उत्तर भारतात १५ दिवस आधीच श्रावण महिना का सुरू होतो? वाचा नेमकं कारण
31-Jul-2024
Total Views | 242
ठाणे : येत्या सोमवार पासुन श्रावणाचा प्रारंभ होत आहे. सोमवार ५ ऑगस्टपासून मंगळवार ३ सप्टेंबरपर्यंत श्रावण महिना आहे. या वर्षी श्रावण महिन्यात पाच सोमवार आणि पाच मंगळवार आले आहेत. यापूर्वी सन २०२१ मध्ये श्रावणात पाच सोमवार आले होते. त्यामुळे हा हा दुर्मिळ योग नसुन असा योग ७१ वर्षानी आला आहे, असे म्हणणे चुकीचे आहे.यानंतर सन २०३८ मध्ये श्रावण महिन्यात पाच सोमवार येणार आहेत.
अशी माहिती पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण यानी दिली. श्रावण महिन्यात रविवारी आदित्य पूजन, सोमवारी महादेव पूजन, मंगळवारी मंगळागौरी पूजन, बुधवारी बुध पूजन, गूरुवारी बृहस्पती पूजन, शुक्रवारी जिवंतिका पूजन आणि शनिवारी अश्वत्थ मारूती पूजन करण्यास सांगितले आहे. यावर्षी श्रावण महिन्याची सुरूवात सोमवारने होत आहे .
आणि शेवट मंगळवारने होत आहे. पहिल्या श्रावण सोमवारी ५ ऑगस्टला शंकराला तांदूळ, दुस-या सोमवारी १२ ऑगस्टला तीळ, तिस-या सोमवारी १९ ऑगस्टला मूग, चौथ्या सोमवारी २६ ऑगस्टला जवस आणि पाचव्या सोमवारी २ सप्टेंबरला सातू अर्पण करावेत, असे सांगण्यात आले आहे.गेल्या वर्षी सन २०२३ मध्ये श्रावण अधिकमास आला होता. यानंतर सन २०४२ मध्ये पुन्हा श्रावण महिना अधिक येणार आहे. सन २०२६ मध्ये ज्येष्ठ अधिकमास येणार आहे.
उत्तर भारतात १५ दिवस आधी श्रावण
उत्तर भारतात पूर्णिमान्त चांद्रमासगणना आहे. दक्षिण भारतात अमान्त चांद्रमास गणना आहे. महाराष्ट्रात आषाढ कृष्ण पक्ष म्हणतो त्याला उत्तर भारतात श्रावण कृष्ण पक्ष म्हणतात. महाराष्ट्रात ज्याला श्रावण कृष्णपक्ष म्हणतात त्याला उत्तर भारतात भाद्रपद कृष्णपक्ष म्हणतात. त्यामुळे उत्तर भारतात श्रावण महिना पंधरा दिवस अगोदर सुरू होतो आणि पंधरा दिवस अगोदर संपतो. गंमत म्हणजे अधिकमास ठरविण्यासाठी नियम पाळताना उत्तर भारतातील पंचांगे अमांत पद्धतच वापरतात. भारतातील पंचांगकर्त्यानी याबाबत एकमत करावे यासाठी आपण प्रयत्नशील आहोत.