केवळ एक तासाच्या ‘मृत्युंजय सावरकर’ या नाटकात सावरकरांच्या जीवनातील सारे महत्त्वाचे प्रसंग आणि त्यांच्या तेजस्वी व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंचे मनोहारी दर्शन घडविण्याचा मी प्रयत्न केला आहे. तसेच, त्यांचे हिंदुत्वाचे तत्वज्ञान, त्यांची विज्ञाननिष्ठ आणि बुद्धिवादी भूमिका, सुभाषचंद्र बोसांना त्यांनी केलेले मार्गदर्शन आदी गोष्टींचाही प्रभावीपणे वेध घेण्याचा प्रयास केलेला आहे. संपूर्ण नाटकभर प्रेक्षक ज्या तन्मयतेने हे नाटक बघतात, ते पाहून खरोखरेच जन्माचे सार्थक झाल्यासारखे वाटते.
सावरकरांच्या प्रेमात मी अगदी लहानपणीच म्हणजे साधारणपणे वयाच्या १४व्या वर्षीच पडलो. माझी पहिली कविता ‘कृतघ्न’ ही त्या सावरकरभक्तीतूनच जन्माला आली होती आणि तेव्हापासूनच एक सल माझ्या मनात होती. ती म्हणजे, सावरकर हे या देशातील देशभक्तांचे सर्वोच्च आदर्श आहेत. हिंदूंच्या पुनरुत्थानासाठी त्यांनी केलेले कार्य एकमेवाद्वितीय असे आहे. ते एक महाकवी, नाटककार, निबंधकार, कादंबरीकार, इतिहासलेखक, भाषाशास्त्री होते. एवढे असूनही त्यांचे नाव, कार्य इतिहासातून नाहीसे करण्याचा अश्लाघ्य प्रयत्न, स्वातंत्र्यानंतर सत्तेवर आलेल्या राज्यकर्त्यांनी केला. जो देश आपल्या देशभक्तांची पर्वा करत नाही, त्यांचा आदर्श आपल्या बाल, तरुणांपुढे ठेवत नाही, तो देश कधीही प्रगती करू शकत नाही. याबाबत माझी धारणा पक्की असल्यामुळे, सावरकरांचे जीवन आणि कार्य जसे जमेल तसे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत नेण्याचे कार्य नेटाने करण्याचे मी निश्चित केले. पण, कथा, कविता, गाणी, लेख, व्याख्यान आदी माध्यमांच्या मर्यादा लक्षात आल्यामुळे, नाटक हे एकाच वेळी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचे अत्यंत प्रभावी आणि शक्तिशाली माध्यम आहे, या जाणीवेतून मी नाटक या माध्यमाकडे वळलो.
‘मृत्युंजय सावरकर’ या नाटकाची मध्यवर्ती कल्पना आणि संहिता मी दै. ‘तरुण भारत’मध्ये साधारणतः २००० साली प्रकाशित झालेल्या माझ्याच स्वा. सावरकरांवरील, ’ये! मृत्यो! ये!’ या एका दीर्घलेखावरून घेतली. नाटक लिहायचे ठरविल्यानंतर ते कमीतकमी खर्चात कसे करता येईल आणि अधिकाधिक प्रभावी कसे होईल, याचा मी सर्वाधिक विचार केला. कारण, सावरकरांवर नाटकांची निर्मिती करणार्या संस्था काही मोठ्या धनाढ्य नाहीत, याची मला कल्पना होती. कोणत्याही नाटकात पात्रे जितकी जास्त आणि नेपथ्य अधिक ते नाटक कलाकारांचे मानधन, प्रवासखर्च, रंगभूषा, वेशभूषा या सर्वच दृष्टींनी खर्चिक होते, याची मला जाण होती. त्यामुळे मी हे नाटक एकपात्री आणि नगण्य अशा नेपथ्यासह करण्याचा निर्णय घेतला आणि त्यादृष्टीने संहिता तयार केली. संहिता लिहून पूर्ण झाल्यावर सावरकरांची भूमिका सशक्तपणे उभी करणार्या आणि सावरकरांची चेहरेपट्टी आणि व्यक्तिमत्त्व यांच्याशी साधर्म्य असणार्या कलाकाराचा शोध सुरू झाला. शेवटी जवळजवळ सहा महिन्यांच्या शोधानंतर अचानक एक दिवस, मला अनिल पालकर हा कलावंत गवसला आणि त्याला पाहिल्याबरोबर ‘बास, हाच आपला सावरकर’ हे मी निश्चित केले. अनिल पालकर हा वैदर्भीय रंगभूमीवरील एक कसलेला नट आहे. त्याने ‘जाणता राजा’ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मध्यवर्ती भूमिका साकारली होती. तसेच, डॉ. हेडगेवार, गोळवलकर गुरूजी, स्वामी विवेकानंद, गजानन महाराज, साईबाबा आदी व्यक्तिरेखाही त्याने विविध नाटकांतून यशस्वीपणे साकारल्या होत्या. त्यामुळे सावरकरांच्या भूमिकेला हा नक्कीच न्याय देईल, याची मला खात्री होती.
