मस्साजोग प्रकरणातील नियुक्तीनंतर उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
26-Feb-2025
Total Views | 104
मुंबई : मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची तर बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकिल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर आता उज्ज्वल निकम यांनी यावर पहिली प्रतिक्रिया दिली.
माध्यमांशी बोलताना उज्ज्वल निकम म्हणाले की, "माझ्या नियुक्तीकरिता मस्साजोगचे ग्रामस्थ सातत्याने मागणी करत होते. तसेच त्यांनी काल अन्नत्याग आंदोलन सुरु केले हे ऐकून मी खूप व्यथित झालो होतो. त्यामुळे मी हा खटला चालवण्यासाठी तयार असल्याचे काल मुख्यमंत्र्यांना कळवले. त्याप्रमाणे त्यांनी तसे आदेश पारित केले आहेत."
"मस्साजोगच्या सर्व ग्रामस्थांनी उपोषण सोडावे. या देशात कायदा आणि न्याय सर्वोच्च आहे. त्यामुळे आपल्या तब्येतीला त्रास होईल असे कुठलेही कृत्य ग्रामस्थांनी करू नये. त्यांनी उपोषण थांबवावे. या खटल्यातील तपास यंत्रणा जेव्हा आरोपपत्र दाखल केल्यानंतर आम्ही हा खटला तातडीने चालवण्यासाठी घेऊ," असे आवाहन त्यांनी ग्रामस्थांना केले.
विरोधकांच्या गाऱ्हाण्याला महत्व देत नाही
"माझ्या नियुक्तीचे राजकीय पडसाद उमटतीला याची मला पूर्वीच कल्पना होती. त्यामुळे मी मुख्यमंत्र्यांनादेखील हे सांगितले होते. पण यापूर्वीदेखील विरोधी पक्षाचे अनेक वकील राजकारणात होते, असे मला मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितले. मी यापूर्वी कधीही राजकारण सक्रीय नव्हतो आणि मी राजकारणात असलो तरी माझ्या कर्तव्यात आणि ड्युटीमध्ये कुणीही आडवे येऊ शकत नाही. त्यामुळे मी त्याच जोमाने चालत राहील. विरोधकांच्या गाऱ्हाण्याला मी महत्व देत नाही. कारण केवळ विरोधासाठी विरोध करणे हा सध्या त्यांचा स्थायी स्वभाव आहे," असेही उज्ज्वल निकम यांनी सांगितले.