चातुर्वर्ण्य समाजरचना मोडून तेथे समताप्रधान समाजरचना, लोकशाही आणि समाजवाद प्रस्थापित करून भारताच्या विविधतेला एक राष्ट्रीयत्व प्राप्त करून देणे, हे राजर्षींचे अंतिम उद्दिष्ट होते आणि हे उदिष्ट प्राप्त करण्यासाठी त्यांनी सर्व पातळ्यांवर प्रयत्न केले.राजर्षी शाहू महाराजांची सामाजिक सुधारणाविषयक भूमिका उलगडणारा हा लेख...
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात अनेक क्रांतिकारक निर्णय घेऊन सामाजिक बदल घडवून आणले. सामाजिक बदल हे धीम्या गतीने होत असले, तरी ते राजाश्रय देऊन स्थिर करण्यासाठी प्रयत्न केला. जातीनिहाय वसतिगृह आणि शिक्षणाची सोय उपलब्ध करून देणे, हा त्यापैकी एक महत्त्वाचा घटक होता. शिक्षणाचा लाभ समाजातील सर्वात शेवटच्या घटकाला झाला पाहिजे, या उद्देशाने सुरू केलेल्या शैक्षणिक क्षेत्रातील क्रांतिकारक प्रयोग काही काळात फलरुप झाला. या सार्या बदलाच्या मागे राजर्षी शाहू महाराजांची सामाजिक जाणिवा व सामाजिक धोरणाची कल्याणकारी भूमिका आधारभूत होती.. सामाजिक सुधारणा करण्याचा शिक्षण हा एक मार्ग असला, तरी तेवढ्यापुरते मर्यादित नाही, याची जाणीव राजर्षी शाहू महाराजांना होती. शिक्षण घेतलेल्या व्यक्तीला संधी दिली पाहिजे. तरच, सुधारणा प्रत्यक्षात येतील. यासंदर्भात राजर्षी शाहू महाराजांनी आपली भूमिका मांडली आहे. ते म्हणतात,
“ज्या (वकिलीच्या) सनदा मी महार, मांग, चांभार इत्यादी लोकांना दिल्या, त्या देण्यात माझा हेतू एवढाच आहे की, जे धंदे अस्पृश्यवर्गास कायद्याने किंवा दडपशाहीने बंद झालेले आहेत, ते त्यांस मोकळे करून द्यावे व त्यांची स्थिती सुधारून त्यांच्यात आपण इतर माणसांच्या बरोबरीचे आहोत, असा आत्मविश्वास उत्पन्न करावा. जोपर्यंत आमच्यामध्ये जातीजातींतील मतभेद आणि मत्सर जिवंत आहेत, तोपर्यंत आम्ही आपापसात झगडत राहणार आणि आमच्या हितबुद्धीस अपाय करून घेणार. आमच्यातील अंतस्थ कलह नाहीसे करण्यास आणि आम्हाला स्वराज्यास पात्र करून घेण्याकरिता ही अनर्थकारक जातिपद्धती झुगारून देणे आम्हाला अत्यंत आवश्यक आहे, हे आमच्या लक्षात आले असेलच.” राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी केवळ वैचारिक भूमिका मांडली नाही, तर त्याला कृतीची जोड देऊन सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी आपल्या राजसत्तेचा उपयोग केला.
आपल्या छोट्या संस्थानात सामाजिक सुधारणा घडवून आणताना राजर्षी शाहू महाराजांनी वेगवेगळे प्रयोग केले होते. शेती, शिक्षण, आरक्षण, सामाजिक सन्मानाचे विषय इत्यादी गोष्टींचा विचार करता राजर्षी शाहू हे काळाच्या पुढे जाऊन विचार व कृती करणारे होते. हे सहजपणे लक्षात येते. राजर्षी शाहूंच्या या सामाजिक सुधारणाकार्याचे स्वरुप हे दोन प्रकारचे आहे. ज्यांना समतेचा अनुभव नाही, अशाचा स्व जागृत करून त्यांना सन्मानाने उभे करणे आणि ज्यांनी धर्मभावना, अहंकार, अंधरूढी यांमुळे या सामाजिक सुधारणांना विरोध केला. त्यांचे हरप्रकारे मत व मनपरिवर्तन घडवून आणले. अस्पृश्यतेचा व्यवहार व समर्थन करणार्या आपल्या नातेवाईकाला शिक्षा करताना राजर्षी शाहू डगमगले नाहीत. आणि समतेचे कृतीरुप प्रकटीकरण करताना चोर, दरोडेखोर ठरवलेल्या पारधी समाजाला गस्ती पथकात नोकर्याही दिल्या. कोणत्याही चळवळीचा मूळ उद्देश हा सकारात्मक परिवर्तन हाच असतो. पण ते परिवर्तन घडवून आणण्यासाठी कधी मायेची थाप, तर कधी चाबकाचे फटके मारावे लागतात. हे राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.
