मुंबई : गणेशोत्सवानिमित्त अनेकांनी आपल्या घरांमध्ये आणि मंडळांमध्ये वैविध्यपूर्ण देखावे साकारले आहेत. घाटकोपर येथे राहणाऱ्या राहुल वारिया सुद्धा त्यांच्या राहत्या घरात असाच एक देखावा साकारला आहे. ‘मिसिंग ट्राम’ हा त्यांच्या या वर्षीच्या देखाव्याचा विषय आहे. त्यांच्या वडीलांसाठी त्यांनी हा देखावा साकारलेला आहे. १८७४ मध्ये मुंबईत पहिली ट्राम सुरु झाली होती. त्या ट्रामची रचना कशी होते हे राहुल यांनी आपल्या देखाव्यातून दाखवले आहेत. त्याचबरोबर ती ट्राम ज्या मार्गावरुन धावायची तो मार्ग, त्या मार्गावरील रॉक्सी सिनेमा, रीगल सिनेमा अशा इतरही गोष्टी त्यांनी देखाव्यात साकारल्या आहेत. त्यांचा घरातील बाप्पासुद्धा या ट्राममध्येच विराजमान झाला आहे. राहुल वारीया यांच्या घरातील हा जुन्या आठवणींना उजाळा देणारा देखावा पाहण्यासाठी लोक गर्दी करत आहेत.
“आम्ही मुंबईत राहतो, खूप प्रवास करतो. पण इथल्या आमच्या हेरिटेज ट्रामचा आम्हाला आता विसर पडलेला आहे. पुढच्या पिढीला हे ऐकून आश्चर्य वाटेल की मुंबईत सुरुवातीला घोडागाडी चालवली जात होती. त्यानंतर या ट्राम आल्या. त्यामुळे या ट्रामची लोकांना पुन्हा एकदा आठवण करून देण्यासाठी मी माझ्या देखाव्याचे नाव ‘मिसिंग ट्राम’ ठेवले आहे.” अशी माहिती राहुला वारीया यांनी दिली.