‘ने मजसी ने, परत मातृभूमीला। सागरा प्राण तळमळला’ या काव्यपंक्ती जेव्हा जेव्हा ऐकल्या, तेव्हा तेव्हा वाटले ज्या महापुरुषाने ही मातृप्रेमाची उत्कट भावना शब्दबद्ध केली, त्यासाठी, त्यावर काहीतरी मोठे लिहावे, करावे, लिहिले जावे, केले जावे. एक कलाकार म्हणून अनेकदा एखादे काम जेव्हा आपल्या पदरी पडते, त्यावेळी अनेक प्रश्न मनात स्फुरतात. रणदीप हुड्डा दिग्दर्शित, अभिनीत ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चरित्रपट मनातील अशाच सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन जातो. समुद्र ओलांडून किनार्यावर पोहोचणे अजून कठीण, तरीपण म्हणावे लागेल की, दिग्दर्शक-अभिनेते रणदीप हुड्डा यांनी ही उडी उत्तमरित्या मारली आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चरित्रपटाचा ट्रेलर सुंदरच होता. पण, मनात एक भीती होती की, सध्याच्या सामाजिक, राजकीय परिस्थितीत चित्रपट ‘सेलेबल’ करण्याच्या नादात, त्याचा मूळ गाभा आणि त्यांचे महान काम डावलले तर जाणार नाही ना? पण, ज्यावेळी हा चित्रपट पाहिला, तेव्हा हे सगळे अनावरण अगदी गळून पडले. यासाठी संपूर्ण टीमचे सर्वप्रथम विशेष कौतुक नक्कीच करावे लागेल. सावरकरांच्या आयुष्यातील तीन महत्त्वाचे टप्पे, अतिशय संयतपणे आणि तीन तासांच्या कालावधीत उत्तमरित्या मांडले गेले, असे माझे प्रामाणिक मत. क्रांतिकारक चळवळतील सावरकरांचे योगदान, मदनलाल धिंग्रा, श्यामजी कृष्णा वर्मा, मादाम कामा आणि ‘इंडिया हाऊस’मधील सर्व महत्त्वाच्या घडामोडी योग्यरित्या दिग्दर्शक रणदीप हुड्डा यांनी टिपल्या आहेत. मदनलाल धिंग्रा आणि स्वा. सावरकर यांच्यातील संवाद आणि त्याचे चित्रीकरण अगदी बारकाईने केले आहे, असे एक सावरकरप्रेमी आणि अभ्यासक म्हणून मी अनुभवू शकलो. एवढा संवेदनशील विषय घेऊनही, त्याला पूर्ण जबाबदारीने या चित्रपटाच्या संपूर्ण चमूने न्याय दिला, याचा मला आनंद झाला. गांधीजी आणि सावरकर यांच्यावर चित्रित झालेले प्रसंग तर विशेष उल्लेखनीय होते. त्याचबरोबर यमुनाबाई आणि नारायणराव जेव्हा तुरुंगामध्ये भेटायला येतात, तो भावनिक क्षण डोळ्यांत टचकन अश्रू आणतो. याशिवाय लंडनमधील गांधीजी आणि सावरकर यांची भेट, वैचारिक मतभेद, अशा अनेक बारीकसारीक गोष्टी मनाला भावतात आणि दिग्दर्शक-लेखक यांचा अभ्यासदेखील अधोरेखित करून जातात.
‘हिंदुत्व आणि सावरकर’ हा अतिशय महत्त्वाचा पैलू चरित्रपटात कोणताही आक्रस्ताळेपणा न करता आणि तथ्य आणि परिस्थितीच्या आधारावर मांडण्यात आला आहे आणि त्यामुळेच चित्रपटाची ती नक्कीच उजवी बाजू ठरते. ‘अभिनव भारत’, लंडन, अंदमान, रत्नागिरी, हिंदू, हिंदुत्व, पतीत पावन मंदिर अशा सावरकरांच्या आयुष्यातील विविध पैलूंवर प्रकाश टाकणारा हा चित्रपट, पुन्हा सावरकरांचा काळ डोळ्यांसमोर उभा करतो. रणदीप हुड्डा यांच्याआधी महेश मांजरेकर हा चित्रपट दिग्दर्शित करणार होते, पण काही कारणास्तव त्यांना हा प्रोजेक्ट सोडावा लागला. त्या काळात आम्ही एका चित्रपटासाठी एकत्र चित्रीकरण करत असल्यामुळे, सेटवर याबद्दल चर्चा होत असत. रणदीप हुड्डा यांची मेहनत आणि वाचन यांविषयी मांजरेकर नेहमी सांगायचे. रणदीप हे माझे आवडते अभिनेते असले तरी, ऐकताना वाटायचे की, त्यांनी सावरकरांविषयी खरेच एवढे वाचले असेल का? पण, चित्रपटाचे बारकावे बघून या सगळ्या गोष्टी खर्या वाटू लागल्या. रणदीप हुड्डा यांनी त्यांच्याच आयुष्यातील एक महत्त्वाचे पात्र यशस्वीरित्या दिग्दर्शित केले आहे, हे नक्की. त्यांचा हा दिग्दर्शनाचा पहिलाच प्रयत्न आहे, असे चित्रपट पाहून अजिबात वाटत नाही. या चित्रपटातील प्रत्येक पात्राने आपापल्या वाट्याला आलेली भूमिका जबाबदारीने निभावली आहे.
