माझे ‘सावरकर’ प्रयोग

    27-May-2024
Total Views | 318
Savarkar drama

सावरकर या महान व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू आहेत. सावरकरांच्या प्रतिभेला हयातीत न्याय मिळाला नाहीच. पण, मृत्यूनंतरही वाचाळवीरांनी त्यांना अपमानित करण्याची एकही संधी सोडली नाही. म्हणूनच सावरकर नव्याने लोकांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. याचाच प्रयत्न म्हणून योगेश सोमण यांनी सुरु केले ‘विनायक दामोदर सावरकर’ या एकलनाट्याचे प्रयोग... या लेखात जाणून घेऊया, सोमण यांच्या या नाटकाबद्दल, त्यांच्याच लेखणीतून...
 
एक रंगकर्मी किंवा कलाकार म्हणून सावरकर माझ्या आयुष्यात १९९६ साली आले. अर्थात, त्याअगोदरही सावरकरांचा परिचय शालेय पाठ्यपुस्तकांतून, संघातील विविध कार्यक्रमांतून झाला होताच. पण, सावरकर जाणून घ्यायला, अभ्यासायला सुरूवात झाली, ती सावरकरांच्या ‘जन्मठेप’ या आत्मचरित्रावर आधारित मी नाटक दिग्दर्शित केले तेव्हा. त्याचे नाट्य रुपांतरही मीच केले होते. या नाटकात एकूण २७ कलाकार होते आणि अडीच तास चालणारे हे दोन अंकी नाटक होते. याचे आम्ही आमच्या संस्थेतर्फे ४३ प्रयोग केले. या नाटकाच्या दिग्दर्शनाचा अनुभव म्हणजे, कलाकारांना सावरकर उमगले नाहीत, तर सादरीकरण चांगले करताच येत नाही. तालीम सुरू होऊन जवळ जवळ २५ दिवस झाले, तरी मीच निवडलेला कलाकार सावरकरांची भूमिका नीट करत नव्हता. माझे समाधानच होत नव्हते. सावरकरांची तळमळ, त्यांची बुद्धिमत्ता, त्वेष हे संवाद केवळ पाठ करून साकारता येत नाही, हे मला तेव्हा उमगले. अखेरीस ती भूमिका मी केली. ‘जन्मठेप’ या नाटकात भूमिका रंगवित असताना, सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वातले पैलू हळूहळू मला उलगडू लागले आणि माझा विनायक दामोदर सावरकर या व्यक्तिमत्त्वाचा शोध सुरू झाला, तो आजतागायत चालू आहे आणि पुढेही चालू राहील. इतके अथांग हे व्यक्तिमत्त्व आहे.
 
सावरकर या व्यक्तिमत्त्वाबरोबरचा प्रवास चित्रपट, मालिका, कथाकथन असा चालूच राहिला. वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळे पैलू अभ्यासायला मिळाले. कधी सावरकरांची बालपणीची शपथ मनाला भावून गेली, तर कधी ‘मित्रमेळा’, ‘अभिनव भारत’चे त्यांचे कार्य मला झपाटून टाकायचे. कधी टिळकांबरोबरचे त्यांचे संबंध मी अभ्यासायचो, तर कधी पहिल्या विदेशी कपड्यांचे दहन घडवितानाची त्यांची भूमिका मला आकर्षित करायची. २०१४ पासून सावरकरांच्या बाबतीत बदनामीचे जे एक राष्ट्रीय षड्यंत्र रचले जात होते, त्याला आपण काहीतरी उत्तर दिलेच पाहिजे, हा विचार सारखा अस्वस्थ करीत होता. बदनामी करण्यासाठी केलेल्या बालिश आणि मूर्ख वक्तव्यांना उत्तर देत बसण्यापेक्षा, एक अभिनेता म्हणून आपल्याला उमगलेले, भावलेले सावरकर प्रेक्षकांसमोर आणावे, असे मला वाटू लागले आणि ‘विनायक दामोदर सावरकर’ हा एकल नाट्यप्रयोग मी उभा केला आणि त्याचे प्रयोग सुरू केले. अल्पावधीतच त्याचे २०० प्रयोग झाले. हा एकपात्री प्रयोग करताना हे पक्के डोक्यात होते की, याचे विविध ठिकाणी अगदी साध्या, छोट्या सभागृहांतून सहज आणि कमी खर्चात प्रयोग करता आले पाहिजेत. त्यामुळे सुटसुटीत नेपथ्य रचना योजिली. गरजेपुरतीच प्रकाशयोजना ठेवली. त्यामुळेच या एकपात्री नाट्यप्रयोगाचे भरपूर प्रयोग करता आले. पुण्यातील कर्वे रस्त्यावरील सावरकर अध्यासनाच्या सभागृहात, ‘विवेक व्यासपीठा’च्या सहयोगाने याचे प्रयोग आम्ही सुरू केले. सभागृह तुडूंब भरलेले असायचे. प्रेक्षक पुनःपुन्हा प्रयोग बघायला यायचे.

