संत तुकारामांनी अनेक सुंदर सुंदर चपखल विशेषणांनी रामाचा गुणगौरव-स्तुती केलेली आहे. रामाचा दास ‘राघवदास’ नाममुद्रा घेऊनही त्यांनी अभंगरचना केली. ‘जाले रामराज्य काय उणे आम्हासी।’ अशी कृतार्थता तुकोबा व्यक्त करतात. रामराज्याची अनेक प्रकारे महती त्यांनी गायलेली आहे.
तुकोबांनी रामाला ‘स्वामी’, ‘दाता’, ‘सखा’ अशा वेगवेगळ्या संबोधनांनी संबोधलेले आहे. ‘तुकयास्वामी रघुनंदना।’, ‘तुका म्हणे राम माझा दाता।’, ‘तुकयास्वामी रघुनाथ।’ अशा प्रकारे रामाला एकदा ‘रघुनंदन’, एकदा ‘रघुनाथ’, एकदा ‘रघुरामा’ म्हणतात. तसेच राम-‘जानकी जीवन’, ‘राम - योगियांचे निजध्यान’, ‘राम-राजीवलोचन’ अशी वेगवेगळ्या विशेषणांनी रामाच्या वेगवेगळ्या रूपांचा वेध तुकोबा घेतात.
रामाचे चरित्र रावणाच्या नावाशिवाय पूर्णच होत नाही. तुकोबांनी आपल्या 14 पैकी तीन अभंग राम-रावण युद्ध आदींचा ऊहापोह केलेला आहे. ‘पैल आला राम, रावणासी सांगती।’ या अभंगात तुकोबा लंकेतील नागरिक-लोकांची मतं व्यक्त करतात. सागर पैलतीरी राम आला आहे, हे रावणा झोपलास काय? ऊठ अवघी लंका रामदूतांनी अंतर्बाह्य व्यापिली आहे. आता तू रामाला सरळ शरण जा, अन्यथा युद्धास सज्ज हो.
केला रावणाचा वध।अवघा तोडिला संबंध॥
लंका राज्ये बिभिषणा। केली चिरकाल स्थापना॥
औदार्याची सीमा। काय वर्णू रघुरामा॥
तुका म्हणे माझा दाता। रामे सोडविली सीता॥
रावणाचा वध करून रामाने स्वतः राज्यपदी न बसता बिभिषणाला ते राज्य दिले व औदार्याचे असीम दर्शन घडवले, सीतेला सोडवले असे वर्णन करून तुकोबा रामाला माझा ‘दाता’ म्हणतात.
जाले रामराज्य काय उणे आम्हासी
रावणाचा वध करून दक्षिण दिग्विजयी राम सीतेसह अयोध्येत परत आल्याचे; तेथील अयोध्यावासीयांच्या आनंदाचे वर्णन तुकोबांनी, ‘आनंदले लोक नर नारी परिवार।’ असे सुरेखपणे केले असून आणखी एका अभंगात रामराज्य आले आता आम्हास काहीच उणे नाही, असा परमानंद व्यक्त केला आहे. ‘जाले रामराज्य’ हा अभंग वाचताना संत साहित्य परिचितांना संत रामदास स्वामींच्या ‘आनंदवन भुवनी’ची आठवण होते.
जाले रामराज्य काय उणे आम्हासी।
धरणी धरी पीक, गाई वोळल्या हौसी
॥1॥ राम वेळोवेळी आम्ही गाऊ ओविये।
दळिता कांडिता जेविता गे बाईये ॥2॥
स्वप्नी ही दुःख कोणी न देखे डोळा।
‘रामराज्य’ म्हणजे भौतिक, पारमार्थिक आणि आध्यात्मिक उन्नतीचा उत्कर्ष. ऐहिक जीवनाची संपन्नता. सर्वत्र आनंदी आनंद. उत्तम हवा, अपेक्षेएवढा पाऊस, उत्तम पीक, गायीगुरांना भरपूर चारा, दूधदुभत्याचा सुकाळ, कशाची ना उणीव, ना भय, ना चिंता. या अशा अवस्थेचे तुकोबा एका ओळीत वर्णन करतात, ‘स्वप्नी ही दुःख कोणी न देखे डोळा।’ अहो वास्तवात तर नाहीच, पण स्वप्नातही प्रजेला दुःख दिसत नव्हते आणि ही केवळ ऐहिक उपभोग संपन्नताच नव्हे, तर रामनामाच्या गजराची पारमार्थिक उन्नतीही समाजात होती. म्हणूनच, तुकोबा उपरोक्त अभंगाची सुरुवातच, ‘जाले रामराज्य काय उणे आम्हासी?’ अशा तृप्त उद्गारांनी करतात. जगामध्ये अनेक राज्यव्यवस्था आहेत व पूर्वी प्रचलित होत्या; पण ‘रामराज्य’ ही राज्याची सर्वोत्कृष्ट राज्यव्यवस्था म्हणून आजही मानली जाते. महात्मा गांधी, विनोबा भावे आदी अनेकांनी रामराज्याची आदर्श राज्यव्यवस्था म्हणून स्तुती केलेली आहे. संत तुकोबासुद्धा हेच सांगतात, - त्यांचा हा अभंगचरण पाहा-
