"प्रशिक्षक आणि खेळाडूंमधील..."; ड्रेसिंग रूमच्या वादावर प्रशिक्षक गौतम गंभीरने सोडले मौन
02-Jan-2025
Total Views | 81
नवी दिल्ली : (Gautam Gambhir) भारतीय क्रिकेट संघ सध्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या या कसोटी मालिकेमध्ये भारतीय संघाची कामगिरी फारशी चांगली झालेली नाही. त्यामुळेच सिडनीमध्ये होणाऱ्या शेवटच्या कसोटी सामन्यापूर्वी मेलबर्न येथील पराभवाचे पडसाद भारतीय ड्रेसिंग रुममध्ये उमटल्याच्या चर्चा होत्या. मेलबर्न पराभवानंतर भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरने भारतीय खेळाडूंना फटकारल्याचे वृत्त माध्यमांमधून समोर येत होते. परंतु गंभीरने ड्रेसिंग रुममधील या चर्चेच्या बातम्या खोट्या असल्याचे सांगितले. प्रत्येक खेळाडूला कशावर काम करायचं आहे, हे ठाऊक आहे. हा कसोटी सामना कसा जिंकायचा या एकाच विषयावर त्यांच्याशी चर्चा झाल्याचे गंभीरने सांगितले.
ड्रेसिंग रूमच्या वादावर काय म्हणाला गंभीर?
पत्रकार परिषदेत गौतम गंभीरने ड्रेसिंग रूमच्या वादावर मौन सोडले. गौतम गंभीर म्हणाला की, प्रशिक्षक आणि खेळाडू यांच्यातील चर्चा ही ड्रेसिंग रूमपुरती मर्यादित असायला हवी. जोपर्यंत ड्रेसिंग रूममध्ये प्रामाणिक लोक आहेत तोपर्यंत भारतीय क्रिकेट सुरक्षित हातात आहे. फक्त एकच गोष्ट तुम्हाला संघात ठेवू शकते आणि ती म्हणजे तुमची कामगिरी. ते पुढे म्हणाले की संघाची भावना प्रथम सर्वात महत्वाची आहे. खेळाडू त्यांचे पारंपारिक खेळ खेळू शकतात, परंतु सांघिक खेळांमध्ये वैयक्तिक खेळाडूच योगदान देतात. सर्व खेळाडूंना माहित आहे की कोणत्या बाबींवर काम करायचं आहे. हा कसोटी सामना कसा जिंकायचा एवढीच चर्चा त्यांच्याशी झाल्याचे त्याने सांगितले. तसेच वेगवान गोलंदाज आकाशदीप दुखापतीमुळे पाचव्या कसोटीत खेळू शकणार नसल्याचेही सांगितले.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेतील पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना ३ जानेवारीपासून सिडनी क्रिकेट मैदानावर खेळवला जाणार आहे. भारतीय संघ या मालिकेत १-२ ने पिछाडीवर आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) च्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी भारताला सिडनी कसोटी सामना जिंकावा लागणार आहे. मात्र, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेच्या निकालावरही अवलंबून राहावे लागणार आहे. श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाचा २-० किंवा १-० असा पराभव केल्यास टीम इंडियाचा अंतिम फेरीत पोहोचण्याचा मार्ग मोकळा होईल.