"हिम्मत असेल तर ईशान्य मुंबईच्या व्हिजनवर चर्चा करायला समोरासमोर या!"
मिहिर कोटेचा यांचे संजय दीना पाटील यांना खुले आव्हान
11-May-2024
Total Views | 214
मुंबई : "पराभवाच्या भीतीने पायाखालची वाळू सरकल्याने उबाठा गटाचे उमेदवार संजय दीना पाटील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकेरी उल्लेख करत आहेत. ईशान्य मुंबईच्या विकासाची कळकळ आणि हिम्मत असेल, तर त्याअनुषंगाने ईशान्य मुंबईच्या व्हिजनविषयी चर्चा करायला त्यांनी समोरासमोर यावे," असे खुले आव्हान भाजपचे उत्तर पूर्व लोकसभेचे उमेदवार मिहिर कोटेचा यांनी शनिवार, दि. ११ मे रोजी संजय दीना पाटील यांना दिले.
कोटेचा म्हणाले, नरेंद्र मोदी ईशान्य मुंबईत प्रचारासाठी येणार आहेत, या नुसत्या विचारानेच संजय पाटील यांना वेड लागले आहे. पराभव समोर दिसत असल्यामुळेच पाटील यांचा तोल सुटत चालला आहे. त्यामुळे ते नरेंद्र मोदी यांचा एकेरी भाषेत उल्लेख करत आहेत. ज्या दिवशी मी निवडून येईन, त्यादिवसापासून रात्रंदिवस ईशान्य मुंबईच्या विकासासाठी झटत राहीन. मानखुर्द शिवाजीनगरचे नाव छत्रपती शिवाजी महाराज नगर करणे यासाठी प्रयत्न करीन. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने झाकीर नाईकच्या औलादींचे सगळे काळे धंदे, ड्रग्स असो की गुटखा की मटका सगळे बंद करून खऱ्या अर्थाने महाराजांना अभिप्रेत स्वराज्य आणण्याचा माझा प्रयत्न असेल, असेही त्यांनी सांगितले.
मिहीर कोटेचा म्हणाले की, "प्रेस क्लबच्या वतीने आयोजित 'द मुंबई डिबेट - इलेक्शन २०२४' या कार्यक्रमात मुंबई शहराबद्दल काय व्हिजन आहे, हे सादर करण्यासाठी संजय दीना पाटील येणार होते. माझ्या माहितीप्रमाणे आयोजकांनी पंधरा फोन केले, पण त्यांनी पळ काढला. हे पहिल्यांदाच नाही, तर यापूर्वी अनेकदा घडले आहे. तरी आपण जे स्थळ आणि वेळ ठरवाल, त्याठिकाणी आणि त्यावेळी मी तुमच्याबरोबर उत्तर पूर्व मुंबईच्या विकासाबाबत माझे व्हिजन काय आहे, याबाबत सर्व जनतेसमोर वन टू वन चर्चा करायला तयार आहे. असेल हिम्मत तर तुम्ही माझे चॅलेंज स्वीकाराल आणि पळपुटेपणा बंद कराल," असे खुले आव्हान कोटेचा यांनी दिले.