२०२२ साली ‘विवेक समूह’ निर्मित ‘कालजयी सावरकर’ हा माहितीपट प्रदर्शित झाला. पुढे शहरांपासून ते अगदी ग्रामीण भागांतील शाळा-महाविद्यालयांच्या माध्यमांतून हा माहितीपट हजारो विद्यार्थ्यांपर्यंतही पोहोचला. अवघ्या दीड तासात सावरकरांचा संघर्षमयी जीवनपट पडद्यावर साकारण्याचे आव्हान संपूर्ण टीमने यशस्वीरित्या पेलले. त्यापैकी या माहितीपटाच्या पटकथा-संवादलेखनाचे शिवधनुष्य पेलणार्या डॉ. समिरा गुजर यांनी ‘कालजयी सावरकर’ माहितीपटाच्या निर्मितीचा शब्दबद्ध केलेला हा प्रवास...
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावर एक लघुपट किंवा माहितीपट करत आहोत, त्याची पटकथा-संवाद लिहायला आवडेल का तुला?” मला विनोद पवार यांचा फोन आला. पहिल्यांदा माझा विश्वासच बसेना. इतकी मोठी जबाबदारी आपल्याला पेलेल का, हा प्रश्न मनात होताच, पण पवारांनी त्यांच्या प्रसन्न शैलीत मला समजविले, “तू ये तर खरी, मग बघू!” मी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या चरित्राचा मागोवा घेणार्या ‘अनादि मी अनंत मी’ या कार्यक्रमाचे निवेदन करते. त्या कार्यक्रमाचे संशोधन-लेखन विदुषी साहित्यिक अरुणाताई ढेरे यांनी केले आहे. त्यांनी त्या तीन तासांच्या कार्यक्रमात वीर सावरकरांच्या समग्र व्यक्तिमत्वाचा वेचक आणि वेधक आढावा घेतला आहे. या कार्यक्रमाची कल्पना ‘रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी’चे कार्यकारी संचालक रवींद्र साठे यांची. प्रमोद पवार, अविनाश नारकर, पूर्वी भावे, स्पृहा जोशी अशा कलाकारांचे सादरीकरण, अनेक गायक-वादक कलाकारांचा थेट सहभाग, यांमुळे या कार्यक्रमाचा प्रयोग रंगतोसुद्धा खूप!
या कार्यक्रमाचे अनेक प्रयोग महाराष्ट्रात आणि देशभरात झाले. बहुतेक या कार्यक्रमातील माझा सहभाग, त्यानिमित्ताने आमच्या झालेल्या चर्चा, या सगळ्यामुळे मी हे आव्हान पेलू शकेन, असे पवारांना वाटले असावे. तसा काही दिवस आधी मी त्यांच्याच सूचनेवरून ‘कविनायक विनायक’ हा वीर सावरकरांच्या कवितांवर आधारित कार्यक्रमही लिहिला होता, ज्याचा प्रयोगही रसिकांच्या पसंतीस उतरला होता. त्यामुळेही त्यांना ही जबाबदारी मला द्यावी, असे वाटले असेल. हे एवढे पुराण सांगण्याचे कारण इतकेच की, हे असे विचार आणि त्याबरोबरीने साशंकता घेऊन मी ‘विवेक समूहा’च्या कार्यालयात पोहोचले. तिथे पोहोचल्यावर माझ्या लक्षात आले की, या लघुपटाची ट्रेन फलाटावर उभी होती. सहप्रवासी आपापल्या जागा पकडून बसले होते. आता शिट्टी वाजण्याचा अवकाश होता. पण, गाडी सुटण्यापूर्वी मी डबा पकडावा, माझी गाडी सुटू नये म्हणून आधाराचे अनेक हात पुढे होते. त्यातील एक म्हणजे, सा. ‘विवेक’चे प्रबंध संपादक दिलीप करंबेळकर. सरांनी पहिल्याच भेटीत माझ्यावर विश्वास दाखविला. त्यांची तयारी बघून मी थक्कच झाले. आम्ही ज्या कॉन्फरन्स हॉलमध्ये बसलो होतो, त्या हॉलच्या सगळ्या भिंतींना व्हाईट बोर्ड्स लावले होते. त्यावर सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू लाल-निळ्या शाईत लिहिले होते, त्यांच्या आयुष्यातील विविध टप्पे, कालखंड आणि स्थळे यांसहित लिहिले होते.
