भारतात अनेक विद्यापीठांत आणि कला, क्रीडा क्षेत्रात ‘वोकीझम’ची वृत्ती फोफावली आहे. त्यांचे ‘आझादी’चे नारे म्हणजे हीच विकृत जीवनपद्धत जगण्यासाठी अधिकृत परवान्याची मागणी आहे. व्यक्तिगत स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचाराची मागणी करून त्या बदल्यात देशाचे स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व विकण्यास हे मागे पुढे पाहणार नाहीत. या वृत्तीला सर्व प्रकारच्या व्यवस्थेतून राजकीय, शैक्षणिक, प्रशासकीय व्यवस्थेतून हद्दपार करण्यासाठी कटिबद्ध होणे, ही आजच्या स्वातंत्र्य दिनाची मागणी आहे.
आज दि. 15 ऑगस्ट. आज आपला भारत देश 77वा स्वातंत्र्य दिन साजरा करत असून, सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. गेल्या काही वर्षांत सर्वसामान्य भारतीयांनाही तिरंगा फडकवण्याची परवानगी आणि त्याबाबतची आचारसंहिता थोडी सैल केल्यावर तर हा उत्साहाचा वारू सर्वत्र चौफेर दौडताना दिसतोे आणि ही बाब निश्चितच स्वागतार्ह आहे. पण, क्षणभर या टप्प्यावर आपण या स्वातंत्र्याचा अर्थ समजून घेण्याची आवश्यकताही निर्माण झाली आहे. अशी परिस्थिती दुर्दैवाने निर्माण झाली आहे, असे म्हणायला हरकत नाही. ही परिस्थिती भारतीय समाज, राष्ट्र जीवनात तर आहेच, पण त्याचबरोबर या मूल्यांचे तथाकथित स्वयंघोषित ठेकेदार समजणार्या पाश्चिमात्त्य देशांत तर अधिक तीव्र झाली आहे, असे म्हणावे लागेल.
आज इंग्लंडसहित सर्व युरोपीय देशांत स्वातंत्र्याला स्वैराचाराचे स्वरूप येऊ घातले आहे. ‘स्वातंत्र्य’ या मूल्याची प्रेरणा फ्रेंच राज्यक्रांतीमधून निर्माण झाली, असे टेंभा मिरवणारे फ्रान्स आज ज्वालामुखीच्या तोंडावर आहे. इटली, जर्मनी यांनाही वेगवेगळी सामाजिक आव्हाने पेलण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागत आहे. मनुष्याला त्याच्या विकसित क्रमात समूहाने राहण्याची आवश्यकता निर्माण झाली. त्यातून समाज निर्माण झाला. त्याचे नीतीनियम तयार झाले. हे नीतीनियमांचे नियमन करण्यासाठी व्यवस्था तयार झाल्या. त्यासाठी राज्यव्यवस्था आणि राज्ये झाली. परंपरा, संस्कृती आणि राज्यव्यवस्था यांचे मिळून राष्ट्र बनले. रूढ भाषेत देश बनले. या सगळ्या नीतीनियमांना अनुसरून जीवन पद्धत विकसित झाली. त्यात व्यक्तीला त्याचे असित्व टिकवण्यासाठी स्वातंत्र्य होतेच. परंतु, त्याचबरोबर सहजीवन आणि सहअस्तित्वासाठी कर्तव्याचा बोध पण होता.