कलाकार निश्चित झाल्यावर मला एक उत्तम दिग्दर्शक हवा होता. पण, त्यासाठी माझ्या दोन पूर्वअटी होत्या. त्या म्हणजे, त्याचा सावरकरांविषयी किमान बर्यापैकी अभ्यास असावा आणि दुसरी म्हणजे, तो सावरकरप्रेमी असावा. पण, काही ना काही कारणाने हे सगळे जुळून न आल्याने, मी स्वतःच दोन मोठ्या नाटकात काम करण्याच्या तुटपुंज्या अनुभवाच्या जोरावर आणि अनिल पालकरच्या सहकार्याने जमेल तसे नाटक उभे करण्याचा निर्णय घेतला. हनुमान नगरच्या वाचनालयात आमची तालीम सुरू झाली. पहिल्या दिवशी मी संहितेचे दोनवेळा अभिवाचन केले. दुसर्या दिवसापासून साभिनय तालीम सुरू झाली. अनिल पालकरचे पाठांतर फारच चांगले होते. चार-पाच दिवसांतच त्याची अर्धीअधिक संहिता पाठ झाली. पण, प्रश्न संहितेतील संस्कृतप्रचूर संवादांचा उभा राहिला. काही शब्दांचे उच्चार त्याला कठीण जात होते. तेव्हा ऐन नाटकातच जर काही उच्चारांच्या चुका झाल्या, तर पंचाईत व्हायची, हे लक्षात घेऊन, मी हे संपूर्ण नाटक दुसर्या चांगले शुद्ध आणि खणखणीत उच्चार असणार्या आणि भारदस्त आवाज असणार्या कलावंताच्या आवाजात ध्वनिमुद्रित (डब) करण्याचा निर्णय घेतला. कर्मधर्मसंयोगाने मला लवकरच असा कलाकार सापडला, तो मनीष मोहरीलच्या रुपात. मनीष स्वतः एक उत्तम नाट्यकलावंत तर आहेच, शिवाय तो एक उत्तम गायकसुद्धा आहे. त्यामुळे या नाटकातील दोन गाणीसुद्धा (जी पूर्ण नाहीत) ‘ने मजसी ने’ आणि ‘तुम्ही आम्ही सकल हिंदू, बंधू बंधू’ त्याच्याच आवाजात डब केली. या नाटकात अजून दोन गाणी आहेत. एक अगदी सुरुवातीला आणि एक एकदम शेवटी. म्हणजे या नाटकाची सुरुवात आणि शेवट दोन्ही गाण्यांनीच होते. ही दोन्ही गाणी नागपूरचे सुप्रसिद्ध गायक श्याम देशपांडे यांनी गायलेली आहेत. सुरुवातीच्या मी स्वतः लिहिलेल्या-
घे वन्दन मम दास्याचा तम
हरणारा रवि तू।
क्रांतिसूर्य तू महाकवी तू
या अतिशय सुंदर अशा सावरकर वंदनगीताचा उपयोग मी संगीत नाटकातील नांदीप्रमाणे करून घेतला आहे. हे गीत श्याम देशपांडे यांनीच अतिशय सुंदर रितीने संगीतबद्ध केले आहे. या नाट्य प्रयोगासाठी मी ‘फ्लॅशबॅक’ पद्धतीचा उपयोग केला आहे. पडदा उघडतो, तेव्हा सावरकरांच्या प्रायोपवेशनाचे २१ दिवस पूर्ण झालेले असतात. सावरकर त्यांच्या खोलीतील पलंगावर पडल्या पडल्या, प्रत्यक्ष मृत्यूला काव्यमय आवाहन करीत असतात, ‘ये! मृत्यो! ये!’ पण, मग ते मृत्यूला लगेच म्हणतात, “पण, थोडा थांब! हा बघ, माझ्या गतजीवनातील घटनांचा पट, कसा चित्रपटातील दृष्यांगत माझ्या डोळ्यांसमोरून तरळतोय!” आणि येथून सुरू होतो, सावरकरांचा मृत्यूशी एक तास अखंड संवाद! सावरकर त्यांच्या क्रांतिकार्याला वाहिलेल्या आयुष्यातील एक एक महत्त्वाचा प्रसंग त्यांच्या विशिष्ट शैलीत सांगतात. यात त्यांचे बालपणीचे दिवस, देवघरातील अष्टभुजेसमोर घेतलेली स्वातंत्र्यासाठीची ती शपथ, ते सवंगडी, तो ‘मित्रमेळा’, ती विदेशी कपड्यांची होळी, विलायतेस केलेले प्रयाण, तिथे केलेली ‘अभिनव भारता’ची स्थापना, मदनलाल धिंग्राने केलेला कर्झन वायलीचा वध, त्या विरोधात लंडनमध्ये भरलेली सभा, सभेतील ठरावाला त्यांनी केलेला साहसी विरोध, ५० वर्षांची दोन जन्मठेपांची काळ्या पाण्याची भयानक शिक्षा, अंदमानचा कुप्रसिद्ध सेल्युलर तुरुंग, क्रूरकर्मा बारी, अंदमानातून सुटका, रत्नागिरीचा अज्ञातवास, तेथील अस्पृश्यता निवारण कार्य, त्यानंतरचे हिंदू महासभा पर्व आदी अनेक घटनांच्या कथनानंतर अखेरचे त्यांचे सुप्रसिद्ध असे सिंधुसूक्त आणि अखेरीस महानिर्वाण!
अशा एकेका प्रसंगातून हे नाट्य फुलत जाते. केवळ एक तासाच्या या नाटकात सावरकरांच्या जीवनातील हे सारे महत्त्वाचे प्रसंग आणि त्यांच्या तेजस्वी व्यक्तिमत्वाच्या विविध पैलूंचे मनोहारी दर्शन घडविण्याचा मी प्रयत्न केला आहे. तसेच, त्यांचे हिंदुत्वाचे तत्वज्ञान, त्यांची विज्ञाननिष्ठ आणि बुद्धिवादी भूमिका, सुभाषचंद्र बोसांना त्यांनी केलेले मार्गदर्शन आदी गोष्टींचाही प्रभावीपणे वेध घेण्याचा प्रयास केलेला आहे. संपूर्ण नाटकभर प्रेक्षक ज्या तन्मयतेने हे नाटक बघतात, ते पाहून खरोखरेच जन्माचे सार्थक झाल्यासारखे वाटते. पण, नाटक नुसते लिहून आणि बसवून उपयोगाचे नसते. ते जोपर्यंत रंगमंचावर प्रेक्षकांसमोर सादर केले जात नाही, तोपर्यंत त्याला अर्थ नसतो. नाटक लिहून ते बसविल्यानंतर माझी आयोजक किंवा प्रायोजक शोधण्यासाठी वणवण सुरू झाली. सावरकरांचे कुठलेही काम सहजतेने कधीच होत नसते, याचा प्रत्यय मलाही या काळात खूप आला. अनेक संस्थांना विचारणा झाली. नकारघंटांचा घणघणाट सुरू झाला.अखेरीस माझ्या हक्काच्या ‘संस्कार भारती’ला विनंती केली आणि ‘संस्कार भारती’ने ती मान्य केली. दि. २९ मे २०१७ रोजी नागपूरच्या सुप्रसिद्ध साई सभागृहात या नाटकाचा पहिला प्रयोग झाला. अध्यक्षस्थानी ‘संस्कार भारती’च्या अध्यक्षा कांचनताई गडकरी आणि प्रमुख अतिथी म्हणून ‘प्रहार’ या सुप्रसिद्ध सैनिकी शाळेचे संस्थापक आणि नाना पाटेकरच्या ‘प्रहार’ या चित्रपटाचे मार्गदर्शक, विशिष्ट सेनापदक विजेते