ज्योतीने तेजाची आरती...

    27-May-2024
Total Views |
Vinta Joshi on Savarkar

शाहिरी कला ही वीररसाची जननी! आणि स्वातंत्र्यवीरांच्या काव्यात वीररस नाही, असे होणे नाही. सावरकरांची अज्ञात काव्यसंपदा जगासमोर आणण्याचा प्रयत्न त्यांची नात, महिला शाहीर विनता जोशी करीत आहेत. सावरकरांच्या या काव्यसंपदेला मायबाप रसिकांच्या समोर घेऊन जाताना, त्या शाहीर होतात. सावरकरांच्या या ठेव्याचा प्रसार करतानाच्या अनुभवांची ही शब्दसुमनांजली...

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचे धाकटे बंधू डॉ. नारायणराव सावरकर यांची मी नात. त्यांच्या मुलीची मुलगी. माझे शालेय शिक्षण नाशिकच्या सारडा कन्या विद्यालयातून झाले आणि आर. व्हाय. के महाविद्यालयातून ‘इलेक्ट्रॉनिक्स’ विषयातून विज्ञान शाखेतून पदवीधर झाले. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांच्या बालवयात आणि तरुण वयात रचलेले पोवाडे आणि गीते, डॉ. नारायण सावरकर म्हणजे माझे आजोबा ‘मित्रमेळ्या’तून आणि इतर कार्यक्रमांतून गात असत. माझी शाहिरी कला माझ्या आजीच्या लक्षात आल्यावर, हा वारसा डॉ. नारायणरावांकडूनच आला, असे ती म्हणत असे. मी नववीत असताना आमच्या शाळेत पाहुण्या म्हणून आलेल्या बाईंनी झाशीच्या राणीचा पोवाडा म्हणून दाखविला. तेव्हापासून माझी शाहिरी कला उदयाला आली. आम्ही त्या पोवाड्याने प्रेरित होऊन पुढे आमच्या स्नेहसंमेलनात तो पोवाडा सादर केला. शाहीर बाबासाहेब देशमुख यांची कॅसेट मिळवून, त्यातून वीर तानाजी मालुसरे यांच्यावर पोवाडा नाट्यप्रसंगासहित सादर केला.
 
 १९८३ हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मशताब्दी वर्ष होते. नुकतीच स्वतःतील शाहिरी कलेची जाणीव झाल्यामुळे, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनावरील शाहीर गोविंदस्वामी आफळे रचित पोवाडा, नाशिकच्या परशुराम सायखेडकर नाट्यगृहात साने गुरूजी कथामालेत यशस्वीरित्या सादर केला. तेव्हाच माझी शाहिरी कारकिर्द सुरू झाली. ‘बीएस्सी’च्या त्या पाच वर्षांत विविध आदिवासी भागांतून आणि शहरांतून ‘हिंदू जनजागरण’ मोहिमेतून, २०० पेक्षा अधिक कार्यक्रमांत स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जीवनकार्य जनमानसांत पोहोेचविणे, तसेच त्यांची प्रसिद्ध नसलेली गाणी, कविता या कार्यक्रमातून गाऊन कवी सावरकरांची ओळख करून देणे, हे माझे उद्दिष्ट साध्य होऊ लागले. ‘ही ज्योतीने केलेली तेजाची आरती’ पुढे जोमाने चालू राहिली. दुबई, अबुधाबी, मॉरिशस, लंडन, बर्मिंगहॅम येथे प्रत्यक्षरित्या, तर कॅनडा, कुवेत, अमेरिका येथे ऑनलाईन पद्धतीने शाहिरी कलेच्या माध्यमातून सावरकरांच्या तेजस्वी पैलूंमधून त्यांची ‘जीवनगाथा’ उलगडण्याचे कार्य अविरत घडत राहिले.

