कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ‘ए-आय’ची उपयुक्तता आणि त्याचे जाणवणारे तोटे हे येणारा काळच ठरवेल. मात्र, ‘ए-आय’ने काही क्षेत्रांमध्ये क्रांती करण्यास सुरुवात केली आहे. वन्यजीव संशोधन आणि संवर्धनाचे क्षेत्र हे त्यामधील एक. ‘ए-आय’चा वापर करून ओळख पटवण्यामध्ये किचकट ठरणार्या पक्ष्यांची ओळख आपण चुटकीसरशी कशी करू शकतो, यावर संशोधन करण्यात आले आहे. याच संशोधनाचा आढावा घेणारा हा लेख...
पक्षी निरीक्षणातील महत्त्वाचा भाग म्हणजे पक्ष्यांच्या वेगवेगळ्या प्रजातींची ओळख पटवणे. अनेक पक्ष्यांच्या शारीरिक बाह्यरचनेमध्ये कमालीचे साम्य असते. हे साम्य इतके तंतोतत असते की, बर्याच वेळेला या पक्ष्यांची सूचक ओळख पटवणे डोकेदुखी ठरते. ओळख पटवण्यामध्ये गल्लत होणारा असाच एक पक्षीसमूह म्हणजे ‘वटवट्या’ पक्ष्यांचा अर्थात ‘वॉर्बलर’चा (Warbler).
वटवट्या हे आकाराने लहान असणारे आणि प्रामुख्याने कीटक खाणारे पक्षी आहेत. हे पक्षी आशिया खंडातील विविध भागांत आढळतात. या समूहातील ‘फायलोस्कोपस बर्की कॉम्प्लेक्स’मध्ये समाविष्ट असलेले वटवट्या पक्ष्यांच्या प्रजाती इतक्या समान दिसतात की, त्यांचे अचूक वर्गीकरण करणे अवघड जाते. ‘बर्की कॉम्प्लेक्स’ हा आग्नेय आणि दक्षिण आशियातील पर्वतांमध्ये आढळणार्या वटवट्या पक्ष्यांच्या प्रजातींचा एक समूह आहे. या कॉम्प्लेक्समध्ये ग्रीन क्राऊन वॉर्बलर, ग्रे क्राऊन वॉर्बलर, मार्टेन्स वॉर्बलर, अलस्ट्रोम वॉर्बलर, बियांची वॉर्बलर, ग्रे-चीक वॉर्बलर आणि व्हिस्लर वॉर्बलर या प्रजातींचा समावेश होतो. या समूहातील वटवट्या पक्ष्यांची नैसर्गिक अधिवासात ओळख पटवणे कठीण जाते. कारण, ते खूपच एकसारखे दिसतात. त्यांची पिसे, अधिवास आणि वर्तन हे एकसारखेच असते. ’जर्नल ऑफ वाईल्डलाईफ सायन्स’ या नियतकालिकामध्ये नुकत्याच प्रकाशित झालेल्या अभ्यासातून असे दिसून आले की, कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ‘ए-आय’ हे वटवट्या पक्ष्यांना ओळखण्यासाठी पडणारे कोडे सोडवण्यास बहुतांश प्रमाणात सक्षम ठरत आहे. त्यामुळे या पक्ष्याचे संवर्धन करण्यास मदत मिळणार असल्याची आशा संशोधकांनी व्यक्त केली आहे.
‘फायलोस्कोपस बर्की कॉम्प्लेक्स’मध्ये सात प्रजातींचा समावेश होतो. या प्रजाती अनुवांशिकदृष्ट्या वेगळ्या आहेत. मात्र, उत्क्रांतीच्या काळात त्यांच्या शारीरिक बाह्यरचनेत फारसा फरक झालेला नाही. त्यांच्या शरीररचनेत काही सूक्ष्म फरक असतात. जसे की, पंखांवरच्या पट्ट्या, डोळ्यांभोवतीच्या वर्तुळांमधील फरक, मुकुटाच्या रंगात असलेला किंचित फरक. हे फरक पक्षीनिरीक्षणादरम्यान आपल्या नजरेमधून सहज निसटण्याची शक्यता असते. या सर्व प्रजातींच्या सारखेपणामुळे ‘ई-बर्ड’सारख्या ‘सिटिझन सायन्स’ व्यासपीठावरदेखील नकळतपणे चुकीच्या नोंदी नोंदवल्या जातात. त्यामुळे पुढील शोधकार्यामध्ये बाधा उत्पन्न होऊ शकते, असे या शोध निबंधाचे सहलेखक सागर राजपूरकर सांगतात.