विशेषतः भारतीय संस्कृतीत ‘अर्थ’ आणि ‘काम’ या दोन मानवी सुलभ वृत्तीला ‘धर्म’ आणि ‘मोक्ष’ या दोन गोष्टींच्या मर्यादा घातल्या होत्या. (म्हणून स्वातंत्र्यवीर वर्णन करतात ‘मोक्षमुक्तीही तुझीच रूपे’) जे काही तत्त्वज्ञान आणि मूल्ये विकसित झाली, त्यामागे हे तत्व होते. परिणामस्वरूप येथील समाजजीवनात स्वातंत्र्याची मूल्ये जी विकसित झाली, त्याला या तत्त्वज्ञानाची जोड होती. भारतीय विचारात व्यक्तिगत स्वातंत्र्याला सामाजिक नियमांचे बंधन होते. एकाचे स्वातंत्र्य कधीच दुसर्याच्या हिताला बाधक नव्हते. हे जसे व्यक्तींना लागू होते, तसे समूहांना पण लागू होते. त्यामुळेच आमच्या तत्त्वज्ञानाने कधी कुणाचे स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा ‘राष्ट्र’ म्हणून विचार केला नाही. आम्ही मानवी कल्याणाचा हेतू ठेवून जगभर भ्रमण केले, पण कुणाचे अधिकार, राजसत्ता हिरावून घेतल्या नाही. कुणाच्या श्रद्धा स्थान तोडले नाही आणि कुठले धर्मग्रंथ जाळले नाहीत.
पण, मानवी इतिहासात एक काळ असा आला की, एकच धर्मग्रंथ, एकच देव याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी काही टोळ्या अरब देशातून निघाल्या. एका हातात तलवार आणि दुसर्या हातात धर्मग्रंथ घेऊन निघालेल्या या टोळ्यांनी जगभरात असणार्या संस्कृती उद्ध्वस्त केल्या आणि तेथे आपली धार्मिक आणि राजकीय सत्ता प्रस्थापित केली. भारतातही मोहम्मद बीन कासिमपासून खैबरखिंडीतून टोळ्या येत राहिल्या आणि त्यांनी भारताच्या बर्यापैकी भूभागावर सत्ता स्थापित करताना धार्मिक, राजकीय स्वातंत्र्याची गळचेपी केली.
तलवार घेऊन निघणारी मंडळी होती, तशी व्यापाराची साधने आणि धर्मग्रंथ घेऊन निघालेली चर्चप्रणीत मिशनरी मंडळी पण होती. या बाबतीत केनियाच्या राष्ट्रप्रमुख ज्योमो केन्याटा यांचे उद्गार प्रसिद्ध आहेत. “जेव्हा ख्रिश्चन मिशनरी मंडळी आमच्या भूमीवर आली, तेव्हा त्यांच्या हातात बायबल होते. आमच्या हातात जमीन होती. त्यांनी आम्हाला प्रार्थना करण्यासाठी डोळे मिटायला सांगितले. आम्ही डोळे मिटले. डोळे उघडले तेव्हा आमच्या हातात बायबल होते आणि त्यांच्या हातात आमची जमीन होती.” धर्माच्या आधारावर लोकांनी कसे दुसर्यांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले, याचे हे बोलके उदाहरण आहे.
धार्मिक स्वातंत्र्य, राजकीय स्वातंत्र्य गमवण्याचे परिणाम दृश्य होते. पण, पुढे इंग्रजांनी त्यांच्या राज्यकाळात आमच्या मनाचाच ताबा घेतला आणि आम्ही पूर्णपणे पारतंत्र्यात गेलो. इतके पारतंत्र्यात गेलो की स्वातंत्र्यासाठी चळवळ उभी करताना, आम्ही फक्त इंग्रजी पारतंत्र्याच्या काळाचाच विचार करत राहिलो. त्यातही इंग्रजांच्या विरुद्ध झालेल्या सशस्त्र चळवळींना ‘बंड’, ‘कट’ असे संबोधून त्याचे मूल्य कमी करत राहिलो.
मानसिक स्वातंत्र्य गमावल्याचा थेट परिणाम म्हणजे, आत्मविस्मृतीचा होता. या आत्मविस्मृतीने आमची ’स्व’ची भावनाच आम्ही गमावली. ‘स्वातंत्र्य’ म्हणजे ’स्व तंत्र.’ पण, इंग्रजांनी दीर्घकाळ केलेल्या संमोहन प्रक्रियेचा परिणाम म्हणजे स्वातंत्र्य म्हणजे बर्याच अंशी मात्र सत्तांतर ठरले. याचा परिणाम 1947 सालानंतरच्या सर्व ध्येयधोरणांवर झाला. स्वभाषा आम्ही विसरलो आणि इंग्रजी भाषेचे अंधानुकरण करू लागलो. शेती हा पारंपरिक उद्योग-व्यवसाय असताना त्याकडे पूर्णपणे आम्ही पाठ फिरवली. वैद्यकीय क्षेत्रातील आयुर्वेद आम्ही बाजूला टाकले. योग आणि सूर्यनमस्कार विसरून भारतीय क्रीडा प्रकार दुर्लक्षित केले.
हा जसा देशपातळीवर स्वातंत्र्य आणि स्वतंत्रता यांचा वैचारिक गोंधळ होता, त्याच वेळेस जागतिक पातळीवर घडणार्या घडामोडी यादेखील नव्या स्वरूपात वसाहतवादी दृष्टिकोन विकसित करत होत्या. दोन्ही महायुद्धे आणि जपानचा विध्वंस हा र्र्’ीीीींर्ळींरश्र ेष ींहश षळीींंशीीं’ किंवा ‘बळी तो कान पिळी’ या तत्त्वज्ञानाने झाला होता. जर्मनी आणि इंग्लंड या दोन देशांच्यानंतर आता अमेरिका आणि रशिया या दोन महासत्ता उदयास आल्या आणि मग सगळ्या विकसनशील राष्ट्रांची या दोन गटांत विभागणी झाली. भारतही स्वाभाविक रशिया गटात सामील झाला.
आता दुसर्या देशांवर राज्य करण्याची पद्धत बदलली आणि मग एका बाजूने सत्ताधारीच आपल्या बाजूने वळवायचे आणि दुसर्या बाजूला समाजाला मानसिकदृष्ट्या संभ्रमित करायचे, हे या पद्धतीचे मूलभूत पैलू होते. यातून बघता बघता अनेक देश आपले स्वातंत्र्य गमावून बसले. सत्तेवर जरी आपली माणसे आहेत, असे आम जनतेला वाटत होते तरी त्या सत्ताधार्यांवर निर्णय घेताना प्रभाव या दोन्हींपैकी शक्तींचा असायचा. अमेरिकेच्या बाजूने स्वाभाविकपणे वैश्विक व्यापारी तत्त्व उभे होते, तर रशियाच्या बाजूने उभे होते कम्युनिस्ट तत्त्वज्ञान!
या संघर्षातून इराण-इराक संघर्ष उभा राहिला. इस्रायल आणि पॅलेस्टाईन संघर्ष पेटला. अफगाणिस्तानमध्ये तालिबान वृत्ती उदयाला आल्या. लादेनसारखा अतिरेकी म्होरक्या पुढे आला. या दोन्ही शक्तींनी ‘इस्लामिक स्टेट’ संकल्पनेला वेळोवेळी खतपाणी घातले. तेलाचा व्यापार कळीचा मुद्दा बनला आणि त्यावरच्या नियंत्रणासाठी जगभर हिंसाचार थैमान घालू लागला. रशियाच्या विघटनानंतर कम्युनिस्ट जगाचे नेतृत्व चीनकडे आले, पण त्यांनाही वैश्विकरणाच्या रेट्यापुढे आपले तत्त्वज्ञान गुंडाळून ठेवत माओ तत्त्वज्ञान एका नव्या साम्राज्यवादी सत्तेच्या रुपात विविध देशांचे स्वातंत्र्य गिळायला उभे राहिलेले जगाने बघितले.
