नाशिक : आषाढी एकादशीच्या उपवासासाठी दरवर्षीप्रमाणे यंदादेखील साबुदाणा, भगर, खजूर, राजगिरा या उपवासाच्या पदार्थांना मागणी वाढली आहे. महाशिवरात्रीपर्यंत स्थिर असलेले भाव काही प्रमाणात वाढले आहेत. महाशिवरात्रीला 60 ते 65 रुपये किलो असलेला साबुदाणा आता 80 रुपये किलो झाला आहे. त्यामुळे यंदा वारकर्यांचा उपवास महाग होणार आहे. आषाढी एकादशीला उपवासाच्या पदार्थांना मोठी मागणी असते. तामिळनाडू येथील सेलम जिल्ह्यातून संपूर्ण देशात साबुदाणा पाठवला जातो. सणांच्या दिवसांत महाराष्ट्रातून साबुदाण्याला मोठ्या प्रमाणात मागणी वाढत असल्याचे किराणा दुकानदारांकडून सांगण्यात येते. तर भगर आणि राजगिरा स्थानिक ठिकाणी पिकवला जातो. परंतु, शेतकरीवर्गाचा नगदी पिकांचे उत्पादन घेण्याकडे कल वाढल्याने भगर आणि राजगिर्याच्या पिकांचे क्षेत्र घटत चालले असून त्यांच्या किमतीचा आलेख दरवर्षी चढताना दिसतो.
फळांच्या वाढल्या किमती
वाढलेले ऊन आणि पडलेला दुष्काळ या संकटांमुळे शेतीमाल करपून गेले असून त्यांच्या किमती वाढल्या आहेत. उपवासाच्या दिवसात हमखास वापरली जाणारी रताळी 100 रुपये किलो झाली आहेत. तर बटाटेदेखील 50 रुपये किलो झाले असून केळी 50 ते 60 रुपये डझन झाली आहेत. पुढील काही दिवसांत नवीन शेतीमाल बाजारात दाखल होईपर्यंत शेतमालाचे भाव वाढत जाणार आहेत.
तयार पदार्थांना मोठी मागणी
उपवासाच्या तयार पदार्थांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. यामध्ये साबुदाणा खिचडी, थालीपीठ, साबुदाणा वडा, राजगिर्याचा शिरा, उपवासाची कचोरी, भगरीचे थालीपीठ आदी पदार्थ चवीने खाल्ले जातात. परंतु, यांच्या किमतीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. खिचडी 50 रुपये, साबुदाणा वडा 20 रुपये, कचोरी 20 रुपये अशा किमती असून हे पदार्थ दुप्पटीने महाग झाले आहेत.
शहरातील मंदिरांवर विद्युतरोषणाई
आषाढीसाठी नाशिक शहरातील मंदिरे सजली असून विद्युतरोषणाई करण्यात आली आहे. जुन्या नाशिकमधील नामदेव विठ्ठल मंदिर, कॉलेज रोडवरील विठ्ठल मंदिर, श्री काळाराम मंदिर दक्षिण दरवाजाजवळील विठ्ठल मंदिर, हुंडीवाला लेनमधील ज्ञानेश्वर आणि विठ्ठल मंदिर या ठिकाणी दोन दिवसांपासून धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
...अशा आहेत किमती (किलोमध्ये)
साबुदाणा - 80
भगर - 120
शेंगदाणे - 140
राजगिरा - 100
राजगिरा पीठ - 300
पेंड खजूर - 100
रताळी - 100
आषाढी एकादशीला सर्वच उपवासाच्या पदार्थांची मागणी वाढलेली असते. कारण, हा मोठा उत्सव असतो. या काळात फराळवाटपदेखील मोठ्या प्रमाणात करण्यात येत असल्याने मागणी वाढलेली असते. मात्र, किमतीत फरक पडतोच असे नाही. सेलम जिल्ह्यातून साबुदाणा येत असल्याने तिकडे भाव वाढले, की पर्यायाने स्थानिक पातळीवर भाव वाढायला सुरुवात होते. तर भगर आणि राजगिर्यासाठी स्थानिक भागातून पुरवठा होतो.