वीर सावरकरांचे चरित्रकथन करणारा पहिला मराठी फ्युजन रॉक बॅण्ड

    27-May-2024
Total Views | 309
Marathi fusion rock band dedicated to Veer Savarkar


सावरकरांचे विचार लोकांपर्यंत पोहोचविण्याचे प्रयत्न अनेकांनी केले. पुस्तके, नाटक, अभिवाचन अशा विविध माध्यमांतून सावरकरांचे विचार बहुश्रुत झाले. पण, आधुनिक पिढीपर्यंत पारंपरिक पद्धतीने सावरकरांचे जाज्वल्य विचार मांडण्याऐवजी, त्यांना आवडेल त्याच प्रकारात ते सादर करण्याचा प्रयत्न करणार्‍या सावरकरप्रेमी कलाकार प्रांजल अक्कलकोटकर यांचे हे अनुभवचित्रण...
 
जानेवारी २०११... पुण्यातील शिवाजीनगर येथील मॉडर्न अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये मी तिसर्‍या वर्षाला होतो. महाविद्यालयाच्या फिरोदिया करंडकासाठी उतरणार्‍या संघात माझी निवड झाली. कीबोर्ड वाजविणे आणि गायन, अशी दुहेरी जबाबदारी मला देण्यात आली होती. बर्‍यापैकी नवखा संघ असूनही, आमच्या संघाने प्राथमिक फेरी पार करून, पहिले सात संघ निवडले जातात अशा अंतिम फेरीत प्रवेश केला. यातूनच, संगीत क्षेत्रात ‘आपण काहीतरी दिवे लावू शकतो’ हा आत्मविश्वास माझ्यात निर्माण झाला. याच सुमारास मला अजून एक छंद जडला होता. वीर सावरकरांचे वाङ्मय वाचण्याचा. आठवीत असताना मी वीर सावरकरांची, ‘हिंदुत्व’ आणि ‘माझी जन्मठेप’ ही दोन पुस्तके वाचायचा प्रयत्न केला होता. पण, तेव्हा वय लहान असल्याने, मला या पुस्तकांचे फार आकलन होऊ शकले नव्हते. पुढे बारावीत असताना, माझ्याकडे त्यांचे ‘सहा सोनेरी पाने’ हे पुस्तक आले. हा एक मोठा टर्निंग पॉईंट ठरला. या पुस्तकाने मला इतके भारावून टाकले की, तहान-भूक हरपून मी ते दोन दिवसांत पूर्ण वाचून काढले. येथून पुढे वीर सावरकरांची मिळतील तितकी पुस्तके वाचून काढायचा मी सपाटा लावला.
 
१८-१९व्या वर्षी पुन्हा एकदा ‘हिंदुत्व’ पुस्तक वाचायला घेतले. सुदैवाने यावेळी मात्र माझ्या मर्यादित आकलनशक्तीने का होईना, पण वीर सावरकरांनी मांडलेल्या या तत्वदर्शनाचा बोध घेऊ शकलो. मी मग जमेल तसे, माझ्या मित्रांना या चरित्राबद्दल सांगायचा प्रयत्न करू लागलो. त्यातील बहुतांश जणांना याबद्दल फारशी माहिती नसायची. परंतु, ते या चरित्राबद्दल जाणून घ्यायला उत्सुक असायचे. काही काळाने यातील बर्‍याच जणांकडून ‘माझी बोलायची किंवा कथाकथनाची पद्धत त्यांना आवडत आहे,’ असे अभिप्राय येऊ लागले. एव्हाना मी उत्तीर्ण झालो होतो. एका क्रेन बनविणार्‍या कंपनीमध्ये नोकरी करून पाहिली. पण, हा आपला प्रांत नाही, याची जाणीव मला दोन महिन्यांतच झाली. पूर्ण वेळ संगीतातच करिअर करणे, हा निर्णय पक्का झाला आणि मी नोकरीचा राजीनामा दिला. माझ्या या तडकाफडकी घेतलेल्या निर्णयामुळे, घरचे खरेतर हादरले होते. पण, त्या वयात एक वेगळीच बेफिकीरी असते. त्यामुळे, मी माझ्या निर्णयावर ठाम होतो. आता मला वेळही भरपूर होता. व्यायाम, वाचन आणि संगीत हे तीनच छंद आता माझे सोबती होते. एक मात्र नक्की, ‘नोकरी सोडून देऊन गावभर फिरणारा मोकाट तरुण’ असा शिक्का माझ्यावर बसण्याच्या आत, आपल्याला एखादे दिपवून टाकणारे यश मिळवायचेच आहे; हा चेव मात्र मला स्वस्थ बसू देत नव्हता.
 