मनात एक गंमतीशीर विचार आला की, आम्ही एका टिप्पणवहीतच बसलो आहोत. विशेष म्हणजे, हे सगळे संदर्भ सरांना तोंडपाठ होते. ते पटकन एखादी गोष्ट सांगत आणि त्या फळ्याकडे बोट करत. तो फळा नेमका माझ्या मागचा असेल तर, मी चाकाची खुर्ची फिरवून ती नोंद वाचत होते. सर मात्र त्यांच्या पाठीमागच्या फळ्यावरच्या नोंदीही तोंडपाठ सांगत होते. त्यांच्या शब्दांतून त्यांचा व्यासंग आणि त्यांची तळमळ दोन्ही लक्षात येत होती. त्याचवेळी त्या कॉन्फरन्स हॉलमध्ये आणखीही काही व्यक्ती होत्या. विनोद पवार आणि अभिनेते प्रमोद पवार तर होतेच, तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शक गोपी कुकडेसुद्धा होते. जाहिरात क्षेत्रातील इतक्या मोठ्या दिग्गज व्यक्तींबरोबर काम करायचे, याचे थोडे दडपण आलेच. वाटले, ‘ओनिडा’चा तो ‘डेविल’ तयार करणारे सर स्वतः स्वभावाला कसे असतील? पण, आता अनुभवाने सांगू शकते की, हश ळी रप रपसशश्र - खरेच देवदूतासारखे आहेत ते! त्यांच्या हातात प्रतिभेची जादूची कांडी आहे. ती फिरवूनच त्यांनी हा लघुपट निर्माण केला. त्यांनी चर्चेत सहभाग घेतला आणि आमच्या कामाचे स्वरुप अधिक स्पष्ट होऊ लागले. त्यांनी चित्रीकरणाच्या दृष्टीने कथेकडे पाहायला सुरुवात केली. ते त्यांचा प्लॅन सांगू लागले आणि त्यांनी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगितली, चित्रपट सव्वा तासापेक्षा अधिक मोठा नसावा आणि त्याचे चित्रीकरण एकाच ठिकाणी, तेही तीन दिवसांत करायचे होते.
मला तर काही समजेना. सावरकरांवरचा तीन तासांचा कार्यक्रम अपुरा पडतो, हा अनुभव गाठीशी असलेली मी, या सव्वा तासाच्या कालावधीच्या अपेक्षेने मनोमन खचले. त्यात एकाच चित्रीकरणस्थळामध्ये (स्टुडिओमध्ये) सावरकरांच्या आयुष्यातील नाशिक, पुणे, लंडन, अंदमान, रत्नागिरी अशी विविध पर्वे कशी दाखविणार? मला काही उलगडत नव्हते. माझ्या चेहर्यावरचा गोंधळ पाहून गोपी सर हसले. ते हसले की, त्यांची मोत्याच्या लडीसारखी असणारी दंतपंक्ती चमकते. त्या गोंधळलेल्या अवस्थेतही मला त्यांच्या त्या स्मिताचे कौतुक वाटून गेले. ते म्हणाले, “हे बघ, आपला कॅन्व्हास म्हणजे कॅमेराची चौकट आहे. तिथे एखाद्या स्थळाचा किंवा काळाचा आभास तयार करायला एखादी वस्तूसुद्धा पुरते. शिवाय पात्रांच्या वेशभूषा मदतीला असतातच. आपण ही वेगवेगळी स्थळे सूचकतेने दाखवू. शिवाय प्रकाशयोजनेचा एक वेगळा प्रयोग माझ्या डोक्यात आहे. हे सगळे शुभ्र पांढर्या कॅन्व्हासवर घडेल. त्याची प्रकाशयोजनाही शुभ्र असेल. एखादे तैलचित्र बघितल्यासारखा भास त्यातून निर्माण होईल.” मला कॅमेराच्या चौकटीत सूचकतेने दृश्ये दाखविण्याची कल्पना आवडली. पण, ही प्रकाशयोजनेची कल्पना, मला पटकन डोळ्यांसमोर आणता येईना. कारण, काळ्या बॅकग्राऊंडवर प्रकाशझोतात काही साकारणे, हे जरा आर्टिस्टिक वाटते आणि कमी खर्चात होते, हे माहीत होते, पण हा पांढरा प्रकाशझोत?
