मुंबई : (WPL 2025) भारतातील महिला प्रीमियर लीगची आजपासून म्हणजेच १४ फेब्रुवारीपासून बडोदा येथे सुरुवात होत आहे. गतविजेते बंगळुरू आणि गुजरात यांच्यातील सलामी लढतीने या स्पर्धेच्या तिसऱ्या हंगामाला सुरुवात होईल. हा सामना बडोदा येथील कोतंबी स्टेडियमवर होणार आहे. यंदा बडोदा, बंगळुरू, लखनऊ आणि मुंबई या ४ शहरांमध्ये या स्पर्धेचे सामने खेळवले जाणार आहेत.
५ संघांमध्ये रंगणार स्पर्धा
महिला प्रीमियर लीग मध्ये एकूण ५ संघ खेळतात, ज्यात गुजरात जायंट्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि यूपी वॉरियर्स यांचा समावेश आहे. लीग टप्प्यात, सर्व संघांना एकमेकांविरुद्ध किमान २ सामने खेळण्याची संधी मिळेल, ज्यामध्ये पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानावर असलेला संघ थेट अंतिम सामन्यासाठी पात्र ठरेल, तर एलिमिनेटर सामना दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर असलेल्या संघांमध्ये खेळला जाईल. चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाचा संघ थेट बाहेर पडणार आहेत.
पहिल्या हंगामात, हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स संघाने जेतेपदाचे चषक जिंकले होते, तर दुसऱ्या म्हणजेच गेल्या हंगामात स्मृती मंधानाच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू महिला संघाने विजेतेपद जिंकण्यात यश मिळवले होते. यावेळी, महिला प्रीमियर लीगचा अंतिम सामना १५ मार्च रोजी मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.