आपल्या मुलांना सावरकर समजावे यासाठी पालक आवर्जून आपल्या पाल्यांना घेऊन यायचे. प्रयोगाची संकल्पना अशी ठेवली की, सावरकरच प्रत्यक्ष प्रेक्षकांशी संवाद साधायला सुरुवात करतात, आणि आयुष्यात भेटत गेलेल्या एकेका व्यक्तिमत्त्वाबरोबर कथानक सांगत जातात. बाबाराव, येसूवहिनी, मदनलाल धिंग्रा, डेव्हिड बारी इत्यादी व्यक्तींच्या अनुषंगाने येणार्‍या प्रसंगांचे चित्रण या प्रयोगात मी केले. इतर पात्रांचे संवाद ध्वनिमुद्रित स्वरुपात प्रेक्षकांना ऐकू येतात आणि प्रयोगातील नाट्यमयता वाढत जाते. जन्मठेप भोगत असताना कोलू ओढणे किंवा इतर शिक्षा मूकपणे सादर केल्या, तरी तेवढाच परिणाम साधला गेल्याचा माझा अनुभव आहे. या प्रयोगातून भरपूर पैसे मिळावे, हा हेतूच नव्हता. मात्र, इतकी रक्कम उभी राहावी की पुढील प्रयोग करता यावेत. या एकपात्रीचे प्रयोग कधीच तिकीट लावून केले नाहीत. प्रयोगाचे मूल्य ऐच्छिक असते. पण, एक कलाकार म्हणून अभिमानाने सांगावेसे वाटते की, प्रेक्षकांनी इतके भरभरून ऐच्छिक मूल्य प्रत्येकवेळी अर्पण केले की, २०० प्रयोगांचा टप्पा आम्हाला गाठता आला. या प्रयोगादरम्यान एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की, लोकांना सावरकरांबद्दल जाणून घ्यायची खूप इच्छा आहे. प्रयोगानंतर प्रेक्षकांशी कायम संवाद व्हायचा. प्रेक्षक त्यांच्या मनातल्या शंका विचारायचे, निरसन करून घ्यायचे. प्रयोगासाठी काही चांगल्या सूचनाही करायचे. थोडक्यात, माझा हा एकपात्री प्रयोग हे सावरकरांच्या भक्ताने केलेले आणि अंधभक्तांनी बघितलेले भाबडे कथन नव्हते, तर सावरकर या व्यक्तिमत्त्वाला जाणून घेण्याची, त्यांच्या विचारांचा, तत्वांचा मागोवा घेण्याची इच्छा मला दिसून आली.
 
हा एकपात्री प्रयोग सलग १ तास, ४० मिनिटे मी सादर करायचो. अष्टभुजेसमोर घेतलेल्या शपथेपासून प्रयोगाची सुरुवात होते, आणि सेल्युलर जेलमधून सुटकेवर प्रयोग संपायचा. प्रयोग करतानाही जाणवायचे की, हे व्यक्तिमत्त्व असे दोन-अडीच तासांत कोंबून बसविताच येऊ शकत नाही. सावरकरांचे काव्य, नाट्यलेखन, सामाजिक कार्य, राजकीय कारकीर्द, भाषाशुद्धी, विज्ञाननिष्ठा या पैलूंना आपण स्पर्शही नाटकातून करू शकत नाही. यावर उपाय म्हणून, वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याने देऊ लागलो, श्रोत्यांच्या आग्रहाखातर तीन दिवसांची सावरकर चरित्रमालाही अनेक ठिकाणी कथन केली. त्या प्रत्येकवेळी जाणवले की, इतके नाट्यमय जीवन हे एखादे नाटक, एखादे व्याख्यान, एखादा सिनेमा यांच्यात बंदिस्त होऊ शकत नाही. म्हणून, सध्या सावरकरांवर वेबसीरिज करण्याचा घाट घातला आहे. माझ्या मनातील सावरकर लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रत्येकी नऊ-दहा भागांचा एक सिझन असे चार सिझन बनविण्याचा संकल्प केला आहे. तरीही, मनात शंका येते की, आपण समग्र सावरकर पडद्यावर आणू शकू का? कारण, जेवढे म्हणून आपण त्यांचा शोध घ्यायला जातो, तेवढे सावरकर नव्या रुपात मला दिसतात, एखाद्या कॅलिडोस्कोपसारखे. जरा फिरवले, की वेगळी आकृती, वेगळी नक्षी. कधीकधी वाटते, त्यांच्या काव्यपंक्ती त्यांच्याच बाबतीत अगदी तंतोतंत आहेत; ‘अनादी मी, अनंत मी, अवध्य मी भला.’ तरीही हा अनंताच्या शोधाचा प्रवास, सादरीकरण करतानाची ऊर्जा मला खूप समृद्ध करून जाते. इतकेच.
 
 
 
योगेश सोमण
 
अग्रलेख
जरुर वाचा
तुला घाबरण्याची गरज नाही..., शमीच्या लेकीने धुलीवंदन सण साजरा केल्याप्रकरणी मध्य प्रदेश मंत्र्याने पत्राद्वारे शमीला दिला धीर

"तुला घाबरण्याची गरज नाही...", शमीच्या लेकीने धुलीवंदन सण साजरा केल्याप्रकरणी मध्य प्रदेश मंत्र्याने पत्राद्वारे शमीला दिला धीर

Mohmmed Shami टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने उपवास सुरू असताना पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यादरम्यान ज्यूस प्यायल्याने त्याला एका मौलवीने इस्लामचा धर्म भ्रष्ट केल्याप्रकरणी टीका केली. उपवास सुरू असतानाही तो ज्यूस पित होता. त्याने उपवास पाळल्यावरून काही धर्मांधांनी त्याला धारेवर धरले. त्यानंतर आता त्याच शमीच्या लेकीने धुलीवंदन सणाचा आनंद घेतल्याने टीका करण्यात आली. यामुळे आता मध्य प्रदेशचे मंत्री विश्वास सारंग यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. कट्टरपंथींनी अनेक सीमा ओलांडल्या असल्याचे..