‘छावा’चित्रपटाविरूध्द शिर्केंच्या वंशजांचा आक्षेप, म्हणाले,"चित्रपटातला तो प्रसंग हटवा अन्यथा..."
22-Feb-2025
Total Views |
मुंबई : गणोजी आणि कान्होजी शिर्के यांचे वंशज असलेल्या शिर्के कुटुंबियांनी हिंदी चित्रपट ‘छावा’ विरुद्ध आक्षेप नोंदवला आहे. त्यांच्या मते, या चित्रपटात त्यांच्या कुटुंबाची चुकीची आणि नकारात्मक प्रतिमा दाखवली गेली आहे. तसेच, ऐतिहासिक तथ्यांचा विपर्यास करून त्यांच्या पूर्वजांचा चुकीच्या पद्धतीने उल्लेख करण्यात आला आहे.
कुटुंबियांचा चित्रपट निर्मात्यांवर गंभीर आरोप:
शिर्के कुटुंबाच्या मते, या चित्रपटात त्यांचे पूर्वज खलनायक म्हणून दाखवण्यात आले आहेत. मात्र, प्रत्यक्षात गणोजी आणि कान्होजी शिर्के हे छत्रपती शिवाजी महाराजांचे निष्ठावान सेनानी होते, असा दावा कुटुंबाने केला आहे. लक्ष्मीकांत राजे शिर्के, जे गणोजी आणि कान्होजी शिर्के यांचे १३वे वंशज आहेत, म्हणाले, “हा इतिहासाचा विपर्यास असून, आमच्या कुटुंबाच्या प्रतिष्ठेवर डाग लावण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे आम्ही चित्रपट दिग्दर्शकाला नोटीस पाठवली असून, त्यांच्याविरोधात १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा खटला दाखल करू.”
दिग्दर्शकाला नोटीस; राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा :
शिर्के कुटुंबाने २० फेब्रुवारी रोजी दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांना अधिकृत नोटीस पाठवली असून, त्यांनी चित्रपटात आवश्यक बदल करावेत, अशी मागणी केली आहे. जर हे बदल करण्यात आले नाहीत, तर राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा देखील कुटुंबाने दिला आहे. याच दिवशी, शिर्के कुटुंबियांनी पुणे शहर पोलीस आयुक्तालयातही लेखी तक्रार दाखल केली असून, चित्रपट निर्मात्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
“आम्ही इतिहासाचा सन्मान राखणाऱ्या चित्रपटांना पाठिंबा देतो. मात्र, जर चुकीच्या पद्धतीने आमच्या कुटुंबाची प्रतिमा मांडली जात असेल, तर आम्ही त्याविरोधात लढा देऊ,” असे शिर्के कुटुंबियांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर छावा चित्रपटात बदल करून चित्रपट पुन्हा प्रदर्शित करावा असे त्यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमाद्वारे दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांना सुचित केले. चित्रपट ‘छावा’च्या निर्मात्यांनी या प्रकरणावर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.