जिमखान्याच्या वरच्या हॉलवर शाल-श्रीफळ असा मराठमोळा सत्कार करण्याचे ठरले. सचिन येणार म्हटल्यावर काहीतरी वेगळे करूया, अशी सूचना संझगिरी यांनी केली. दिग्दर्शक भुरे, श्रीरंग गोडबोले, अतुल परचुरे यांना बोलावण्याची जबाबदारी संझगिरींनी उचलली. मग मी म्हटले, “आपण कार्यक्रम एवढा मोठा करणार, तर शाल-श्रीफळाऐवजी सचिनला 75 ग्रॅम सोन्याची बॅट दिली तर?” विश्वास ठेवा, त्यावेळी संझगिरी काय किंवा मी आणि मंगेश काय, आमच्या कुणाच्याही खिशात अगदी संझगिरींच्याच भाषेत सांगायचे झाले, तर फुटी कवडी नव्हती. तरीही संझगिरींनी मला आणि मंगेशला प्रोत्साहन दिले. सुभाष हरचेकरांनी त्यांच्या सुवर्णकारांची भट्टी बॅटसाठी जमवली. मी ‘स्पॉन्सर्स’ आणले आणि मंगेशने ‘ग्राऊंड इव्हेंट’चे शिवधनुष्य पेलले. सगळे जमून आले. पण, आता सचिनचा सत्कार कोणी करायचा, यावर पुन्हा चर्चेचे गुर्हाळ सुरू झाले. सगळ्यांचे एकमत झाले की, हा सत्कार ‘भारतरत्न’ लता मंगेशकर यांच्या हस्तेच झाला पाहिजे. आता दिदींना आणायचे कसे? या प्रश्नाचे उत्तर म्हणजे संझगिरी! दिदी सत्काराला यायला तयार झाल्या आणि अखेर मुंबई मराठी क्रीडा पत्रकारांतर्फे 75 ग्रॅम सोन्याची बॅट सचिनला लता दिदींच्या हस्ते भव्यदिव्य क्रार्यक्रमात बहाल करण्यात आली. या कार्यक्रमाला सचिनचे संपूर्ण कुटुंब अगदी त्याची बहीण सविता, भाऊ नितीन आणि अजित आणि आईसुद्धा हजर होती. माझ्या माहितीप्रमाणे, सचिनच्या कार्यक्रमाला हजर राहण्याची सचिनच्या आईची ती बहुदा पहिली आणि शेवटची वेळ असेल. पण, हे सर्व जमून आले ते केवळ संझगिरींमुळेच! खर्या अर्थाने संझगिरी हे क्रिकेटच्या मैदानाबाहेरील क्रिकेटचे ‘द ग्रेटेस्ट शो मॅन’ होते.
संझगिरी क्रिकेटसोबत संगीतातही तितकेच रमले. क्रिकेट आणि बॉलिवूडची क्रिकेटमध्ये त्यांनी घातलेली सांगड अफलातून असायची. श्रीलंकेचा कॅप्टन रणतुंगाच्या चेहर्यावरील हावभावाचे वर्णन करण्यासाठी बॉलिवूडमधील भारत भूषणच्या चेहर्याचे केलेले वर्णन इतके अचूक असायचे की, आपणही ‘क्या बात हैं’ असे म्हटलेच पाहिजे. विनोद कांबळीचा फ्लिक आणि माधुरीचा ठुमका, सरळ रेषेतील सचिनचा स्ट्रेट ड्राईव्ह आणि नूतनचे ऐटदार चालणे अशी कितीतरी त्यांची विशेषणे आजही मनात रुंजी घालतात. देवानंदपासून ते अगदी अक्षय कुमारपर्यंत सगळ्या हिरोंना त्यांनी क्रिकेटच्या आपल्या लेखणीत शब्दबंद केले होते. मधूनच कधीतरी ट्रम्प अगदीच जास्त झाले, तर रामदास आठवलेही लेखात डोकावून जायचे. त्यांची ही खास संझगिरी शैलीची नकल पुढे कुणी करू शकेल, असे वाटत नाही.
पप्पू, मी, मंगेश वरवडेकर आणि ज्ञानेश भुरे असे आम्ही चार क्रीडा पत्रकार 2007 सालच्या ‘वेस्ट विंडीज वर्ल्डकप’साठी जवळपास दीड महिना रुम पार्टनर होतो. संझगिरींच्या पत्नी कल्पना सावलीसारख्या त्यांच्यासोबत असायच्या. वयाच्या तिशीत आलेल्या हार्टअॅटकनंतर संझगिरींच्या आयुष्याला शिस्त लावण्याचे काम कल्पना वहिनींनी केले. आम्ही गमतीने त्यांना ‘मॅच रेफ्री’ म्हणायचो. त्यांचे ते दहीभाताचे जेवण वहिनी इतक्या आपुलकीने बनवायच्या की, आमच्या जेवणातील मांसाहरी जेवण त्या दहीभातापुढे फिके पडायचे. पप्पूच्या आयुष्यातील यशात वहिनींचा वाटा खूप मोठा होता. वेस्ट इंडिज दौर्यात गॅरी सोबर्सच्या घराची, रिचर्डच्या आईच्या झोपडीवजा घराची संझगिरीसोबत केलेली सफर म्हणजे आठवणींचा अद्भुत खजिनाच! त्यावर एक स्वतंत्र लेख होईल. संझगिरी उर्फ पप्पू जीवन रसरसून जगला. त्याला श्रद्धांजली वगैरे शब्द बिलकूल आवडायचे नाहीत. त्यामुळे इतकेच म्हणतो, अलविदा पप्पू. आठवणीत तर तू राहशीलच, पण या हृदयाचे काय करायचे? तू नाहीस हे मान्य करायला ते तयार नाही!
संदीप चव्हाण