सामाजिक सुधारणा घडवून आणण्यासाठी कधी टीका करावी लागते, जुन्या परंपरा मोडून टाकाव्या लागतात. आजच्या परिभाषेत सांगायचे, तर प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध विद्रोह करावा लागतो. असे असले, तरी सामाजिक सुधारणा घडवून आणण्यासाठी सुरू असलेल्या आपल्या कामाचे अधिष्ठान काय असावे? राजर्षी शाहू महाराजांनी सांगितले आहे, “ऐक्य, परस्पर प्रेम, विश्वास व चिकाटी न सोडता अव्याहत प्रयत्न हीच आमची या झगड्यातील शस्त्रे आहेत.” राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनचरित्राचा अभ्यास करताना वरील सूत्रे आपणास सर्वत्र आढळतात. राजर्षी शाहू कोणत्याही एका समूहाच्या विरोधात नव्हते, तर समाजाला जडलेल्या व्याधींच्या विरोधात होते, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. संस्थानातील सर्व नागरिकांना समतेची अनुभूती घेता यायला हवी आणि त्यासाठी आवश्यक असणारे पोषक वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी राजा म्हणून आपली आहे, अशी राजर्षी शाहू महाराजांची मनोभूमिका होती.
राजर्षी शाहू महाराजांच्या क्रांतिकारी निर्णयात सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे संस्थानात सुरू केलेले आरक्षण होय. सरकारी नोकर्या आणि खासगी नोकर्या (राज घराण्यातील विविध पदे व नोकर्या) यांमध्ये राजर्षी शाहू महाराजांनी ५० टक्के आरक्षणाची घोषणा केली. त्यानुसार नोकर्यांमध्ये समावेश सुरू केला. आरक्षण लागू करताना आरक्षणाची तरतूद कशासाठी करण्यात येते आहे, यासंबंधी राजर्षींच्या मनात स्पष्टता होती. ते म्हणतात, “ज्याप्रमाणे एखादा डॉक्टर किंवा महिला डॉक्टर ही अगदी अशक्त व दुबळ्या मुलीला पौष्टिक अन्न व औषधे देऊन तिची जोपासना सर्वांपेक्षा विशेष काळजीने करून तिला इतर मुलांच्या जोडीला आणून बसवितात, त्याप्रमाणे आपण अस्पृश्य मानलेल्या लोकांना वर आणले पाहिजे.” संस्थानाचे अधिपती म्हणून प्रजेचे पालकत्व राजर्षी शाहू यांच्याकडे होते. पण, त्यापलीकडे जाऊन प्रचंड दयाभाव आणि आपल्या प्रजेशिषयी आपुलकी त्यांच्या मनात होती. राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या कामाची प्रेरणा सांगताना म्हटले आहे, “दया धर्म का मूल हैं, नरक मूल अभिमान’ यावरून, देशाची म्हणजे देशबंधुंची सेवा करणे, जनी जनार्दन शोधणे व पाहणे, हाच खरा धर्म आहे. या बाबतीत सर्व धर्मांचे ऐक्य आहे. परोपकार हा पुण्यमार्ग आहे व परपीडा हे पाप आहे, असेच सर्व प्रतिपादन करतात. याप्रमाणे विचार केल्यास, धर्मभेदाच्या किंवा जातिभेदाच्या सबबीवर एकमेकांचा मत्सर करणे, अगदी चुकीचे आहे.”
राजर्षी शाहूंच्या वरील विचाराचा विसर आपल्याला पडला आहे का, असा प्रश्न उपस्थित करणार्या आजच्या सामाजिक वातावरणात आपण राजर्षी शाहू महाराजांचे स्मरण करत आहोत. राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या छोट्या संस्थानात पारतंत्र्याच्या काळात जे सामाजिक सुधारणांचे प्रयत्न केले. ते आजही आपल्याला मार्गदर्शन करणारे आहेत. राजर्षी शाहूंच्या विचार आणि कृतीचा अभ्यास करताना, अनुसरण करताना हे आपण कशासाठी करत आहोत, याची जाणीव कायम आपण आपल्या मनात जागृत ठेवणे आवश्यक आहे. आपला समाज भेदरहित, सबळ, सक्षम आणि एकात्म करण्याचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून पुढे जात आहोत. या वाटचालीत राजर्षी आपल्याला कायम मार्गदर्शक ठरणार आहेत. समाजपरिवर्तन म्हणजे काय, हे एकदा लक्षात आले, की अन्य गोष्टी गौण होतील.
आपला कृतीआराखडा राजर्षी शाहू महाराजांनी तयार केलेला आहे. ते म्हणतात, “समाजाची नीतिमत्ता वाढणे, हे सामाजिक सुधारणेचे एक महत्त्वाचे अंग आहे. वाईट रीतीभाती व धर्मभोळेपणा यांच्या योगाने आमच्यामध्ये मद्यपान, बालविवाह, जुलुमाचे वैधव्य, देवास मुली वाहणे हे असे घातक प्रकार रूढ होऊन त्यांपासून शारीरिक, मानसिक व बौद्धिक अवनती झाली आहे. ही अवनती दूर करण्यासाठी आपण उपाययोजना करावी. या बाबतीत शील बनविणे हेच मुख्य कर्तव्य आहे. शीलवान नागरिकांशिवाय राष्ट्र बनणे अगर उदयास येणे, या गोष्टी शक्यच नाहीत. शारीरिक उन्नतीकडेही आपण लक्ष दिले पाहिजे. परंतु, केवळ शारीरिक शौर्य, वीर्य कितीही अंगात असले, तरी नीतिमत्तेची अवनती झाल्याबरोबर रोमसारखी बलाढ्य राष्ट्रेही कशी रसातळाला मिळाली, हे आपण विसरता कामा नये.” त्यांनी सांगितलेल्या या मार्गावर पाऊल टाकत पुढे जाणे, हीच त्यांना आदरांजली ठरेल.
रवींद्र गोळे