इतिहास आणि त्यातही वीर सावरकरचरित्र आपल्याला चांगल्या प्रकारे मांडता येते, हा आत्मविश्वास मला होताच आणि त्यासाठीची खुमखुमीदेखील होती. संगीत क्षेत्रात हातपाय मारण्यासाठी तर मी नोकरीही सोडून दिली होती. विचार करता करता एके दिवशी एक नवीन ‘रॉक बॅण्ड’ उभा करण्याची कल्पना मला सुचली. संपूर्णतः स्वरचित अशा गाण्यांच्या माध्यमातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे चरित्र मांडणारा पहिला मराठी ‘रॉक बॅण्ड!’ ऑक्टोबर २०१३ पासून याच एका गोष्टीचा ध्यास घेऊन मी कामाला लागलो. अगोदर वीर सावरकरांनी लिहिलेल्या साधारणतः २० पुस्तकांची मी पारायणे केली होती. आता तर, मी ‘सावरकर’ या नावासंबंधी जे मिळेल, ते वाचण्यास आणि पाहण्यास सुरुवात केली.मला आठवते की, मी त्यांच्या चरित्रासोबत इतका तन्मय झालो होतो की, मी त्यांच्या पायावर डोके टेकविलेले आहे आणि माझ्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू ओघळत आहेत, असे स्वप्न मला कित्येकदा पडत असे. आता उरली होती गाणी. फिरोदियामुळे गाणी लिहिणे आणि संगीत देणे या प्रक्रियेचा बराच सराव झाला होता. दोन ते तीन महिन्यांत त्यांच्या चरित्रातील निवडक प्रसंगांवर रचलेली १२ गाणी तयार देखील झाली.
 
पहिला कार्यक्रम लावायचा, तर अर्थातच निधीची नितांत आवश्यकता होती. मग आर्थिक पुरस्कृती मिळविण्याकरिता प्रयत्न सुरू केले. पुण्यातील सावरकरप्रेमी उद्योजक कॅप्टन निलेश गायकवाड यांच्यासोबत माझा पूर्वी परिचय झाला होता. त्यांना विचारणा केल्यावर त्या भल्या गृहस्थाने, शांतपणे १५ हजार रुपये असलेला लिफाफा माझ्या हातात ठेवला. त्यांनी माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल मी सदैव कृतज्ञ आहे. या प्रक्रियेत माझा खंदा साथीदार होता, माझ्या मॉडर्न महाविद्यालयामधील उत्तम गिटार वाजविणारा माझा ज्युनियर, प्रतीक देशपांडे. पहिल्या प्रयोगासाठी दि. २८ जानेवारी २०१४ हा दिवस आम्ही निश्चित केला. बॅण्डचे नाव ठेवले ‘द डायनामाईट’! पुण्यातील शनिवार पेठेतील सुदर्शन सभागृह आरक्षित केले. गाणी आणि एक नाटिका लिहून तयार होत्या. फक्त निवेदन बाकी होते. पण, आता माझ्याकडे फारसा वेळ शिल्लक नव्हता. पहिल्या प्रयोगाचा दिवस उजाडला. खाली धोतर, तर वर लेदर-जॅकेट, अशा ‘फ्युजन’ पोषाखात आम्ही कार्यक्रमासाठी उभे राहिलो. वृत्तपत्रातून पुरेशी पूर्वप्रसिद्धी झाल्याने सभागृह तुडूंब भरले होते. कार्यक्रमातील गाणी व्यवस्थित बसली होती, पण निवेदन लिहून काढण्यास मला वेळच मिळाला नव्हता. कसे माहीत नाही, पण कार्यक्रम सुरू झाल्यावर उत्स्फूर्तरित्या मध्येमध्ये नोंदींचा आधार घेऊन जे निवेदन मी सुरू केले, ते पार तो संपेस्तोवर मला एकदाही अडखळायला झाले नाही.
 