कर्नल सुनिल देशपांडे होते. प्रयोगाला त्यांच्यासोबतच नागपूरच्या नाट्यसृष्टीतील सर्वश्री मदन गडकरी, रंजन दारव्हेकर, संजय पेंडसे आदी बहुतेक सर्व मान्यवर दिग्दर्शक आणि कलावंत आणि रसिकांची भरगच्च उपस्थिती होती. पहिल्याच प्रयोगाला सर्वच दृष्टींनी प्रचंड यश मिळाले. नागपूरच्या सर्वच वृत्तपत्रांनी रकाने भरभरून प्रयोगाची खूप प्रशंसा केली. प्रयोगात एका तासात किमान आठ ते दहावेळा टाळ्यांचा कडकडाट ऐकायला मिळाला. प्रयोग संपल्यावर प्रेक्षक अक्षरशः भाराविलेल्या अवस्थेत होते.
मी स्वतःसुद्धा या नाट्यक्षेत्रातील पहिल्याच पदार्पणात एवढे मोठे यश पाहून, खरोखरेच अतिशय भारावून गेलेे होते. या प्रयोगानंतर या नाटकाचे एका प्रयोगातून दुसरा, दुसर्यातून तिसरा असे करता करता १५ प्रयोग झाले. पुण्यातील सदाशिव पेठेतील भरत नाट्य मंदिर येथे झालेला प्रयोगही असाच खूप यशस्वी झाला होता. या प्रयोगाचा योग सावरकरभक्त देवव्रत बापट यांच्यामुळेच आला. हा प्रयोग हाऊसफुल्ल तर झालाच, पण त्याहूनही प्रयोगाला प्रेक्षकांचा प्रतिसाद फारच जबरदस्त होता. प्रयोग संपल्यानंतर प्रेक्षकांनी उभे राहून जे टाळ्यांच्या कडकडाटात अभिवादन केले, ते तर केवळ अविस्मरणीय होते. या प्रयोगालाही एअर मार्शल भूषण गोखले, सुप्रसिद्ध प्रवचनकर सुनिल चिंचोळकर, सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार शि. द. फडणीस, सात्यकी सावरकर, गायकवाड (कॅप्टन निलेश गायकवाड यांच्या पत्नी), आफळे (चारुदत्त आफळे यांच्या पत्नी) आदी अनेक मान्यवर उपस्थित होते. पण, आमच्या या यशाच्या गाडीला कोरोनाच्या काळात जी खिळ बसली, ती चांगलीच. आताही नाटकाचे प्रयोग सुरूच आहेत. सोमवार, दि. २७ मे रोजी नागपूरच्या सायंटिफिक सभागृहात ‘मृत्युंजय सावरकर’चा प्रयोग होणार आहे. विशेष म्हणजे, ‘मृत्युंजय सावरकर’चा प्रत्येक प्रयोग हाऊसफुल्लच झाला आहे. यापुढेही प्रेक्षक असाच भरभरून प्रतिसाद देतील, याची मला खात्री आहे. कोणतीही कला किंवा कलाकृती ही राजाश्रय किंवा लोकाश्रय मिळाल्याशिवाय ती जशी फुलायला-फळायला हवी तशी फुलू- फळू शकत नाही. म्हणजेच, ती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही. ‘मृत्युंजय सावरकर’ ही नाट्यकलाकृती सावरकरांचे कार्य आणि सावरकरांचे विचार जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचावे, या एकमेव उद्देशाने निर्मिली असल्यामुळे, तिला भविष्यात मोठा लोकाश्रय मिळावा, अशी अपेक्षा मात्र नक्कीच आहे.
अनिल शेंडे