अर्थात, लेखक म्हणून माझा त्याच्याशी काही संबंध नव्हता. त्यामुळे गोपी सर म्हणत आहेत, तर ते ठीकच असेल, असे मी मनोमन ठरवून टाकले. अशाप्रकारे बघता बघता, मी त्या ट्रेनमध्ये नुसती चढले नाही, तर माझा प्रवास सुरूही झाला. हो पण, अजून एक सहप्रवासी आमच्याबरोबर होता. त्याची ओळख करून द्यायची राहिली. हा सहप्रवासी म्हणजे अमोघ पोंक्षे. या प्रकल्पाचा समन्वयक आणि माझा सहलेखक. त्याच्याकडे संहितेसाठी काढलेल्या टिप्पणांचे एक मोठे बाड तयार होते. आणखी एक व्यक्ती तिथे हजर नव्हती, पण तिच्या सहभागाशिवाय येथवरचा प्रवास शक्यच नव्हता आणि ती व्यक्ती म्हणजे सावरकरांच्या चरित्राचा अभ्यासक अक्षय जोग! मला आणि अमोघला लिखाणासाठी लागणारी सगळी माहिती त्यानेच पुरविली होती. शिवाय एका व्यक्तीचा उल्लेख या चर्चेत वारंवार झाला, ती व्यक्ती म्हणजे लेखक-संशोधक विक्रम संपत. या सगळ्या चर्चेनंतर माझे मत काय? असे करंबेळकर सरांनी विचारले. आता माझ्यासाठी परीक्षेची घडी होती. मी म्हटले, “हे कथानक अशा प्रकारे साकार करायचे असेल, तर याला सूत्रधार लागेल. कारण, संपूर्ण कथानक दाखविणे एरवीही अशक्य आहे. आपल्याला तर खूप छोटे तुकडे दाखवायला लागतील.” सगळ्यांनी संमतीच्या माना दर्शविल्या आणि मला मी योग्य दिशेने विचार करते आहे, हे समजून धीर आला. समोरून सरांचा प्रश्न आला, “कोण असावा हा सूत्रधार?” मी आणि अमोघने एकमेकांकडे बघायला सुरुवात केली. प्रवासात भेंड्या खेळताना रॅन्डम टीम करतात, तसे आम्ही आज अचानक एकत्र टीम झालो होतो.
आमचा एकमेकांशी परिचयही नव्हता, पण आता आम्ही टीम होतो. आम्ही जवळजवळ एकत्र म्हणालो, “कोणीही चालेल, पण सावरकर स्वतः नको. त्यांचे कार्य इतके उत्तुंग आहे की, ते त्यांनी प्रथम पुरुषात ‘मी केले’ असे सांगणे नको.” आणि येथेच आमच्या लक्षात आले की, आपले गोत्र एकच आहे. आपण एकत्र काम करू शकतो. मग कोणी काही तर कोणी काही पर्याय सुचविले आणि या चर्चेत एक सुंदर पर्याय सर्वानुमते ठरविण्यात आला की, वीर सावरकरांची कथा सांगण्यासाठी सर्वात योग्य सूत्रधार म्हणजे भारत देश, त्यांचा लाडका हिंदुस्थान! याच बैठकीत हेसुद्धा ठरले की, हा लघुपट प्राधान्याने तरुणांसाठी आहे. तो नुसता माहितीपट नाही, तर प्रेरणापट आहे. सावरकर ‘कालजयी’ कसे ठरले, तर त्यांच्या विचारांमुळे ठरले. त्यांचे तेव्हा महत्त्वाकांक्षी क्वचितप्रसंगी अशक्यप्राय वाटणारे विचार, आज काळाच्या कसोटीवर उतरले आहेत. त्यांनीच एके ठिकाणी म्हटले आहे, राष्ट्राचा मोठेपणा त्याच्या ध्येयातून व्यक्त होतो. राष्ट्राचे स्वरुप त्याने आपल्यापुढे ठेवलेल्या ध्येयावर अवलंबून असते. संकुचित ध्येयाच्या राष्ट्रांनी भूतकाळात चिरंतन मोठेपणा प्राप्त केलेला नाही. राष्ट्राला महात्म व वैभव प्राप्त करून देण्याकरिता उदात्त ध्येय असणे आवश्यक आहे... ‘माझा हा वारसा मी तुम्हांस देत आहे.’ वटवृक्षाचे बीज मोहरीपेक्षा लहान असते, पण त्या बीजात जी स्फूर्ती असते, जी वल्गना असते, ती वाढता वाढता तिचा प्रचंड वटवृक्ष बनून त्याखाली गायीची खिल्लारे विसावा घेतात, उन्हाने श्रांत झालेल्यांना तो वटवृक्ष सावली देतो. मलाही वल्गना करू द्या! माझे गाणे मला गाऊ द्या!