गाणीदेखील दणकेबाज पद्धतीने सादर झाली. प्रेक्षकांत वीरवर नारायणराव सावरकरांच्या स्नुषा हिमानीताई सावरकर यादेखील उपस्थित होत्या. दुसर्‍या दिवशी एका प्रसिद्ध वृत्तपत्रात कार्यक्रमाचे परीक्षण छापून आले. त्यांनी कार्यक्रमाची आणि आमच्या बॅण्डची मुक्तकंठाने प्रशंसा केली होती. यातून मिळालेल्या आत्मविश्वासातून, मी अधिकाधिक कार्यक्रम मिळविण्याकरिता प्रयत्न सुरू केले. मार्चच्या सुमारास मला स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजीत सावरकर यांचा संपर्क मिळाला. त्यांनी आणि स्मारकाच्या कोषाध्यक्षा मंजिरी मराठे यांनी दि. २७ मे २०१४ रोजी स्मारकात कार्यक्रम आयोजित करण्यास अनुमोदन दिले. कार्यक्रमाच्या चार दिवस आधी २०१४च्या लोकसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला. देशभरात अफाट उत्साहाची लहर निर्माण झाली. आमचा मुंबईतील कार्यक्रमदेखील यशस्वी झाला. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातच कार्यक्रम असल्याने, तिथे वाहिन्या आणि विविध वृत्तपत्रांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मुंबईच्या बहुतेक सर्व प्रमुख वृत्तपत्रांत कार्यक्रमाचे परीक्षण छापून आले. दि. २८ मे रोजी मंजिरीताईंनी ‘सह्याद्री’ वाहिनीवर स्मारकाच्यावतीने प्रवक्ता म्हणून मला जायला सांगितले. दहा मिनिटांची ही मुलाखत ‘सह्याद्री’ वाहिनीवरून थेट प्रक्षेपित झाली.

पुढे दोन-अडीच वर्षे मोठ्या जोमाने हे कार्यक्रम सादर झाले. कार्यक्रम करता करता आपले करिअर म्हणून ‘इतिहास’ विषयाचाच शिक्षक व्हावे, हा निर्णय मी घेतला. ‘ज्ञान प्रबोधिनी’चे प्राचार्य डॉ. मिलिंद नाईक यांनी मला त्यांच्या शाळेत इतिहास विषय शिकविण्याची संधी दिली. येथेच शिकवत असताना २०२१ मध्ये मी इतिहास विषय घेऊन पहिल्याच प्रयत्नात युजीसी-सेट उतीर्ण झालो. सध्या एका बाजूला प्राध्यापकी करता करता दुसर्‍या बाजूला संगीत क्षेत्रामध्ये हातपाय मारत वाटचाल चालू आहे.या वर्षीच्या जानेवारी महिन्यात आमच्या बॅण्डला दहा वर्षे पूर्ण झाली. आता आम्ही आमच्या वाद्यवृंदाला ‘बंदे हिन्दुवानी’ असे नाव घेतले आहे. नुकत्याच प्रसारित झालेल्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाच्या निमित्ताने आम्ही ‘स्वातंत्र्यवीर सावरकर चेतना अविनाशी हैं’ या नावाचे एक हिंदी गाणे रचले. ‘हर घर सावरकर’ समितीच्यामार्फत पुण्यात चित्रपटाच्या प्रिमियरच्यावेळी अभिनेते आणि दिग्दर्शक रणदीप हुड्डा यांच्यासमोर याचे सादरीकरण झाले. त्यानंतरदेखील एक आठवडाभर वीर सावरकरांचे चरित्र जास्तीत जास्त लोकांनी चित्रपटगृहात जाऊन पाहावे, याकरिता चौकाचौकांत जाऊन आम्ही याचे गायन करत होतो. ‘ने मजसी ने’ या तात्यांच्या अजरामर काव्यात ते म्हणतात, ‘गुण सुमने मी वेचियली या भावे, की तिने सुगंधा प्यावे.’ ‘वीर सावरकर’ ही अविनाशी चेतना आहे. आमच्या कलेमार्फत या चेतनेची आराधना करण्याचा आम्ही आमच्यापरीने प्रयत्न करत आलो आहोत. जाता जाता इतकेच म्हणतो, ‘गुणसुमने आम्ही वेचितो या भावे, की ‘त्याने’ सुगंधा प्यावे.’ परम वंदनीय स्वातंत्र्यवीर सावरकर की जय! श्रीविनायको विजयते!


 
प्रांजल अक्कलकोटकर
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा