पाणपक्ष्यांचे तानसा; अभयारण्यात आल्यात ७५ हून अधिक स्थलांतरी पक्ष्यांच्या प्रजाती

    20-Jan-2025
Total Views | 87
tanasa wetland bird



पाणथळ प्रदेशात अधिवास करणार्‍या पक्ष्यांना केंद्रस्थानी ठेवून तानसा वन्यजीव अभयारण्यामध्ये प्रथमच पाणपक्षी गणना पार पडली (tanasa wetland bird). या गणनेत अनेक स्थलांतरित पाणपक्ष्यांचे दर्शन झाले (tanasa wetland bird). या गणनेविषयी माहिती देणारा लेख...(tanasa wetland bird)
तानसा म्हटले की पक्षीनिरीक्षकांची पाऊले ही संकटग्रस्त वनपिंगळा पक्ष्याला पाहण्यासाठी या अभयारण्याकडे वळतात. जंगलात अधिवास करणार्‍या पक्ष्यांच्या समृद्ध विविधतेसाठी या अभयारण्याला ओळखले जाते. सह्याद्रीत केवळ याच अभायरण्यात दिसणारा वनपिंगळा या ठिकाणाचे वैशिष्ट्य आहेच. सोबतच मलबारी कर्णा पक्ष्याचा वावरदेखील या जंगलाचे वेगळेपण दर्शवतो. मात्र, या जंगलाला तितकीच समृद्ध पाणथळ जैवविविधता लाभली आहे, ती तानसा धरणामुळे. विस्तीर्ण पसरलेल्या तानसा जलाशयामुळे या अभयारण्यात अनेक जातींचे पाणपक्षीही सापडतात. काही देशी, तर काही परदेशी. हिवाळ्यात स्थलांतरी पक्ष्यांचे थव्यांचे थवे तानसा जलाशयात उतरतात. जगामध्ये ’वेटलॅण्ड्स इंटरनॅशनल’ या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या माध्यमातून विविध भागांमध्ये पाणथळींवर अवलंबून असणार्‍या पक्ष्यांची गणना केली जाते. त्या अनुषंगाने त्या भागातील पाणथळ जागा सुरक्षित करण्यामध्ये साहाय्य मिळते. कारण, पाणथळ जागा स्थलांतरी पक्ष्यांच्या दरवर्षीच्या स्थलांतरामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. या पार्श्वभूमीवर पाणथळींवर येणार्‍या पक्ष्यांची गणना रविवार, दि. 19 जानेवारी रोजी तानसा वन्यजीव अभयारण्यात प्रथमच पार पडली.
 
 
तानसा अभयारण्यात तानसा जलाशय, मोडक सागर जलाशय तसेच काही पाझर तलाव आणि नद्यांची पात्रे आहेत. हिवाळ्यामध्ये प्रामुख्याने थंड प्रदेशातील विविध प्रकारचे पाणपक्षी या भागात आवर्जून दरवर्षी भेट देत असतात. यामध्ये नकट्या बदक, थापट्या बदक, भुवई बदक इत्यादी प्रकारच्या बदकांच्या प्रजाती आणि सामान्य तुतारी, हिरवी तुतारी, सामान्य हिरवा टिलवा अशा काही किनारी पाणपक्ष्यांचादेखील समावेश असतो. रविवारी वनविभाग आणि ’आऊल कॉन्झर्वेशन फाऊंडेशन’च्या माध्यमातून अभयारण्यातील पाणवठ्यांवर पाणपक्ष्यांची गणना पार पडली. सकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत ही गणना झाली. यामध्ये प्रामुख्याने वनकर्मचारी आणि मुंबई, ठाणे व पुण्यातील पक्षीनिरीक्षक सहभागी झाली होते. या माध्यमातून 75 प्रजातींच्या पाणथळ पक्ष्यांची नोंद करण्यात आली. यामध्ये हळदीकुंकू बदक, थापट्या बदक, मलिन बदक, तरंग बदक, तलवार बदक, चक्रांग बदक अशा काही बदकांच्या प्रजातींबरोबरीनेच छोटा कंठेरी चिखल्या, उघड्या चोचीचा करकोचा, रंगीत करकोचा, नदी सुरय अशा काही पक्ष्यांच्यादेखील नोंदी करण्यात आल्या. पाणपक्ष्यांची गणना उपवनसंरक्षक अक्षय गजभिये, साहाय्यक वनसंरक्षक दत्तात्रेय मिसाळ यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत वन परिक्षेत्र अधिकारी (खर्डी) एकनाथ रोंगटे, तानसाचे रमेश रसाळ, वैतरणाचे प्रकाश चौधरी आणि पंकज पवार यांच्या सहकार्याने ’आऊल कॉन्झर्वेशन फाऊंडेशन’चे पक्षी अभ्यासक रोहिदास डगळे यांनी केली.



tanasa wetland bird


अर्पित ठरला आकर्षण
पुण्यातील निगडीमधील ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालयात शिकणारा सहा वर्षांचा छोटा पक्षीनिरीक्षक अर्पित चौधरी हा पाणपक्षी गणनेचे आकर्षण ठरला. मराठी माध्यमात इयत्ता पहिलीत शिकणारा हा चिमुरडा पक्षीमित्र जवळपास 400 हून अधिक पक्षी ओळखतो. बोलू लागल्याबरोबरच त्याने वाचनाची सुरुवात केली. वडील डॉ. अक्षय चौधरी यांचे पुस्तकांचे दुकान असल्यामुळे चिमुकला अर्पित दुकानात जाऊन साप आणि पक्ष्यांवर आधारित पुस्तके वाचू लागला. त्यामुळे निसर्गाची आवड निर्माण झाली. आईवडिलांनीदेखील पुस्तकात दिसणारे प्राणी-पक्षी अर्पितला प्रत्यक्ष जंगलात घेऊन जाऊन दाखवण्यास सुरुवात केली आहे. आता अर्पित ’ई-बर्ड’ किंवा ’मर्लिन’ यांसारखे पक्षीनिरीक्षणासाठी उपयुक्त असणारे अ‍ॅप सहजरित्या वापरतो. गुरुवारी तानसाच्या पाणपक्षी गणनेत तो उत्साहाने सहभागी झाला होता. पुस्तकात पाहिलेले अनेक पक्षी त्याला पहिल्यांदा पाहता आले आणि त्याने ते बिनचूक ओळखलेही!

 
तानसाविषयी
तानसा वन्यजीव अभयारण्याची निर्मिती 1970 साली करण्यात आली. हे अभयारण्य ठाणे आणि पालघर जिल्ह्यात 320 चौ. किमीमध्ये पसरलेले आहे. अभयारण्याच्या दक्षिण टोकाला पालघर जिल्ह्यातील सूर्यमाळ ही टेकडी आणि ईशान्येला ठाणे जिल्ह्यातील माहुलीचा किल्ला आहे. तानसाचे जंगल हे ठाणे, पालघर आणि नाशिकच्या वनक्षेत्राशी संलग्न आहे आणि कळसूबाई हरिश्चंद्रगड वन्यजीव अभयारण्य आणि ठाणे वनविभागाशीदेखील जोडलेले आहे. येथून ते भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य, तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्य आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, वाडा आणि जव्हार वनविभागांना जोडले जाते. तानसा हे वैतरणा, तानसा आणि गारगाई नद्यांचे एक महत्त्वाचे पाणलोट क्षेत्रदेखील आहे. वैतरणा नदीची उपनदी गारगाई, अभयारण्याच्या उत्तरेकडील भागातून वाहते आणि सुमारे दहा किमी अंतरावर पिंजाळ नदीला मिळते. 1986 मध्ये स्थानिक वनवासी आणि वन विभागाच्या कर्मचार्‍यांनी सूर्यमाळजवळ दोन वाघांची दोन केली होती. तानसाचे पर्यावरणीय महत्त्व ओळखून 625 चौ. किमीचा ’इको सेन्सिटिव्ह झोन’ (एडन) तयार करण्यात आला आहे. अभयारण्याभोवती, शहापूर, भिवंडी, मोखाडा आणि वाडा तालुक्यातील 145 गावांचा समावेश आहे. सागाच्या झाडांसाठी हे जंगल प्रसिद्ध आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
लालू प्रसाद यांचा मुलगा तेज प्रतापचा बिहार पोलिसांनी मोडला माज, विना हेल्मेट प्रवास केल्याने फाडले चलन

लालू प्रसाद यांचा मुलगा तेज प्रतापचा बिहार पोलिसांनी मोडला माज, विना हेल्मेट प्रवास केल्याने फाडले चलन

Tej Pratap Yadav जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादवचे थोरले पुत्र आणि माजी मंत्री तेज प्रताप यादव यांच्यावर बिहार पोलिसांनी कारवाई दाखल केली आहे. त्यांनी विनाहेल्मेटचा वापर करत दुचाकी वाहन चालवल्याने पाटणा पोलिसांनी दंडत्मक कारवाई केली आहे. एवढेच नाहीतर ज्या पोलिसाला धुलीवंदना दिवशी नाचण्यास भाग पाडले होते त्यानाही त्या ठिकाणी उपस्थि राहण्यास सांगितले. पटणाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक राजीव मिश्रा म्हणाले की, संबंधित अपमानित पोलिसाला त्या ठिकाणी हजर राहण्यास सांगितले होते. बिहार पोलिसांनी याविरोधात कारवाई ..