एका अर्थाने ‘स्वातंत्र्य’ या उदात्त आणि उन्नत संकल्पनेचे ‘राष्ट्र’ म्हणून सर्वत्र जगात धिंडवडे उडत असताना, काही तत्त्वज्ञान व्यक्तिगत स्वातंत्र्याला स्वैराचारी वृत्तीकडे नेण्यासाठी खुबीने विविध देशांत आपला अजेंडा राबवण्याचा प्रयत्न करत होते. माणसाची ‘भौतिक प्राणी’ म्हणून व्याख्या करून त्याला अमर्याद उपभोग घेण्यास उद्युक्त करण्याचा उद्देश ठेवून वैश्विक बाजारशक्ती सक्रिय झाल्या आहेत. डिजिटल मार्केट हे आजचे सर्वात ‘व्हायब्रंट मार्केट’ वापरून या शक्ती आपल्या व्यापारासाठी ‘स्वातंत्र्य’ या मूल्याचा वापर करून मनुष्याला स्वैराचारात ढकलून देत आहेत.
विशेष म्हणजे, या भांडवलदारी वृत्तीला पूरक ठरते आहे. सांस्कृतिक मार्क्सवादी विचारातून जन्माला आलेल्या तितक्याच घातकी कल्पना. ज्याच्या अलीकडील काळात वाचकांनी खूप नाव ऐकले आहे ते म्हणजे ‘वोकिझम!’ त्यापूर्वी पण ‘फेमिनिझम’ विचाराने पाश्चात्त्य देशांत धुमाकूळ घातला होताच. त्यावेळी स्त्रीवाद सुरू झाला तो ‘बायबलमधील स्त्री हे पापाचे प्रतीक आहे’ या कल्पनेने निर्माण झालेल्या पुरुषी अहंकारी वृत्तीविरुद्ध! पण, त्याने सगळीकडे वेगवेगळ्या पद्धतीचे स्वरूप घेतले.
भारत देशात सुद्धा जेथे स्त्रीला अत्यंत सन्मानाचे स्थान होते, तेथे फुटकळ उदाहरणे देऊन भ्रमित केले गेले आणि स्त्री स्वातंत्र्याच्या अतिरेकाने भारतीय समाजजीवनातील कुटुंबव्यवस्थाच संपवण्याचा घाट घालण्यात आला. व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अर्थ समजावून न घेतल्याने आता जगभर त्याचे परिणाम दिसायला लागले आहेत. या तथाकथित स्त्री स्वातंत्र्याला उचलून धरले वैश्विक बाजार यंत्रणेने! कारण, त्यांना स्वतःची उत्पादने लोकसंख्येच्या 50 टक्के लोकांनी न वापरणे,हे परवडणारे नव्हते. त्यामुळे उदाहरणच द्यायचे झाले तर स्त्रीने सिगारेट पिणे अशा जाहिराती करून उदात्तीकरण करणे, हे स्त्री स्वातंत्र्याच्या आड लपलेले वैश्विक व्यापारी वृत्तीचे नीच कृत्य होते.
येथेच पुढे ‘वोकीझम’ या हिणकस वृत्तीने जन्म घेतला. क्रांतीच्या शोधात असणारे जगभरातील डावे आणि आपला माल विकू पाहणारे भांडवलदार यांच्या वैचारिक व्यभिचारातून ‘वोकीझम’ नावाचे अपत्य जन्माला आले आहे आणि ते स्वातंत्र्याच्या नावाखाली जगातील संपूर्ण समाजव्यवस्था उद्ध्वस्त करू लागले. LGBTQ... अशा संकल्पना हे याच ‘वोकीझम’च्या विकृतीला मानवी चेहरा देण्याचा प्रयत्न आहे. यातून ‘ट्रान्स जेंडर’ हा उद्योग पाश्चात्य देशात भरभराटीला आला आहे. त्याअंतर्गतच ‘जेंडरमुक्त जीवन’ ही चळवळ उभी राहिली आहे. त्याला जाणीवपूर्वक व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली खतपाणी घातले जात आहे. स्त्री-पुरुष समानता या तत्त्वाला आता एक हिडीस स्वरूप येऊ घातले आहे.
हे येथेच थांबत नाही. स्वातंत्र्याची ही कल्पना फक्त स्त्री-पुरुष येथे थांबलेली नाही. आम्ही माणूस असेलच पाहिजे असे काही नाही. आम्ही कुत्रे, मांजरी पण होऊ शकतो, इथपर्यंत यांची मजल गेली आहे. एकदा कुणी असे म्हटले आणि समाजाला ते स्वीकारणे बंधनकारक झाले की, मग मलमूत्र विसर्जन ते कुठलेही व्यवहार कुठेही करायला मोकळे रान मिळणार आहे आणि हे खूप भयावह आहे. लैंगिक गरजा भागवण्यासाठी वयाची अट नसली पाहिजे, अशा मागण्या कोर्टात निकालाची वाट पाहत काही देशांत पडून आहेत.
अशा या वैश्विक बाजारी गट, सांस्कृतिक नावाने विकृती पसरविणारे कम्युनिस्ट,रॅडिकल इस्लामिस्ट आणि इव्होंजेलिकल चर्च गट, हे आपापल्या उद्दिष्टासाठी वेगवेगळ्या देशांना हाताशी धरून उर्वरित देशांच्या स्वातंत्र्यावर घाला घालण्याचा प्रयत्न करत आहेत आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याला स्वैराचारात रूपांतरित करू पाहत आहेत. अशावेळी एक देश म्हणून, एक संस्कृती म्हणून, एक विश्वकल्याणाचा विचार म्हणून आम्हाला या 77व्या स्वातंत्र्यदिनी खूप काही संकल्प करण्याची गरज आहे. वर उल्लेख केलेल्या शक्ती एकत्र आल्यावर राष्ट्राचे स्वातंत्र्य कसे पणाला लागू शकते, याचे उदाहरण बांगलादेशात आपण नुकतेच अनुभवले आहे. पंतप्रधान कार्यालयाला, घराला लक्ष्य बनवताना केलेला विकृत उन्माद ही स्वैराचाराची अभिव्यक्ती आहे आणि ही अभिव्यक्ती विकृत स्वातंत्र्यासाठी महिला पंतप्रधानाचे अंतर्वस्त्र झेंड्यासारखे फडकवत होते.
भारतात अनेक विद्यापीठांत आणि कला, क्रीडा क्षेत्रात ही वृत्ती फोफावली जात आहे, त्यांचे ‘आझादी’चे नारे म्हणजे हीच विकृत जीवनपद्धत जगण्यासाठी अधिकृत परवान्याची मागणी आहे. व्यक्तिगत स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचाराची मागणी करून त्या बदल्यात देशाचे स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व विकण्यास हे मागे पुढे पाहणार नाहीत. या वृत्तीला सर्व प्रकारच्या व्यवस्थेतून राजकीय, शैक्षणिक, प्रशासकीय व्यवस्थेतून हद्दपार करण्यासाठी कटिबद्ध होणे, ही या स्वातंत्र्य दिनाची मागणी आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वतंत्र देवता मानून स्तोत्र लिहिले. त्यात वर्णन केल्याप्रमाणे उत्तम, उदात्त, उन्नत अशा या देवतेला ‘सूर्याची राणी’ म्हटले आहे. त्या तेजस्वी स्वतंत्रदेवतेला जगभरात लागलेले ग्रहण दूर करण्याची जबाबदारी नियतीने भारत देशावर आणि भारतीय समाजावर टाकली आहे. ती जबाबदारी पार पाडायची असेल, तर असे करू शकणार्या राजकीय व्यवस्थेला अधिक शक्तिशाली बनवावे लागेल. विकृत विचाराला प्राकृत विचारच पराभूत करू शकतो आणि हा प्राकृत विचार हा येथील हिंदू परंपरेत आहे. त्यासाठी हिंदू संघटित होणे, ही काळाची गरज आहे. हेच या 15 ऑगस्टचे आव्हान आणि आवाहन असणार आहे.
रवींद्र मुळे
9422221570