‘कॅम्लिन’चे संचालक-अध्यक्ष सुभाष दांडेकर यांचे सोमवार दि. 15 जुलै रोजी वयाच्या 81व्या वर्षी निधन झाले. त्यानिमित्ताने आपल्या नावीन्यपूर्ण उत्पादनांनी जनमानसात आणि उद्योगविश्वात आपले अढळ स्थान निर्माण करणार्या सुभाष दांडेकर यांच्या कार्यकर्तृत्वाचा परिचय करुन देणारा हा लेख...
महाराष्ट्रातील आणि भारतातील एक अग्रगण्य उत्पादक (स्टेशनरी आणि आर्ट मटेरियल) कंपनी ‘मे. कॅम्लिन लिमिटेड’चे संचालक, अध्यक्ष अशी ओळख असलेले उद्योजक सुभाष दांडेकर यांचे दि. 15 जुलै 2024 रोजी निधन झाले.
सुभाष दांडेकर आणि रजनीताई दांडेकर हे सर्वत्र ‘दादा’ आणि ‘वहिनी’ या नावानेच सुपरिचित होते. त्यांच्या कारखान्यात व सर्व सामाजिक संस्थांमध्ये त्यांना ‘दादा’ या नावानेच संबोधिले जायचे.
दि. 3 ऑगस्ट 1938 रोजी जन्मलेले दादा हे मूळ शिवाजी पार्क, दादर येथील रहिवासी. छबिलदास शाळा येथे शालेय शिक्षण झालेले आणि रसायनशास्त्रातील ‘बीएससी’चे शिक्षण रूपारेल कॉलेजमधून झाले. पुढे ’MRCS-Tech’चे शिक्षण ग्लासगो (इंग्लंड) येथे झाले आणि त्यानंतरचे संशोधनात्मक कामही तेथेच त्यांनी केले. तसेच रंगशास्त्रामध्ये दादांनी प्रावीण्यही मिळविले.
देशात परतल्यानंतर काका नानासाहेब आणि वडील काकासाहेब यांनी सुरू केलेल्या ‘मे. कॅम्लिन लि.’ या कंपनीत दादा रुजू झाले. त्यावेळी ‘कॅम्लिन’ वेगवेगळ्या प्रकारची शाई, गोंद, स्टॅम्प पॅड इत्यादी स्टेशनरीची उत्पादनांची निर्मिती आणि विक्री करीत असे. त्याचबरोबर इतर काही स्टेशनरी अन्य उत्पादकांकडून उत्पादित करुन तिची विक्री करण्याचा व्यवसायही ‘कॅम्लिन’ करीत असे. त्यांचे विक्रीचे जाळे जिल्ह्याजिल्ह्यात आणि देशभरात वाढविण्यास सुभाषदादांनी सुरुवात केली.
विविध उत्पादनांमध्ये विस्तार
सुभाषदादांनी 1964 पासून ‘कॅम्लिन’ची चित्रकारांना लागणारी उत्पादने जसे की रंग, ब्रश विद्यार्थ्यांसाठीचे चित्रकलेचे रंग, क्रेयॉन पेन्सिली त्याचबरोबर सर्व संलग्न उत्पादने बनवायला सुरुवात केली आणि ‘कॅम्लिन’चा ‘आर्ट मटेरिअल’ विभाग हा ‘स्टेशनरी विभागा’सोबत जोडला गेला. चित्रकारांच्या रंग उत्पादनाबरोबरच त्यांनी कपड्यावरील चित्रकाम करण्यासाठी ’Crylene’ नावाने ’फॅब्रिक कलर्स’चे उत्पादनही सुरु केले.
या उत्पादनांच्या विक्रीसाठी नवनवीन उपक्रमही ‘कॅम्लिन’ने राबविले. शाळाशाळांमध्ये चित्रकला स्पर्धा (विद्यार्थ्यांसाठी) सुरु करुन आणि वेगवेगळ्या महिलांच्या संस्थांच्या माध्यमातून ‘साडी पेंटिंग’चे वर्ग घेऊन ’Crylene’ रंगांचा आणि विद्यार्थीवर्गात ‘पेस्टल’ आणि ‘ट्यूब’ रंगांचा खप कसा वाढेल, याची तजवीज केली. अनेक नावीन्यपूर्ण कल्पनांनी ‘कॅम्लिन’चा ‘आर्ट मटेरियल’ विभाग बहरत गेला. त्यांनी दादर येथे नंतर आर्ट गॅलरीही सुरू केली.