राम राज्य, राम प्रजा लोकपाळ।
एकचि सकळ दुजे नाही ॥ (अ.क्र.1321)
भारतात प्राचीन काळी अनेक प्रकारच्या राज्यव्यवस्था प्रचलित होत्या. त्यांचा ‘मंत्रपुष्पांजली’मध्ये उल्लेख आहे. पण, ‘रामराज्य’ ही त्यापैकी सर्वाधिक सदैव लोकप्रिय व्यवस्था मानली गेली आहे. इंग्लंडची लोकशाही आधुनिक आंग्लशिक्षितांना आदर्श वाटते व ते तिचे तोंड फाटेपर्यंत गोडवे गातात. पण, लोकमान्य टिळक यांना तेथील राणीचे देव म्हणून स्थान व प्रजा दुय्यम ही गोष्ट खटकते. ते म्हणतात, इंग्लंडची राज्यव्यवस्था ही एक प्रकारच्या करारनाम्यावर आधारित आहे. या राज्यव्यवस्थेचा पाया व्यावहारिक आहे. पण, आम्हाला तेवढ्याने समाजरचनेची राज्यव्यवस्थेची आमची जुनी धार्मिक कल्पना सोडून देण्यास नको. असे सांगून लो. टिळक प्रश्न करतात. इंग्लंडची राणी देव, मग प्रजा कोण? (संदर्भ ः तुकाराम दर्शन ः डॉ. मोरे).
या पार्श्वभूमीवर रामराज्यात राजा देव आणि प्रजाही देवच, अशी भावनात्मक समता आहे. प्रजा व राजा दोघेही समान आहेत, अशी राज्यकर्त्यांची व समाजाची धारणा होती आणि ही राज्यव्यवस्था खर्या अर्थी प्रजानुकूल आदर्श राज्यव्यवस्था होती. अशा व्यापक अर्थाने रामराज्य झाल्याचा आनंद तुकोबांनी व्यक्त केलेला आहे. तुकोबांच्या आनंदालाही व्यापक सामाजिक सन्मुखता आहे. म्हणून एका अभंगात ते म्हणतात- ‘जाले रामराज्य काय उणे आम्हासी।’ आणि एका अभंगात तोच आनंद व्यक्त करताना म्हणतात-
जाले रामराज्य आनंदली सकळे।
तुका म्हणे गाईवत्से नरनारीबाळे॥3॥
तुकोबांच्या या आनंदात नर, नारी, मुले आहेत, तसाच गायी-वासरांचा म्हणजे प्राण्यांचाही समावेश आहे. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ असे म्हणणार्या तुकोबांच्या दृष्टिकोनाचा तो स्वाभाविक पैलू आहे.
राघवदास तुकोबा
तुकोबा विठ्ठलाचे एकनिष्ठ भक्त आहेत आणि ही विठ्ठलभक्ती परंपरा त्यांचे पूर्वज ज्ञानदेव-नामदेव समकालीन विश्वंभरबुुवांपासून अनेक पिढ्या चालत आलेली होती. पण, तुकोबांना विठ्ठलाएवढाच रामही प्राणप्रिय वाटत होता. गंमत म्हणजे, ‘रंगो रामनामी वाणी।’ अशी मागणी-विनवणी विठ्ठलाच्या पायी डोके ठेवून करतात. तुकोबा आपणास एका अभंगामध्ये ‘राघवदास’ म्हणवून घेण्यात धन्यता मानतात.
तुझे नाम माझे मुखी असो देवा।
विनवितो राघव दास तुझा।
दास म्हणवून घेणारी तुकोबांची अनेक हिंदी पदे आहेत. ‘तुका दास रामका। मन में एकहि भाव। तो न पालटू आव। येहि तन जाव॥’ तुकोबांची अनेक हिंदी पदे उपलब्ध आहेत. त्याचा पुढे स्वतंत्र विचार केलेला आहे. रामनाम धन्य झालो, कृतकृत्य झालो, असे कृतार्थतेच्या तृप्तीचे अनेक उद्गार तुकोबांच्या अभंगवाणीत आहेत. उदा.ः
धन्य तो एक संसारी। रामनाम जो उच्चारी।
तुका म्हणे रामनामी। कृतकृत्य जालो आम्ही॥
(पुढील अंकात ः संत तुकाराम (राघवदास) यांच्या अभंगातील
राममाहात्म्य (भाग-4)
विद्याधर ताठे