या समस्येवर एक उपाय म्हणून मानवी क्षमतेच्या पलीकडे जाऊन, संशोधकांनी ‘ए-आय’ला छायाचित्रांच्या विश्लेषणासाठी प्रशिक्षित केले आहे. यासाठी ‘YOLOv5’ नावाचे एक अत्याधुनिक ऑब्जेक्ट-डिटेक्शन मॉडेल वापरण्यात आले आहे. ज्यामध्ये पी. टेफ्रोसिफॅलस (राखाडी-मुकुटाचा वटवट्या/ग्रे क्राऊन वॉर्बलर), पी. व्हॅलेंटिनी (बियांची वटवट्या), पी. व्हिसलरी (व्हिस्लर वटवट्या), पी. पोलिओजेनिस (राखाडी-गालाचा वटवट्या) या चार प्रजातींचे जवळपास तीन हजारांहून अधिक फोटो वापरले गेले आहेत. संशोधकांनी नैसर्गिक आणि वास्तविक परिस्थितींचे अनुकरण करण्यासाठी फोटोंची दिशा बदलणे, प्रकाश कमी-जास्त करणे, असे वेगवेगळे पर्याय घेऊन त्यांचा डेटासेट तयार केला आहे.
‘सुपरसिलियम’ची रुंदी म्हणजेच पक्ष्याच्या डोळ्यांवरील पट्टे किंवा त्यांच्या पायाचा रंग यासारखे सूक्ष्म तपशील मानवी निरीक्षणातून सहज दुर्लक्षित होतात. परंतु ‘ए-आय’ने हे सूक्ष्म फरक एकूण ९४ टक्के अचूकता दर मिळवून त्यांचे वर्गीकरण केले आहे. जेव्हा अनेक प्रजातींच्या अधिवासाचा विस्तार भौगोलिकदृष्ट्या एकमेकांना लागून असतो, तेव्हा या ‘ए-आय’ मॉडेलची ओळख पटवण्यामध्ये असलेली अचूकता कमी होते. परंतु, जेव्हा भौगोलिक आणि स्थानिक माहिती पुरवून या ‘ए-आय’ मॉडेलला निर्देशित केल्यास अधिक ठोस आणि खात्रीपूर्वक माहिती मिळते, असे या शोधनिबंधाचे मुख्य संशोधक, आणि ‘भारतीय वन्यजीव संस्थान’चे ‘पीएच.डी.’ स्कॉलर तुषार परब यांनी सांगितले.
एखाद्या परिसंस्थेची गुणवत्ता आणि तिचा नैसर्गिक समतोल नीट समजून घेण्यासाठी तिथल्या प्रजातींची अचूक ओळख महत्त्वाची असते. यासाठी आपल्याला ‘ए-आय’ची मदत होऊ शकते. ‘आय नॅच्युरलिस्ट’ किंवा ‘ई-बर्ड’सारख्या व्यासपीठांवर चुका कमी करणे, संशोधकांसाठी डेटा विश्लेषण जलद करणे आणि विविध अॅप्सद्वारे रिअल-टाईम आयडी सपोर्टसह पक्षीप्रेमींना सक्षम करण्यामध्ये ‘ए-आय’चा महत्त्वाचा हातभार यापुढे असणार आहे. सध्या या चार प्रजातींव्यतिरिक्त इतर ९५ प्रजातींवर हे मॉडेल वापरून आणि त्यात पक्ष्यांच्या आवाजांचा समावेश करून त्यांचे वर्गीकरण करण्याचे काम सुरू आहे. हा अभ्यास फक्त वटवट्या पक्ष्यांसाठी सीमित नसून जैवविविधतेचे संरक्षण करण्यासाठीची एक रूपरेषा आहे. अशा सर्व प्रकारच्या संशोधनात ‘धजङर्जीं५’सारखी साधने जैवविविधतेत होणार्या बदलांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी, तसेच पर्यावरणाच्या संरक्षणासाठी अतिशय उपयुक्त ठरू शकतात. मानवी बुद्धी आणि ‘ए-आय’चा योग्य वापर यांचा समन्वय जीवसृष्टीच्या भविष्यासाठी मोलाचे योगदान ठरणार आहे.
(लेखिका ‘भारतीय वन्यजीव संस्थान’मध्ये संशोधिका म्हणून कार्यरत आहेत.)