या सगळ्या दरम्यान अचानक एक दिवस दुबईत सादरीकरणाची संधी आली. परदेशातील हा माझा पहिलाच कार्यक्रम होता. तिथे दोन तासांचा कार्यक्रम झाला. रसिकांचा या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाददेखील मिळाला. या कार्यक्रमात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आले होते. त्यांनी माझी केलेली प्रशंसा ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. बाळासाहेब देवरस हे असेच एक प्रतिष्ठित नाव. त्यांना नाशिकला नजरकैद झाली होती. त्यावेळी मीही नाशिकमध्येच होते. हे त्यांना कळल्यावर त्यांनी मला, सावरकरांच्या नातीला गाणी आणि पोवाडे म्हणण्यासाठी बोलावून घेतले. माझ्यासाठी हा मोठा सन्मान होता. अजून एक गोष्ट म्हणजे, पु. ल. देशपांडे जेव्हा पार्किन्सनने आजारी होते, त्यावेळी त्यांनी माझे गाणे आणि पोवाडा ऐकून खूप कौतुक केले होते. रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्यात शाहिरी रात्र कार्यक्रमात मी एकटी महिला शाहीर म्हणून आमंत्रित होते. मुंबईतील काळा घोडा फेस्टिवलमध्येही माझ्या पोवड्यांचा कार्यक्रम झाला आहे. पुलवामाच्या भ्याड हल्ल्यानंतर मला आपल्या वीर बहादूर जवानांसाठी काही ओळीस स्फुरल्या, त्या अशा-

 
वाहूनी आपल्या मातृभूमीला शीर कमल
सुमना पराक्रमाने अजरामरते झाले
समरांगणा धन्य धन्य वीर ते झाले
शूर ते भले देशचे हिरे देशार्थ प्राण अर्पियले
जन्माचे सार्थक झाले
वंदन करून मातृभूमी आणि
वीरांच्या चरणी बलिदानास स्मरण ठेवूनी
बद्ध आम्ही वचनी....

या ओळी त्या मातृभूमीच्या वीर सैनिकांना मी समर्पित करते. १९८३ ते २०२३ या ४० वर्षांच्या कालावधीत या सर्व कार्यक्रमांत विविध अनुभवाने समृद्ध झाले. शाहिरीचे माध्यम इतके प्रभावी आहे की, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनदर्शनाने भाराविलेले श्रोते विविध प्रश्न विचारतात. कधीतरी प्रेक्षकांतून ‘ताई, तुमच्या वाद्यांची पिशवीतरी गाडीपर्यंत आम्ही नेतो; तेवढीच सावरकरांची सेवा केल्याचे भाग्य आमच्या नशिबी येईल,’ अशी उत्कट भावनादेखील मी अनुभवली आहे. विविध प्रवासी समूहांबरोबर अंदमानला जाऊन सेल्युलर कारागृहातील, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कक्षात सादरीकरणाचे भाग्य मला लाभले. माझ्यासकट प्रेक्षकांच्या उचंबळून आलेल्या भावनांची मी साक्षीदार आहे. भाग्याची गोष्ट अशी की, हजारावा शाहिरी कार्यक्रम अंदमानमध्येच संपन्न झाला. पुण्यातील एका शाळेतील नववीच्या विद्यार्थ्यांच्या विद्याव्रत कार्यक्रमात गेले काही वर्षे, ‘सावरकर जीवनदर्शन’ शाहीर व कवी हे दोन्ही उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडले आहेत.
 
पुदुच्चेरी, विजापूर यांसारख्या अमराठी प्रांतातील लोकांसमोर स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जीवनकार्य महाराष्ट्रीय लोककलेच्या, म्हणजेच शाहिरीच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडता आले. मुळातच शाहिरी कला ही वीररसाची जननी! स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विविध पैलूंनी नटलेले तेजोमय जीवन, या कलेच्या माध्यमातून नक्कीच श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य करते. पुरुषवर्चस्व असलेली ही शाहिरी कला, कमीतकमी वाद्यांच्या साथीने समर्थपणे पेलताना एक महिला शाहीर म्हणून मी नक्कीच कृतार्थ आहे. ‘नमन वीरतेला’ या माझ्या कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनावरील पोवाड्याबरोबर त्यांनी रचलेल्या छत्रपती शिवरायांची आरती, ‘अनादी मी, अनंत मी’, ‘प्रियकर हिंदुस्थान’, ‘हिंदू एकता गीत’, शस्त्रगीत, बाजीप्रभू, तानाजीचा आणि झाशीची राणी यांच्या जीवनावरील पोवाडा यांचे सादरीकरण असते. या सर्वांबरोबरच प्रभावी निवेदनातून कार्यक्रम रंगत जातो. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन!
 
 
विनता जोशी