सन 1971 साली मलेशियामध्ये एक संयुक्त कंपनी स्थापून पूर्वेकडील देशांमध्ये ‘कॅम्लिन’च्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून दिली आणि भक्कम पाय रोवले.
याशिवाय, सहयोगी कंपन्या स्थापून तारापूर, उंबरगाव, पिरंगुट, जम्मू अशा ठिकाणी कारखाने काढून आपल्या उत्पादनांमध्ये विविधता आणून पेन्सिल, मेकॅनिकल पेन्सिल, कंपासपेटी व अन्य भूमितीय आणि इंजिनिअरिंगसाठी लागणारे साहित्य आणि पेन्सिल आणि अन्य उत्पादनांचे पॅकेजिंगचे कारखाने सुरू केले.
1982 मध्ये ‘कॅम्लिन’ची उपकंपनी 'Liva Pharma' स्थापन करून औषधे आणि त्यासाठी लागणार्या कच्च्या मालाचे उत्पादन त्यांनी सुरू केले. आजच्या ‘कॅम्लिन फाईन सायन्सेस’ या उत्पादक कंपनीची ही सुरुवात होती. तसेच अमेरिकेमध्येही एक उपकंपनी सुरू करून पूर्व आणि पश्चिम जगात व्यापार-विस्तार केला.
उद्योजकांच्या संघटनांमधील सहभाग
एका बाजूने उद्योग विस्तार होत असताना उद्योजकांच्या संघटनांमधील सुभाषदादांचा सहभागही वाढत गेला. त्याचे सर्वात मोठे योगदान ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्री’ या महाराष्ट्रातील शिखर संघटनेमध्ये आहे. 1983 पासून सात वर्षे ते चेंबरचे उपाध्यक्ष आणि 1990 ते 1992 पर्यंत अध्यक्ष या नात्याने ते चेंबरच्या सर्व कामांमध्ये झोकून देऊन काम करीत राहिले. त्यांच्या नेतृत्वाखाली चेंबरची अनेक आंदोलने झाली. उदा. जकातविरोधी आंदोलन. वॅट संबंधित आणि कृषी उत्पादन बाजार समिती कायदा, माथाडी कायदा इत्यादीसाठी त्यांनी सरकारदरबारी खूप वाटाघाटी करण्यात वेळ दिला. चेंबरमध्ये 1984 साली व्यापार्यांचे शिष्टमंडळ घेऊन दिल्ली येथील ’India International Trade Fare’ मध्ये जाण्याची कल्पना त्यांचीच. 1991 साली ’FICCI’च्या वार्षिक संमेलनाला विमानाने न जाता, ते सर्वसामान्य सभासदांबरोबर राजधानी एक्सप्रेसने आले आणि सर्व सभासदांना एक विश्वास दिला. त्याचबरोबर ते ‘महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळ’, ‘जागतिक मराठी चेंबर ऑफ कॉमर्स’, ‘दादर मराठी व्यापारी मंडळ’ (आजची ‘मराठी चेंबर ऑफ कॉमर्स’) ’FICCI’, ’ASSOCHAM’ आणि ’CII’ या संस्थांमध्ये विविध पदांवरील काम व जबाबदार्या त्यांनी समर्थपणे सांभाळल्या. याचबरोबर ’Indian Merchants Chamber’ आणि ’Bombay Chamber of Commerce’ मध्येही त्यांनी विविध पदांवर कार्य केले. अन्य संघटनांमध्ये ’Indian Drug & Pharma Association’ मध्ये त्यांनी खूप काम केले.
गुणग्राहकता हा त्यांचा एक स्वभाव विशेष होता. अनेक संघटनांमध्ये कार्यरत असताना पुढील काळातील जबाबदार्या पेलण्यासाठी नवीन नेतृत्व तयार करणे व त्यांना कामाला वाव देणे, तसेच प्रोत्साहन देणे यात सुभाषदादांचा पुढाकार असायचा.
