ज्ञानेश महाराव यांच्या वादग्रस्त वक्तव्याशी संभाजी ब्रिगेडचा संबंध नाही!
नाशिक महानगरप्रमुख प्रफुल्ल वाघ यांची भूमिका
16-Sep-2024
Total Views | 139
मुंबई : (Dnyanesh maharao) “लेखक ज्ञानेश महाराव यांनी नुकत्याच केलेल्या हिंदू देवतांबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्याशी संभाजी ब्रिगेडचा काहीही संबंध नाही,” अशी प्रतिक्रिया संभाजी ब्रिगेडचे नाशिक महानगरप्रमुख प्रफुल्ल वाघ यांनी दिली आहे. तसेच “त्या कार्यक्रमाशी संभाजी ब्रिगेडचा कोणताही संबंध नाही,’ असे त्यांनी म्हटले आहे.
ज्ञानेश महाराव यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत प्रफुल्ल वाघ यांनी रविवार, दि. १५ सप्टेंबर रोजी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले.
प्रफुल्ल वाघ म्हणाले की, “संभाजी ब्रिगेड ही चळवळ पुरुषोत्तम खेडेकर, प्रबोधनकार ठाकरे, फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांवर चालते. परंतु, आम्ही कष्टकरी, शेतकरी, वारकरी कुटुंबातील आहोत. आम्ही हिंदू धर्माला मानणारे लोक आहोत. प्रभू श्रीराम, श्रीकृष्ण, महादेव आणि खंडोबा, म्हसोबा आदी लोकदैवते आमच्या हृदयात आहेत. अनेक संत, महापुरुष आमचे प्रेरणापुरुष आहेत. त्यामुळे ज्ञानेश महाराव यांच्या वादग्रस्त विधानाचे संभाजी ब्रिगेड समर्थन करत नाही.”
प्रफुल्ल वाघ पुढे म्हणाले की, “संभाजी ब्रिगेडचे माजी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी २०१४ मध्ये राजकीय महत्त्वाकांक्षेमुळे शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची वाट धरली. त्यानंतर ते काँग्रेसमध्ये जाऊन आता पुन्हा राष्ट्रवादीत परतले. परंतु, त्यांची डाळ कुठेही न शिजल्याने ते आता संभाजी ब्रिगेडचा राजकीय चळवळ म्हणून वापर करत आहेत. यामुळे संभाजी ब्रिगेडसारखी चळवळ नाहक बदनाम होत असून ती शरद पवार यांच्या वळचणीला गेल्याचे चित्र नाहक उभे राहत आहे.”
“प्रवीण गायकवाड रोजगार, उद्योजकतेविषयक काम करतात. त्यांनी घेतलेल्या मेळाव्यात उद्योजकतेबाबत चर्चा होणे अपेक्षित होते. मात्र, या मेळाव्यात उद्योजकतेवर चर्चा घडण्याऐवजी ज्ञानेश महाराव यांचे वादग्रस्त वक्तव्य आले. या मेळाव्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या बॅनरचा वापर करण्यात आल्याने लोकांना वाटले की, हा कार्यक्रम संभाजी ब्रिगेडशी संबंधित होता. गायकवाड यांनी ब्रिगेडचा राजकीय चळवळ म्हणून वापर केल्याने पुरुषोत्तम खेडेकर, संभाजी ब्रिगेड नाहक बदनाम झाली,” असे वाघ म्हणाले. “प्रवीण गायकवाड आमच्या चळवळीचा भाग होते. आम्ही त्यांना मानतो. ज्ञानेश महाराव यांचे लेखनही आम्हाला आवडते. परंतु, ज्या नाटकाचा संदर्भ देत महाराव यांनी वादग्रस्त वक्तव्य केले, ते नाटक समाजानं स्वीकारलेले नाही. अशा नाटकाचा संदर्भ देऊन केलेल्या वक्तव्याचे समर्थन होऊ शकत नाही,” अशी स्पष्ट भूमिका वाघ यांनी मांडली.