‘या जगात आपणाला जर हिंदुत्वाचे मानाचे राष्ट्र म्हणून जगावयाचे असेल, तर तसा आपला अधिकार आहे आणि ते राष्ट्र हिंदू ध्वजाखालीच स्थापन झाले पाहिजे. या नाही तरी पुढल्या पिढीत ही वल्गना खरी ठरेल. माझी वल्गना खोटी ठरली तर मी वेडा ठरेन. माझी ही वल्गना खरी ठरली तर मी ‘प्रॉफेट’ ठरेन. माझा हा वारसा मी तुम्हाला देत आहे!’ आज त्यांच्या विचारांची सार्वकालिकता लक्षात येते आहे. उदाहरणार्थ, त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे सुयोग्य प्रतिनिधित्व होण्याचे महत्त्व फार आधीच ओळखले होते. म्हणूनच मॅडम कामा यांच्या हातून त्यांनी भारताचा ध्वज जगासमोर आणला. आज भारत आत्मविश्वासाने जगासमोर येत आहे, त्याच्या मूळाशी त्यांनी सांगितलेली आंतरराष्ट्रीय धोरणे आहेत. सैन्याचे त्यांनी सांगितलेले महत्त्व आज सर्वमान्य झाले आहे. हिंदू धर्माला महत्त्व देत असताना, त्यांनी विज्ञानवाद सांगितला, अस्पृश्यता निर्मूलनाची चळवळ चालविली. एक समर्थ राष्ट्र घडवायचे असेल, तर त्या राष्ट्राची भाषा समर्थ हवी, या भूमिकेतून भाषाशुद्धी चळवळ हाती घेतली. त्यांच्या या विचारांची अनेकांनी उपेक्षा केली, कुचेष्टाही केली. पण, आज ‘दिनांक’, ‘महापौर’, ‘दिग्दर्शक’, ‘संकलक’ असे विविध शब्द आपण वापरतो, ते सावरकरांनी दिले आहेत. भारतात सध्या घडत असलेल्या घटना आणि सावरकरांनी सांगितलेले विचार यांची सांगड घातली पाहिजे, असे सगळ्यांनाच वाटले. मग ते कसे साधायचे, यावर विचार करायला हवा, या मतावर येऊन ही बैठक संपली.