महाराष्ट्र चेंबरमध्ये नाशिकचे बाबुराव कुलकर्णी, कोल्हापूरचे शिवाजीराव देसाई, मुंबईचे डॉ. पालकर आणि अरविंद कुलकर्णी हे उद्योजक घराण्यातील नसूनही, त्यांच्यावर विश्वास टाकून चेंबरच्या विविध जबाबदार्या सुभाषदादांनी त्यांच्यावर टाकल्या. तसेच ‘महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळा’त छत्रपती संभाजीनगरच्या ‘नाथ ग्रुप’चे कागलीवाल, मुंबईच्या मीनल मोहाडीकर यांच्यासारख्या उद्योजकांना विविध जबाबदार्या घेण्यास प्रोत्साहन दिले. ‘सिकॉम’मधून अनेक मोठ्या उद्योजकांना अर्थसाहाय्य देऊन महाराष्ट्रात उद्योग उभे करण्यास मदत केली.
‘महाराष्ट्र चेंबर’चे अध्यक्ष म्हणून ‘सिंधुदुर्ग व्यापारी महासंघ’ आणि ‘धुळे व्यापारी संघ’ यांसारख्या अनेक गावांतील संस्थांना मार्गदर्शन सुभाषदादांनी केले. तसेच अनेक लघु आणि लघुत्तम उद्योजकांना ‘कॅम्लिन’चे सहयोगी बनवून चांगल्या गुणवत्तेची उत्पादने करण्यास प्रोत्साहन दिले. उद्योजकांनी निर्यातदार व्हावे, यासाठी ‘महाराष्ट्र चेंबर’मध्ये आयात-निर्यातीचे प्रशिक्षण कोर्स त्यांच्या काळात सुरु होते.
सामाजिक जबाबदारी
कुशाग्र बुद्धीने घेतलेले शिक्षण, व्यवसायात मिळविलेले यश आणि अनुभव यांचा उपयोग अन्य क्षेत्रातील संस्थांना मिळावा, यासाठी त्यांनी विविध संस्थांच्या अध्यक्षपदाच्या आणि विश्वस्तपदाच्या जबाबदार्या स्वीकारल्या. ‘महालक्ष्मी मंदिर ट्रस्ट’ आणि ‘फडके गणपती ट्रस्ट’ यांचे विश्वस्त म्हणून; शुश्रूषा हॉस्पिटल आणि ‘तारापूर मेडिकल रिसर्च ट्रस्ट’ यांचे अध्यक्ष म्हणून तसेच ‘मॉडर्न एज्युकेशन सोसायटी’ आणि ‘गावडे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट’ यांचे विश्वस्त आणि सल्लगाार म्हणून ‘ब्राह्मण साहाय्यक संघ, मुंबई’ आणि ‘वनिता समाज, दादर’ यांचे सल्लागार म्हणून तसेच ‘ब्राह्मण सेवा मंडळ, दादर’चे 18 वर्षे अध्यक्ष आणि विश्वस्त अशा जबाबदार्या सांभाळून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ‘ब्राह्मण सेवा मंडळा’च्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवून त्या संस्थेतून निवृत्त झाले. परंतु, ज्या संस्थेला मार्गदर्शनाची आवश्यकता आहे, त्यांच्या मदतीस सुभाषदादा सदैव तत्पर होते.
सन्मान आणि पुरस्कार
विविध संस्थांनी सुभाषदादांना अनेकविध पुरस्कारांनी गौरविले होते. त्यातील प्रमुख पुरस्कार -
1) ’Economic Times’चा ‘गेम चेंजरचा पुरस्कार’
2) ‘दिल्ली स्कूल ऑफ आर्ट्स’चा जीवन गौरव पुरस्कार
3) ’World Research Council’ संस्थेचा महत्त्वाचा ’Pride of India’ पुरस्कार
4) ‘स्वत:चा ठसा उमटविणारा उद्योजक पुरस्कार’ अशा अनेक पुरस्कारांनी विविध मान्यवरांच्या हस्ते सुभाषदादांना गौरविण्यात आले होते. परंतु, त्यामुळे त्यांनी सर्वांशी आपले व्यवहार खूप मित्रत्वाचेच ठेवले.
गेल्या दोन-तीन वर्षांपासून सुभाषदादांनी ‘कोकोयु कॅम्लिन’ कंपनीची जबाबदारी धाकटे बंधू दिलीप दांडेकर आणि पुतण्या श्रीराम दांडेकर तसेच ‘कॅम्लिन फाईन सायन्स’ची जबाबदारी मुलगा आशिष दांडेकर यांच्याकडे सोपवून व्यवसायनिवृत्ती घेतली होती.
परंतु, ‘गोष्टी सांगे युक्तीच्या चार’ या भूमिकेत ते सदैव राहिले. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो.
अनिल गचके
9821731281