भारताच्या सौर क्रांतीचा अध्याय सुवर्णाक्षरांनी लिहीला जाईल : नरेंद्र मोदी
16-Sep-2024
Total Views |
गांधीनगर (RE-INVEST 2024) : "२१ व्या शतकाचा इतिहास ज्या वेळेस लिहिला जाईल, तेव्हा भारताच्या सौर क्रांतीचा अध्याय सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल."असे गौरवउद्गार पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात केले. गुजरातच्या गांधीनगर येथे चौथ्या जागतिक अक्षय ऊर्जा गुंतवणूकदारांच्या मेळाव्याचे (RE-INVEST) उद्घाटन मोदी यांनी सोमवारी केलं. नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने आयोजित केलेल्या तीन दिवसीय परिषदेत सरकार, उद्योग, आणि आर्थिक क्षेत्रातील जवळपास, १०,००० मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
भारताच्या वाटचालीवर भाष्य करताना मोदी म्हणाले " भारत हा जी २० देशांमधला एकमेव देश आहे, ज्याने पॅरीस मध्ये केलेल्या आपल्या हवामान वचनबद्धतेची पूर्तता ९ वर्ष आधीच केली. भारतातील १४० कोटी लोक देशाला पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये स्थान मिळवून देण्यासाठी वचनबद्धतेने काम करत आहेत. २०४७ पर्यंत, भारताला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत."नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन् चंद्रबाबू नायडू, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, मध्य प्रदेचे मुख्यमंत्री मोहन कुमार यादव, छत्तीसगङचे मुख्यमंत्री विष्णू देव साई आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत या कार्यक्रमाला उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले " भारत ही जगातली सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. त्यासोबत, भारताने स्वच्छ ऊर्जेच्या वापराचा पुरस्कार सुद्घा केला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली गुजरात राज्य ऊर्जा क्षेत्रात आघाडीवर आहे. पंतप्रधानपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर मोदी यांनी स्वच्छ आणि शाश्वत जगाच्या निर्मीतीचा ध्यास घेतला." याच विधानाची पुष्टी करत, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल पुढे म्हणाले "गुजरातमध्ये अक्षय ऊर्जेची स्थापित क्षमता ५०,००० मेगावॅटपेक्षा जास्त आहे आणि राज्याच्या ऊर्जा क्षमतेमध्ये अक्षय ऊर्जेचा वाटा ५४ टक्के आहे असून सौरऊर्जा उभारणीत गुजरात देशामध्ये आघाडीवर आहे." ऑस्ट्रेलिया, डेन्मार्क, नॉर्वे, आणि जर्मनी हे देश या परिषदेचे प्रमुख आंतरराष्ट्रीय भागीदार आहेत.
त्याच बरोबर, आंध्र प्रदेश, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, कनार्टक, तेलंगणा ही राज्यं सुद्धा या परिषेदत सहभागी होणार आहे. (RE-INVEST) या परिषदेचा मुख्य हेतु जागतीक व्यासपीठावर सरकारी अधिकारी, उद्योग नेते, गुंतवणूकदार, संशोधक आणि धोरणकर्ते यांना एकत्र आणण्याचा आहे.