येथून पुढे माझे आणि अमोघचे काम सुरू झाले. सावरकर तीन टप्प्यांत दिसावे, हे ठरले. प्रसंग निवडले. संवादलेखन सुरू झाले. चित्रपटाचे एक नाही, तर दोन सूत्रधार असावे, असे वाटले. म्हणजे, हिंदुस्थानच सूत्रधार असेल, पण एक प्राचीन आणि एक आधुनिक. नव्या भारतातील घटनांचे निवेदन हा ‘तरुण भारत’ करेल, हे ठरले. मग पुढे प्रत्येक बैठकीत संहितेचे वाचन, काटछाट, बदल असे बरेच काही सुरूच होते. एका बाजूला ‘कास्टिंग’ सुरू झाले. छोट्या आणि तरुण सावरकरांची निवड झाली आणि प्रौढ सावरकरांच्या भूमिकेसाठी सौरभ गोखलेचे नाव पुढे आले. हिंदुस्थानचा एक चेहरा ज्येष्ठ अभिनेते मनोज जोशी असावे, हे पटकन ठरले. पण, नव्या भारताचा चेहरा कोण, यावर काही पर्याय समोर आले तरी समाधान होईना. मग तेजस बर्वेचे नाव पुढे आले आणि तोही प्रश्न सुटला. प्रमोद पवार लोकमान्य टिळकांच्या भूमिकेत असणार होते. इतर पात्रयोजनाही ठरत होती. अर्थात, लेखक म्हणून आमचा या चर्चेत सहभाग असण्याचे खरेतर कारण नव्हते, पण मी कलाकार म्हणून कार्यरत असल्याने आपसूक या चर्चेत ओढली गेले. लेखक म्हणून आमच्यासाठी सगळ्यांत महत्त्वाची गोष्ट एकच होती, ती म्हणजे भाषेवर कलाकाराची उत्तम पकड असावी.
आम्ही संवाद खूप बोली भाषेत आणि सोपे लिहिण्याकडे कटाक्ष ठेवला होता. तरीही, काळ लक्षात घेऊन लिहिणे भाग होते. सगळ्यांत मोठे आव्हान सौरभ गोखलेसाठी होते. कारण, त्याच्या तोंडी काही सावरकरांच्या भाषणातील वाक्ये होती, पद्यही होते. हे सगळे दिवस सावरकरमय होते. प्रत्यक्ष चित्रीकरणाला मात्र मला जाता येणार नव्हते, त्यामुळे मी थेट मोठ्या पडद्यावरच हा लघुपट पाहिला. गोपी सरांनी त्यांच्या पांढर्या प्रकाशझोताने चित्रपटाचा पोतच बदलून टाकला होता. एकेक फ्रेम देखणी दिसत होती. हे सगळे शूटिंग एका ठिकाणी आणि तीन दिवसांत झाले आहे, यावर विश्वास बसत नव्हता. कामे तर सगळ्यांनीच छान केली होती. वाक्यागणिक लोकांच्या टाळ्या येऊ लागल्या आणि सगळ्या टीमच्या मेहनतीची पोचपावती मिळाल्यासारखे वाटले. स्वतः लेखक विक्रम संपत यांनी आमच्याबरोबर नाशिकला हा लघुपट पाहिला आणि त्यांना तो प्रचंड आवडल्याचे सांगितले. ‘हा मराठीसोबत इतर भाषांमध्यदेखीले व्हावा,’ असेही सुचविले. राजभवनात तत्कालीन मा. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनीही लघुपटाच्या खास खेळाचे आयोजन केले आणि या प्रयत्नाचे कौतुक केले. आज हा लघुपट इंग्रजी आणि गुजराती भाषेत उपलब्ध आहे. विविध शाळा, सामाजिक, सांस्कृतिक संस्था स्वतः पुढाकार घेऊन हा लघुपट दाखवित आहेत, याचे एक वेगळे समाधान मनात आहे. या माध्यमातून अल्पस्वल्प प्रमाणात का होईना, भारतमातेची सेवा हातून घडली, हीच भावना आहे. हासुद्धा सावरकरांनी दिलेला वारसा आहे -
हे मातृभूमि, तुजला मन वाहियेले
वक्तृत्व वाक्-विभव ही तुज अर्पियेले
तुंतेंची अर्पिली नवी कवितावधूला
लेखां प्रति विषय तूची अनन्य झाला
त्यामुळे हा चित्रपट जरी सावरकरांच्या चरित्रावर आधारित असला, तरी ती तितकीच कहाणी आहे, बदलत्या हिंदुस्थानाची, सावरकरांच्या स्वप्नातील हिंदुस्थानाची!! तुम्हीही या कलाकृतीचा आनंद घ्यावा, अशी विनंती करून थांबते.
डॉ. समिरा गुजर