प्रत्येक भूमिकेला योग्य तो न्याय दिला आहे. याशिवाय, सावरकरांच्या भूमिकेसाठी रणदीप हुड्डा यांचे शारीरिक परिवर्तन हे अंगावर काटा आणणारे आहे. कधीतरी मला वाटते की, जेव्हा हुड्डा यांची भेट होईल, तेव्हा नक्कीच मला त्यांच्याशी सावरकरांविषयीचा अभ्यास, चित्रपटासाठी केलेली तयारी आणि विषयनिवडीबद्दल चर्चा करायला आवडेल. याशिवाय त्यांना सूचनाही करावीशी वाटते ती अशी की, सावरकरांनी मराठी भाषेसाठी केलेले काम, साहित्य, नाटक, कला यांमधील सावरकरांचे अनन्यसाधारण योगदान, याव्यतिरिक्त सावरकरांनी केलेल्या असंख्य कविता, नाटके यांबद्दलही या चित्रपटात पाहायला आवडले असते. आज बर्याच लोकांना माहीत आहे की, ‘महापौर’, ‘नगरपालिका’ यांसारखे असंख्य शब्द सावरकरांनी मराठी भाषेला दिले. त्यांनी असंख्य कविता तर रचल्याच, पण लावण्याही शब्दबद्ध केल्या. एवढेच नाही, तर अंदमानला त्यांनी उर्दू शिकून उर्दूमध्येसुद्धा अनेक कवितांचे लेखन केले. एखादी व्यक्ती आपल्या देशासाठी किती झटू शकते, किती त्याग करू शकते, याचा परमावधी म्हणजे सावरकर कुटुंब. आम्ही शाळाशाळांमध्ये सावरकर विचारांच्या जनजागृतीचे अनेक कार्यक्रम केले. सावरकरांची गाणी, कविता, नाटकातील उतारे आणि सामाजिक व्यवस्थेवरचे त्यांचे विचार, यावर जनजागरण व्हावे आणि त्यांचे विचार आणि प्रतिमा तरुण आणि भावी पिढीपर्यंत पोहोचावे, म्हणून सादरीकरण केले. मुळात म्हणजे, सावरकरांचे विचार आजच्या 21 व्या शतकाशीदेखील मिळतेजुळते आहेत, हे लक्षात घ्यायला हवे.
चित्रपटात रणदीप हुड्डा यांनी त्यांच्या वैचारिक बैठकीला विशेष न्याय दिला आहे, असे वाटले. सावरकरांवर जेव्हा जेव्हा टीका झाली, तेव्हा हिंदुत्व, मुसलमान या मुद्द्यावरूनच. पण, चित्रपटामध्ये रणदीप यांनी त्यांचे हिंदुत्वाचे विचार काय होते, याचे सुंदर सादरीकरण केले आहे आणि त्यात सावरकर हिंदुत्व, भारतीयत्व आणि धर्मनिरपेक्षता यांवर स्पष्ट भाष्य करतात. एका मुलाखतीत जसे दिग्दर्शक हुड्डा स्वतः टीकेला उत्तर देताना म्हणाले होते की, “हा एक अॅण्टी-प्रपोगंडा चित्रपट आहे. अनेक वर्षांची चिखलफेक, चारित्र्यहनन, अपमान आणि बदनामी याला सडेतोड उत्तर देणारा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट आहे.” मगाशी मी म्हटल्याप्रमाणे, ज्यावेळी आम्ही गावोगाव जाऊन सावरकर विचारांच्या प्रचार-प्रसाराचे कार्यक्रम करायचो, तेव्हा आर्थिक पाठबळ नव्हते. पण, कायम मनात एक भावना होती की, सावरकरांवर भव्य अशी कलाकृती व्हावी. मला असे वाटते की, सावरकरांसारखे जगता आले पाहिजे. त्यांचे विचार जपले पाहिजेत, त्यांच्यावर झालेला अन्याय लोकांना समजला पाहिजे. त्यांच्या देशसेवेतून आपण थोडे का होईना, शिकले पाहिजे. जाता जाता मी एक स्वतः कलाकार, चित्रपट या माध्यमाचा एक विद्यार्थी, सुजाण प्रेक्षक, सावरकरप्रेमी आणि हिंदुत्वाचा अनुयायी म्हणून या चित्रपटाच्या पूर्ण टीमचे अभिनंदन करतो आणि आज या राजकीय-सामाजिक परिस्थितीला साजेसा चित्रपट बनविला म्हणून रणदीप हुड्डा यांचेही विशेष कौतुक करतो. शेवटी इतके नक्की सांगेन की, ही कलाकृती बघून माझ्यातील सावरकरप्रेमी नक्कीच सुखावला आहे.
आरोह वेलणकर